कविवर्य राजा बढे निर्मित रचनाप्रकार

कृष्णकुमार निकोडे

 मो:७७७५०४१०८६

राजा नीळकंठ बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. 

    राजाभाऊ बढे यांचे त्यांच्या बकुल नावाच्या मोठ्या भावावर अतोनात प्रेम होते. भाऊ वारल्यावर त्यांनी धाडिला राम तिने का वनी या नाटकातले घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला हे गीत रचले होते. मुंबईतील कवी राजा बढे चौक त्यांच्या नावावर आहे. नागपूरच्या महाल पेठेतील सीपी ॲन्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकासही राजा बढे यांचे नाव दिले आहे. महाराष्ट्राचा प्राचीन राजा हाल सातवाहन यांच्या काव्यांचे संकलन असलेल्या गाथा सप्तशतीचा मराठी अनुवाद हा राजा बढे यांच्या लेखनाची अत्युच्च कार्यसिद्धी समजली जाते. राजा नीळकंठ बढे यांचा जन्म दि.१ फेब्रुवारी १९१२ रोजी विदर्भात नागपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. सन १९३५मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढची पाच वर्षे अशीतशीच घालवून त्यांनी पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये उमेदवारी केली. एका वर्षानंतर ते नागपूरला परतले. नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये ते वर्षभर सहसंपादक होते. त्याचवेळी राजा बढे हे नागपूरच्या बागेश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते. तिथून निघून बढे यांनी साप्ताहिक सावधानमध्ये मावकर-भावे यांच्याबरोबर काम केले. दरम्यानच्या काळात ते नागपूरच्या एका काॅलेजात दाखल झाले. सन १९३९ साली बीएच्या वर्गात असताना त्यांनी काॅलेज सोडून दिले. ते पदवीधर झाले नाहीत. मात्र काॅलेजमध्ये असताना त्यांनी कोंडिबा या टोपणनावाने बरेचसे स्फुटलेखन केले. आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी पालनपोषण यांतच सर्वस्व मानून राजा बढे स्वतः अविवाहित राहिले.

      राजा बढे हे सन १९५६ ते १९६२ या कालखंडात आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम करीत होते. या नोकर्‍यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर त्यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले. चित्रपटात काम करावे, या विचाराने ते सन १९४० साली पार्श्वनाथ आळतेकर यांच्याकडे गेले. त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी त्यांच्या सिरको फिल्म्समध्ये दोन वर्षे उमेदवारी केली. व्हाॅईस कल्चरचे धडे त्यांनी आळतेकरांकडून घेतले. दोन वर्षांनी ते नागपूरला परतून प्रकाश स्टुडिओमध्ये रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीने त्यांनी स्वानंद चित्र ही संस्था उभी केली आणि रायगडचा राजबंदी हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. राजा बढे यांना संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा गाढा अभ्यास होता. तरीही त्यांच्या कवितेतील भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच चारोळी हा रचनाप्रकार त्यांनी हाताळला. कोंडिबा हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविधवृत्तात त्या प्रकाशित होत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर हेच त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या क्रांतिमाला-१९५२ या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी प्रस्तावनेत- आपण स्वतःच नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने माझ्या प्रस्तावनेची गरज नाही, असे गौरवोद्गार काढले होते. कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात, त्याचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. सन १९६४ साली मुंबईत त्यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर यांनी प्रथमच त्यांच्या कथा कथन केल्या होत्या.

     बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड झाली होती. अशावेळी जेव्हा प्रकाश पिक्चर्सच्या सावरकरांकडे राम-राज्य चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी ती चटकन मान्य केली होती. दिल्लीला असताना राजा बढे यांचा दि.७ एप्रिल १९७७ रोजी अकाली मृत्यू झाला. 

!! जयंती सप्ताहात राजा बढे यांना व त्यांच्या हरहुन्नरी कर्तबगारीस मानाचा मुजरा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here