बुलडाणा – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या १५ बियाणे उत्पादक प्रतिनिधींना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. वाशीम येथील बियाणे उत्पादक प्रतिनिधींच्या सामूहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. फुंडकर यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेटस लावण्यात आले असून अनेकांची ये-जा करताना चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशीम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक प्रतिनिधींची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर प्रतिनिधी ठाम होते. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. यावर तोडगा न निघाल्याने बियाणे उत्पादक प्रतिनिधींनी शनिवारी फुंडकर यांच्या बंगल्यावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने अखेर शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास उत्पादक गट व कंपनीच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री फुंडकर यांच्या येथील वसुंधरा स्थित निवासस्थानाजवळ आत्मदहन करण्यासाठी मोर्चा वळविला. मात्र तेथे तैनात असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार संतोष ताले यांनी वेळीच सदर प्रतिनिंधींना ताब्यात घेतले. असे एकूण टप्याटप्याने १५ प्रतिनिधींना ताब्यात घेवून स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आले होते. फुंडकर यांच्या बंगल्यासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here