भेसळखोरांना रोखा

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

राज्यात भेसळखोरांनी उच्छाद मांडला आहे. राज्यात दूध भेसळीचे प्रकार वाढत आहे. एक लिटर दुधात काही रासायनिक पदार्थ टाकून वीस लिटर दुध बनवण्याचे प्रकार सुरू आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दूध भेसळीचे रॅकेट नुकतेच उघडकीस आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दूध भेसळीत अनेक बड्या धेंड्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. केवळ दुधातच नव्हे तर मिठाईमध्येही भेसळ केली जात आहे. मिठाई बनवताना वापरण्यात येणाऱ्या खव्यामध्येही भेसळ असल्याच्या अनेक घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत.

बर्फी किंवा खवा दुधापासूनच बनतो अशी सर्वसामान्यांची धारणा असते. फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. लहान मुलांना हे खव्यापासून तयार केलेले पदार्थ खूप आवडतात. त्याला मागणीही जास्त असते त्यामुळेच वर्षानुवर्षे पडलेली दुधाची पावडर, स्टार्च, वनस्पती तूप, दूध याबरोबरच काही प्रमाणात रसायन मिसळून तयार केलेला निकृष्ट खवा भेसळखोर बाजारात खवपीत आहेत. काही भेसळखोर दर्जेदार खाद्यान्नाच्या ब्रॅण्डसशी साम्य असणारे बनावट, कमअस्सल तब्येतीला घातक पदार्थ सारख्याच दिसणाऱ्या वेष्टनातून विकत आहेत. हे पदार्थ शहरातील प्रश्नार्थक वातावरणात बनवले जातात. हे पदार्थ रस्त्यांवर कुत्री मांजरी फिरण्याच्या ठिकाणी वाळत घातलेले दिसतात. भेसळखोरांमुळे ग्राहकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. दुध, मिठाई आणि खाद्यपदार्थांत भेसळ होत असल्याने ग्राहकांना अनेक आजरांना सामोरे जावे लागत आहे.

भेसळयुक्त दुधामुळे ग्राहकांचे हृदय, किडनी व यकृत निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुधातील भेसळीमुळे शरीर वाढीसाठी आवश्यक असणारे लायसीन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही परिणामी लहान मुलांच्या शरीर वाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते शिवाय उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आगामी वीस वर्षांत देशातील तीस ते चाळीस टक्के लोकांना कर्करोग होऊ शकतो असा इशाराच जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हे एक प्रकारचे स्लो पॉईजन आहे. हे स्लो पॉईजन देऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारे मोठे रॅकेट राज्यभरात कार्यरत आहे. या रॅकेटचा आणि त्यात सहभागी असलेल्या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

ही भेसळखोरी रोखण्याची जबाबदारी रोखण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची अर्थात एफ डी ए ची आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडतही आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या नवी मुंबई परिमंडळ २ ला अलीकडेच नवी दिल्लीच्या ईट राईट इंडिया च्या उपक्रमात सहभागी होऊन २०२२ – २३ साठीचे पाच लाखांचे पारितोषिक अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाचकडून प्राप्त झाले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच मात्र एफ डी आयच्या कारवाईत सातत्य नाही. कारवाईत सातत्य नसल्यानेच भेसळखोरांना त्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. एफ डी आय चा वचक नसल्यानेच राज्यात भेसळखोरी वाढली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दूध आणि खाद्य पदार्थातील भेसळखोरी रोखण्यासाठी पोलीस आणि एफ डी ए ने एकत्र येऊन राज्यभरात धडक मोहीम राबवायला हवी. कमी श्रमात अधिक नफा मिळवण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळखोरांना थेट फाशीचीच शिक्षा द्यायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here