पक्षातून बडतर्फ केलेल्यांना अधिकार कुणी दिला…? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
सिद्धांत
३ जुलै, मुंबई: राष्ट्रवादी फुटून अजित पवार गट भाजप, शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. कालच शरद पवारांनी पक्षाच्या विरोधात कारवाई केली म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातील पदातून बडतर्फ केले होते.
त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी आणि विरोधी पक्षनेते पदी विधान सभेचे सदस्य श्री. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली होती. पण अजित पवार गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले.
यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटलेल्या,प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना कालच पक्षातून तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा पक्षाच्या संविधानाप्रमाणे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाना म्हणजेच पवार साहेबांना आहे.
अस असताना देखील, पक्षातून “बडतर्फ केलेले प्रफुल पटेल” यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशअध्यक्ष पदी निवड करत असल्याचं जाहीर केलं. हा निर्णय त्यांनी कोणाला विचारुन घेतला हे त्यांनाच माहीत.कारण एखाद्याला पक्षातून बडतर्फ केल्यानंतर त्याला पक्ष कार्यकारणीत सोडा..साधा ब्लॉक अध्यक्ष निवडण्याचा अधिकार राहत नाही.अश्या परिस्थितीत प्रफुल पटेल यांनी कशाच्या आधारे,सुनील तटकरे यांची निवड केली..? हा प्रश्न येथे उपस्थित होतो.
शेवटी इतकंच सांगतो, पक्ष, पक्षाची घटना, पक्षाचे संघटन, हजारो पदाधिकारी, लाखो कार्यकर्ते आणि खुद्द पवार साहेब आमच्या सोबत आहेत आणि ही लढाई आम्ही जिंकणारच हा आम्हाला विश्वास आहे.