tigers-in-india
संघर्ष वाघ आणि माणसांचा: २०२१ सालात १२० वाघांचा मृत्यू, ८० लोकांना वाघांनी केले ठार
tigers human people conflicts
संघर्ष वाघ आणि माणसांचा: २०२१ सालात १२० वाघांचा मृत्यू, ८० लोकांना वाघांनी केले ठार

सिद्धांत
४ जानेवारी २०२२: २०२१ साल हे आकड्यांचे साल ठरलं. कोरोना रुग्णांचे वाढते आकडे, बंद पडत गेलेल्या कंपन्यांचे आकडे, बेरोजगारीचे आकडे, वाढत्या महागाईचे आकडे आणि एका पाठोपाठ येत असलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे आकडे. हे आकडे बघून वर्षभर सामान्य माणसांच्या उरात नेहमीच धडकी भरत होती. त्याचवेळेला दूर जंगलांच्या वाटेला काही घटना घडल्या, आणि त्याची आकडेवारीही तितकीच थरकाप उडवणारी होती.

२०२१ वर्षात भारतामध्ये सुमारे १२६ हुन जास्त वाघांचा मृत्यू झाला. तर यादरम्यान ८० भारतीय वाघांनी केलेल्या हल्यांमध्ये निधन पावले. मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत एका वर्षात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. २०२० मध्ये वाघांच्या हल्ल्यात ४४ लोक मृत्युमुखी पडले होते.

कोणत्या राज्यात आहे वाघांची संख्या सर्वात जास्त?
जगातील एकूण व्याघ्रसंख्येपैकी ७५% वाघ एकट्या भारत देशात आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे २०१८ साली करण्यात आलेल्या मोजणीनुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ इतकी होती. मध्यप्रदेश वाघांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असून राज्यात मोजणीदरम्यान ५२६ वाघ होते. ५२४ वाघांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर तर ४४४ वाघांसह उत्तराखंड राज्य तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१८ सालीच्या मोजणीनुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ३१२ इतकी होती.

कोणत्या राज्यात आहे वाघांच्या मृत्यूंची संख्या सर्वात जास्त?
नॅशनल टायगर कॉन्सर्व्हशन ऑथॉरिटी ” या संस्थेच्या मते २०२१ साली भारतामध्ये तब्बल मृत्यू पावलेल्या वाघांची संख्या १२६ इतकी होती. २०२० (१०६ मृत्यू) सालापेक्षा ह्यावर्षी संख्येमध्ये जावळपास २०% वाढ झाली आहे. वाघांच्या मृत्यूच्या संख्येत देखील मध्यप्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ह्यावर्षी मध्यप्रदेशमध्ये ४२ वाघांचा मृत्यू झाला. महाराष्टामध्ये २६ तर कर्नाटकमध्ये १५ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नॅशनल टायगर कॉन्सर्व्हशन ऑथॉरिटीने दिली आहे. परंतु काही पर्यावरणवादी संस्थांच्या मते हा आकडा  जास्त असू शकतो. वाघांची शिकार, नैसर्गिक मृत्यू यांसारख्या घटना घनदाट जंगलात, दुर्गम डोंगराळ भागात होत असल्याने बराचश्या मृत्यूंची माहिती प्रशासकीय व्यवस्थेंपर्यंत पोहचत नाही.

वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी या एनजीओच्या अंदाजानुसार ह्यावर्षीची देशभरातील वाघांच्या मृत्यूंची संख्या १६० इतकी असू शकते. एकूण १२६ मृत्यूंपैकी ६५ वाघांचे मृत्यू हे अभयारण्य क्षेत्रात झाले असून बाकीचे मृत्यू संरक्षित क्षेत्राच्या बाहेरचे आहेत.

वाघ आणि माणसांतील वाढता संघर्ष.

tigers-killed-in-india
संघर्ष वाघ आणि माणसांचा: २०२१ सालात १२० वाघांचा मृत्यू, ८० लोकांना वाघांनी केले ठार

२०२१ साली देशभरात ८० लोकांना वाघांनी केलेल्या हल्ल्यात आपला प्राण गमवावा लागला होता. त्यापैकी ३९ लोक हे एकट्या महाराष्ट्र राज्यातील होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत माहिती देतं सांगितले कि, जानेवारी ते सप्टेंबर २०२१ ह्या कालावधीत महाराष्ट्रात एकूण ६५ लोकांचा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यापैकी ३९ जणांचा मृत्यू हा वाघांनी केलेल्या हल्यात झाला. महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिह्यात वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त असून (२६), विदर्भातील नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.

जंगलतोड, कातडी, हाडे, शिंगे यांसाठी प्राण्यांची होणारी शिकार, प्राण्यांच्या रहिवासात वाढलेला माणसांचा हस्तक्षेप यांमुळे मानव आणि जंगली प्राण्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.

असे म्हणतात कि, घनदाट जंगलात राहणार वाघ सहसा माणसांच्या वाटेला जात नाही, पण जेंव्हा आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणारी माणसं त्याच्या मागावर जातात, त्यावेळी मात्र वाघाच्या हिंस्त्र ताकदीला बळी पडतात. हा संघर्ष टाळण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेला संरक्षण क्षेत्रांची आखणी करताना परिसरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा सूक्ष्म विचार करून मानव आणि वन्यप्राणी यांच्या वाटा एकमेकात मिसळणार नाही असे नियोजन करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांविरोधात योग्य आणि जलद कारवाई करणे आवश्यक आहे. माणसांनी वन्यप्राण्यांच्या रहिवासाचे भान राखणे गरजेचे आहे. अन्यथा मानव आणि वाघातील हा रक्तरंजित संघर्ष वर्षोनुवर्षे असाच चालू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here