आला उन्हाळा आरोग्य सांभाळा

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो:९९२२५४६२९५

राज्यात सूर्य नारायणाने आपला प्रकोप दाखवायला सुरवात केली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात सर्वत्र उकाडा जाणवायला सुरवात झाली असून पुण्यासह अनेक शहरांचे तापमान ४० अंशापर्यंत पोहचेल असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. मार्च अखेर पर्यंत पारा आणखी वर जाणार आहे. मागील आठवड्यापासून संपूर्ण राज्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्य उकाड्याने हैराण झाले आहे.

यावर्षीचा फेब्रुवारी महिनाही उष्ण ठरला. यावर्षीचा फेब्रुवारी महिना आजवरचा सर्वात उष्ण ठरल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील दोन महिने राज्यातील तापमान उच्चांकी अंशावर पोहचेल यावर्षी उन्हाळाअतिशय कडक असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने नागरिकांसाठी जिकरीचे ठरणार आहे. येत्या काही दिवसात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्याची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे.

उन्हाळा सुरू झाला की नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात. उन्हाळ्याच्या झळा वाढल्या की थकवा येणे, चक्कर येणे, हातापायाला गोळे येणे, उष्माघात होणे असे परिणाम माणसांमध्ये दिसू लागतात. उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनाही याआधी घडल्या आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे काहींना डोळ्यांचे तर काहींना त्वचेचे विकार जडतात. उन्हाळ्यात विविध प्रकारचे श्वसन विषयक तसेच मेंदूचे आणि हृदयाचे आजार होतात. मधुमेह आणि रक्तदाब सारख्या व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी उन्हाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यात उष्माघात होण्याचे प्रमाण खूप वाढते. उष्माघाताने शरीराचे तापमान उच्च पातळीवर पोहचते. योग्य आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता देखील असते. उष्माघातामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी बारा ते चार यावेळी घराबाहेर पडूच नये. काही महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, बूट, चपलांचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावीत. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी टोपी, छत्री, गॉगल यांचा नियमित वापर करावा.

तापमान वाढले की शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होते. डिहायड्रेशन झाले की शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते त्यामुळे चक्कर येते, घोळणा फुटतो, नाकातून रक्त येते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी सतत पाणी पीत राहावे. शरीरात दररोज किमान दोन लिटर पाणी जाणे आवश्यक असते. उन्हाळ्याच्या दिवसात घराच्या बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत न्यायला विसरू नका. साध्या पाण्याबरोबर नारळाचे पाणी, भाज्या व फळांचे रस दररोज प्यायले तरी हरकत नाही. मार्च महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्याने पुढील दोन महिने उन्हाची तीव्रता किती असेल याची कल्पना केली तरी यावर्षीच्या उन्हाची दाहकता लक्षात येईल. त्यामुळेच प्रत्येकाने उन्हाळ्यात आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. खबरदारी घेऊनच आपण उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here