भय मूत्रपिंड निकामी होण्याचे…!

मधुमेह – डायबेटिस मेलिटस या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही प्रकार १ किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही प्रकार २. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे, यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी डाॅक्टरकडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैलीनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी हे सुद्धा याच आजाराने त्रस्त आहेत, ते काही डाॅक्टर नाहीत, परंतु लोकात याचे वाढते प्रमाण बघून ते व्यथित झाले आणि व्याधीग्रस्तांना यापासून जागृत करण्याचा उद्देश उरात बाळगून अनेक ठिकाणाहून माहिती संकलित करून ती ते या लेखरुपाने सेवेशी सादर करत आहेत…. संपादक._

      तपशील: मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे, त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे दुष्परिणाम होतात.

        पार्श्वभूमी: शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नामधील कर्बोदकांचे- साखर आणि स्टार्चचे अन्ननलिकेमध्ये पचनांती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे पोचविले जाते. इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्शुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराच्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते. रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया- अधिक ग्लूकोज असणे म्हणतात. रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते. ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते तेव्हा पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिती आहे. वेळीच उपचार न केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते.

        मधुमेहाचे ठळक प्रकार: प्रकार -1- या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलैंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास इन्शुलिन आवश्यक मधुमेह असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते. प्रकार -२- दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी ठरतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल, व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान या लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात. आणखी एक प्रकारचा मधुमेह गरोदरपणातील मधुमेह या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. सन २००४मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शने द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल, त्‍यांना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते. स्वादुपिंडाचे आजार, अतिमद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल, अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत.

        मधुमेहीचा आहार: मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहारावर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले, तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल, तर आरोग्य बिघडण्यासोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही. पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही. तुरट, कडू आणि तिखट पदार्थ जास्त खावेत. मधुमेहाच्या रुग्णांनी पचन होण्यास हलका असलेला त्याचसोबत सहज मिसळणारे फायबर असलेले आहार घ्यावेत.

लवकर पचणारी फळे उदा. टरबूज, पपई, बोर इत्यादी फळे. जे लवकर पचतात आणि आतड्याना साफ ठेवण्यास मदत करतात. मधुमेह आहार नियंत्रण ठेवण्यास हे पदार्थ मिठाई, चॉकलेट, साखर, केळी, तळलेले पदार्थ, सुका मेवा, चिक्कू, सीताफळ इत्यादी खाऊ नयेत.

मधुमेह झाल्यास तरल पदार्थ घ्यावेत. उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी. यामुळे देखील मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल. डॉक्टरकडून सल्ला घेऊन मधुमेह रोगी पौष्टिक आहारासाठी एक मधुमेह आहार तक्ता बनवून घेऊ शकतात. मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा १०० मिलीग्राम/डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण ७० ते ९९ एमजी/डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या पोस्टप्रेंडियल शर्करा १४० एमजी/डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य आहेत.

         प्रतिबंध: मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी राहण्याच्या सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते. १४ नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो.

  –  श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.

      गडचिरोली, मो – ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here