नगर

महापालिकेने दिलेले घर चक्क ‘ओएलएक्स’ या सोशल नेटवर्किंग साइटवर विकण्याचा गंभीर प्रकार नगरमध्ये घडला आहे. महापालिका प्रशासनाला याची माहितीही नाही. मनपाचे घर ‘ओएलक्स साइट’वर टाकून त्याची ८ लाख रुपये किंमतही जाहीर केली गेली होती. त्यानंतर स्थानिक स्तरावरच रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने मध्यस्थी करून हे घर साडेतीन लाखांना विकल्याचे समजते. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी केली आहे. मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांना भेटून या घटनेची सविस्तर माहिती ते देणार आहेत. याशिवाय म्हाडा व केंद्र सरकारकडेही तक्रार करणार आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, काटवन खंडोबा रस्त्यावरील खंडोबा मंदिरालगत महापालिकेने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुले बांधली आहेत. काटवन खंडोबा व वारुळाचा मारुती या दोन ठिकाणी या योजनेत सुमारे साडेसहाशेवर घरे (फ्लॅट) झाली आहेत. यापैकी काटवन खंडोबा रोडवरील तीन मजली ‘महात्मा जोतिबा फुले वसाहत’ या इमारतींमधील दहाव्या विंगमधील एका घराच्या विक्रीसाठी ‘ओएलएक्स’वर जाहिरात टाकली गेली होती. केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या नगरमधील एका ज्य़ेष्ठ नेत्याने या घराच्या विक्रीसाठी मध्यस्थी केल्याचे समजते. या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांचे संकलन लोखंडे यांनी सुरू केले असून, त्या आधारे महापालिकेकडे तक्रार करून संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here