मुंबई
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी भाजपच्या सर्व आमदारांची वांद्रे येथील एमसीए क्लब येथे झालेल्या बैठकीत झाडाझडती घेतली. अनेक आमदारांना त्यांनी मतदारसंघात नक्की काय काम केले आहे? पक्षाचे कार्यक्रम कशा प्रकारे राबविले आहेत? मोदी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नक्की कोणते प्रयत्न केले आहेत? आदी प्रश्न विचारत शहा यांनी आमदारांना फैलावर घेतले.
अमित शहा यांनी जाहीर सभेनंतर आमदारांशी साधलेल्या या संवादात प्रामुख्याने येणारी निवडणूक ध्यानात घेऊन बूथ पातळीवर करावयाच्या विविध २६ कामांची यादी प्रत्येक आमदाराला समजाऊन सांगितली. प्रत्येक बूथवर कोणते मतदार आहेत. त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती कोणत्या. ज्येष्ठ नागरिक किती, स्त्रिया किती, पुरुष किती, तरुण किती आदी सर्व विषयांची इत्थंभूत माहिती घेऊन त्या प्रकारे बूथचे नियोजन कशा प्रकारे करावे याची त्यांनी आमदारांसमोर मांडणी केली. तसेच या कामावर अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी आमदारांना दिले.
या बैठकीला खासदार मात्र उपस्थित नव्हते. या बैठकीत काही आमदारांना त्यांनी कानपिचक्या दिल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे ‘मटा’शी बोलताना सांगितले.