प्रदूषण पसरविणाऱ्या त्या दोन संचांची देखभाल दुरुस्ती करत त्वरित उपाययोजना करा – आ. किशोर जोरगेवार
📍मुंबई येथे महाजेनको आणि सीएसटीपीएस अधिकाऱ्यांसह बैठक
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
मुंबई : 9 डिसेंबर
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. ही गंभीर बाब असून, चंद्रपूरमधील प्रदूषण नियंत्रणासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांमध्ये या संचांमुळे अडथळा येत आहे. सात दिवसांच्या आत यावर उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आज मुंबई येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी या विषयावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाजेनकोचे संचालक (ऑपरेशन्स) संजय मरुडकर, कार्यकारी संचालक नितीन वाघ, आयटी विभागाचे कार्यकारी संचालक नितीन चंदूरकर, कार्यकारी संचालक राजेश पाटील, यांची उपस्थिती होती. तर या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा आणि सीएसटीपीएस चे मुख्य अभियंता कुमरवार यांची व्ही.सी च्या माध्यमातून बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत त्यांनी सदर सूचना केल्या.
चंद्रपूरसारख्या औद्योगिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महाऔष्णिक केंद्रातील काही संच आणि काही उद्योग प्रदूषण वाढवत असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच हवेत धूर, राख, आणि इतर घातक कण सोडत असल्याने परिसरातील हवामानाचा दर्जा खालावत आहे.
या गंभीर परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत आमदार जोरगेवार यांनी अधिकार्यांना सात दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. सदर संचांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करा आणि यावर त्वरित कृती आराखडा तयार करून शासनाला अहवाल सादर करा असेही यावेळी आ. जोरगेवार त्यांनी सांगितले.
बैठकीत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जंगलाच्या सान्निध्यात असूनही चंद्रपूरमधील वाढते प्रदूषण चिंताजनक आहे. त्यामुळे प्रदूषणाचा अचूक अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात. लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर येथील विद्युत महाऔष्णिक केंद्र हे विद्युत निर्मितीचे मोठे केंद्र आहे. मात्र, थर्मल एनर्जी तयार करताना पर्यावरणीय प्रभाव कमी ठेवण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या संदर्भात नियमीत पाण्याचा फवारा मारणे, राखेचे योग्य व्यवस्थापन करणे, आणि इतर पर्यावरणीय उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.