नागपूर-उपराजधानीत गेल्या चोवीस तासांत तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची हत्या करण्यात आली. यातील पहिल्या घटनेत तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाने एका युवकाची हत्या केली. दुसऱ्या घटनेत यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा तस्कराची हत्या करण्यात आली. तर तिसऱ्या घटनेत रेल्वेस्थानकावर एका महिलेची हत्या करण्यात आली.गांजा चोरल्याच्या संशयातून सुरू झालेल्या वादात शेरू अली मोहम्मद अली याची हत्या करण्यात आली. गोलू उर्फ कुणाल कांबळे आणि त्याचे अन्य दोन साथीदार यांच्यावर त्याच्या हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. शेरूवर एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे अंमली पदार्थाच्या तस्करीकरिता दाखल करण्यात आले होते, हे विशेष. सहा महिन्यांपूर्वीच शेरू कारागृहातून बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर येताच त्याने आपला गांजातस्करी आणि विक्रीचा व्यवसाय परत एकदा सुरू केला होता. उत्तर नागपुरातील सगळ्यात मोठ्या गांजा तस्करांपैकी एक म्हणून शेरूची ओळख होती. आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातसुद्धा जाळे होते. गोलूवरसुद्धा काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघे कारागृहात असतानासुद्धा गोलूने शेरूवर कारागृहातसुद्धा हल्ला केला होता, असे सांगितले जाते.हत्येची ही घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकता कॉलनी परिसरातील गौसिया मशिदीजवळ घडली. होळीनंतर शेरू आणि गोलू यांच्यातील वाद अधिकच तापला. धूलिवंदन साजरे करण्याच्या उद्देशाने गोलू हा शेरूच्या घरी गेला होता. यावेळी राजलक्ष्मी नावाची एक महिलासुद्धा शेरूकडे होती. तिने आंध्र प्रदेशातून सात किलो गांजा आणला होता. हा गांजा आणि तिचे काही दागिने एका बॅगमध्ये होते. ही बॅग गोलूने चोरल्याचा संशय शेरूला होता. ही बॅग परत करण्याकरिता गोलूने शेरूला २० हजार रुपयांची मागणीसुद्धा केल्याचे सांगितले जात आहे. हा वाद तापल्याने गोलूने त्याचे अन्य दोन साथीदार कुणाल वाघमारे आणि राहुल इंगळे यांच्यासह शेरूच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला चढविला. यात शेरूचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here