अधिकार पद; सोपी गोष्ट नाही

अधिकार पद…कोणतंही अधिकार पद ही काही सोपी गोष्ट नाही. तसं पाहता ते प्राप्त करणंही कठीणच आहे आणि त्या पदावर असतांना काम करणं हे तर त्याच्यापेक्षा कठीण. त्यावर काम करीत असतांना बाकीचे घटक हे अधिकारपद प्राप्त व्यक्तीचे पाय खेचत असतात. असे पाय खेचले की अधिकार पद प्राप्त असलेला व्यक्ती हा निराश होतो व त्याचेकडून अपेक्षीत कार्य घडत नाही व त्यात त्या क्षेत्राचा विकास खुंटतो. त्याचबरोबर देशाचाही विकास खुंटतो.

            अधिकार पद……..या अधिकार पदाबाबत सांगायचं झाल्यास ती काही साधी सोपी गोष्ट नाही. काहींना ते पटतं तर काहींना ते पटत नाही. त्यातच ते अधिकार पद, ज्या माणसांच्या हस्ते आपल्याला मिळतं, तो व्यक्ती जर आपल्याकडून थोडा जरी दुखावला गेला वा त्याला आपल्याकडून काही तुच्छ स्वरुपात अर्वाच्च बोलणं झालं तर त्या व्यक्तीला राग येतो . तो आपला शत्रू बनतो. वरवर तो गोडगोड बोलतो आणि संधी शोधत असतो. अशी संधी शोधतो की त्या संधीनुसार आपली बाजू जेव्हा कमकुवत होते. तेव्हा हाच गोड बोलणारा व्यक्ती आपल्याला वेळेवर दुधारी विळखा घालतो. मग आपली त्या दुधारी विळख्यातून सुटकाच होवू शकत नाही. 

           ते अधिकारी पद. त्या अधिकारी पदाबाबत काहींच्या मनात सांशकता असते आणि संभ्रमही तेवढाच. मग हे अधिकारी पद हे एका राजाचं असेल वा एखाद्या प्रधानमंत्र्यांचं. राज्यातील काही काही लोक अशा अधिकारपद प्राप्त लोकांना पुर्णतः नेस्तनाबूत करण्यासाठी दिवास्वप्न पाहात असतात. 

           अधिकार पद हे एक काटेरी मुकुट आहे. थोडा जरी धक्का लागला की आपल्याला काटे रुतणारच. असे त्या काटेरी मुकूटाला धक्का लावणारे अनेक घटक या समाजात असतात. ते असा धक्का लावण्यासाठी संधी शोधतच असतात आणि जेव्हा अशी संधी पुरेपूर चालत येते. तेव्हा असे घटक सक्रीय होवून अशा काटेरी मुकूटाला धक्का लावत असतात. त्यातच हे काटे एवढे बोचतात की आपली त्या काट्यातून अजिबात मुक्तता होत नाही. वाटल्यास वेळप्रसंगी आपण मृत्यूमुखीही पडतो. 

           शिवाजी महाराज स्पष्टपणे म्हणतात की राज्याला फक्त नि फक्त फितूरीपासूनच धोका असतो. हे फितूर काही दूर नसतात. ते आपापसातीलच असतात. आपल्याशी गोडगोड बोलत असतात आणि आपण ओळखू शकत नाही. परंतु जेव्हा वेळ येते. तेव्हा ते आपल्या मानेवर तलवार नक्कीच ठेवत असतात. जेव्हा असं अधिकार पद येतं. तेव्हा त्या अधिकार पदावर सर्वात जास्त बंधनं येत असतात. 

          अधिकार पद हे संकटांनी घेरलेलं असतं. व्यक्ती वाईट नसतो. परंतु ते अधिकार पद वाईट असतं. एक व्यक्ती म्हणून विचार केल्यास तो चांगला असतो. त्याला कुणाशी घेणंदेणं नसतं. परंतु तोच व्यक्ती जेव्हा अधिकार पदावर बसतो. तेव्हा तो वाईट ठरतो. कारण त्या अधिकार पदाला नातेवाईक नसतात. मित्रमैत्रिणी नसतात. नातं, जात, धर्म काहीच जवळचं नसतं . फक्त न्याय आणि स्पष्ट व्यवहार हाच त्याचा नातेवाईक असतो आणि मित्रही.

          अधिकारपद प्राप्त लोकांच्या जवळ कोण कोण असतं? असा विचार केल्यास समाजात अशीच काही मंडळी असतात की ज्यांना आपले पाप लपवायचे असते किंवा अशा अधिकार पद प्राप्त झालेल्या माणसांकडून काही मिळविण्याची अपेक्षा असते. तीच मंडळी मात्र अशा अधिकारी लोकांच्या जवळपास राहात असतात. त्यांची वाहवा करीत असतात. बदल्यात फायदा घेऊन भरपूर काही मिळवीत असतात. जर मिळालं नाही तर त्यांच्या मनात कटूता निर्माण होते. अशी कटूता त्याचीच मानसिकता खराब करण्याला कारणीभूत ठरत असते. 

          अधिकार पद प्राप्त करणं काही कठीण गोष्ट नाही. परंतु ते प्राप्त झाल्यास त्या पदाला न्याय देणं मोठी कठीण गोष्ट आहे. त्या पदावर असतांना भेदभाव करता येत नाही. हा दूरचा, हा जवळचा, हा गरीब हा श्रीमंत, हा अस्पृश्य हा स्पृश्य, हा अमूक जातीचा व हा अमूक धर्माचा असा भेदभाव नसतो. त्याला ही सर्व बंधनं न पाळता आपल्या अधिकार पदावर काम करावं लागतं. त्यातच आपली कामं जर झाली नाही तर आपल्याला राग येतो. 

          महत्वाचं सांगायचं झाल्यास आपण अशा अधिकार पदाला समजून घ्यावे. त्याची महती समजून घ्यावी. त्याची बंधनंही समजून घ्यावी आणि त्याची मर्यादाही समजून घ्यावी. उगाचच अशा अधिकार पद प्राप्त व्यक्तीला त्रास देवू नये. तसंच त्यांच्याकडून फार अपेक्षा करु नये. कारण त्या व्यक्तींकडून सहकार्य न घडल्यास आपला भ्रमनिराश होतो. आपला अपेक्षाभंग होतो व आपल्या मनामध्ये त्या अधिकार पदाबाबत विश्वास उरत नाही. असा विश्वास उडाला की आपल्यात फितुरीची भावना जागी होते. जी भावना आपल्यालाच नाही तर आपल्या देशालाही घातक ठरते. ती भावना आपला विकास तर खुंटवतेच. व्यतिरिक्त आपल्या देशाचाही विकास खुंटवते यात आतिशयोक्ती नाही. कारण फितुरीमुळं राज्याचं नुकसान होते आणि आपली फितुरी कोणाच्या लक्षात आलीच तर आपलंही नुकसान होते. तसं पाहता प्राचीन काळी अशी फितुरी अंगावरच येत होती. म्हणूनच सांगावंसं वाटते की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे या वृत्तीप्रमाणे आपणही अशा अधिकार प्राप्त व्यक्तींवर विश्वास ठेवावा. आपलं रडगाणं वा आपल्या अपेक्षा त्याचेवर लादू नये. त्यालाही एक माणूसच समजावे आपल्याचसारखं. निःस्पृह, निःपक्ष कार्य करु द्यावे हे तेवढंच खरं. यात आपला विकास नाही झाला तरी चालेल. परंतु देशाचा विकास व्हावा हीच अपेक्षा आपल्या मनामध्ये ठेवावी. तेव्हाच देशसेवेचं कार्य घडेल व देशाचा सर्वांगीण विकास होईल. हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे, नागपूर

मो: ९३७३३५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here