Home latest News बाळापूर तालुक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या.

बाळापूर तालुक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या.

71

बाळापूर तालुक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या.

बाळापूर :- तालुक्यातील कोळासा येथे एकाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. बाळापूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मंगळ‌वार, 10 नोव्हेंबर रोजी फरार असलेल्या आरोपी राहुल मोहन गवारगुरू यास संभापूर, ता. खामगाव येथून अटक केली. तालुक्यातील ग्राम कोळासा गावात वरली, मटका, गावठी दारुची अवैध विक्री जोरात सुरू आहे. आरोपी राहुल मोहन गवारगुरु व मृत रामकिसन राजपूत बिहारी हे दोघे चोरी करून आणलेले साहित्य विक्री करीत होते. विक्रीच्या हिस्सेवाटणीवरून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत असे. दोघांवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सोमवारी आरोपी राहुल व मृत रामकिसन बिहारी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी होऊन राहुल याने रामकिसन बिहारी यांच्यावर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. घटनेनंतर आरोपी राहुल मोहन गवारगुरु हा फरार झाला होता. आरोपी हा संभापूर, ता. खामगाव येथे त्याच्या काकाकडे लपून असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी त्याला सकाळी 9 वाजता अटक केली. पोलीस कर्मचारी अनंत सुरवाडे, राजू नागरे, गणेश जंजाळ यांनी मोठ्या शिताफीने आरोपिस ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध बाळापूर पोलिसांनी भादंविच्या 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप -निरीक्षक मनोज वासाडे करीत आहेत.