मुंबई: आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. या लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस लाल बावट्यासोबत आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
आझाद मैदानात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला संबोधित करताना अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे आणि कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. आम्ही राजकीय फायदा घ्यायला इथे आलेलो नाही. शेतकऱ्यांसाठी आलो आहोत, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या गळ्यात पाट्या आहेत, मग नीरव मोदी,मल्ल्याच्या गळ्यात का नाहीत?, असा सवाल चव्हाण यांनी केला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम आणि त्यांच्या हाताला योग्य काम मिळालेच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.