स्पॉटलाईट: कॉपीची कुप्रथा
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
आपल्याकडे फेब्रुवारी मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी, बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षा देखील याच काळात होतात. शिष्यवृत्ती परीक्षा १० फेब्रुवारीला पार पडली तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान असून दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मैलाचा दगड असतो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या परीक्षा असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात. यावर्षी देखील लाखो विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मनापासून अभ्यास केलाय ते विद्यार्थी या परीक्षांना बेधडकपणे सामोरे जातात मात्र ज्या विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झाला नाही ते विद्यार्थी गैरमार्गाने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच एक गैरमार्ग म्हणजे कॉपी. दरवर्षी हजारो विद्यार्थी कॉपी करताना आढळतात. काहींवर कारवाई होते तर काहींना समज देऊन सोडून दिले जाते मात्र कॉपीची ही कीड मुळासकट उपटून टाकली जात नाही.
कॉपी ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. वर्षभर अभ्यास न करता परीक्षेच्या दिवशी कॉपी करून उत्तीर्ण होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे ही धोक्याची घंटा आहे. म्हणूनच खुद्द पंतप्रधानांनाही यात लक्ष घालावे लागले. २७ जानेवारी रोजी झालेल्या मन की बात या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्यांनी याच विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३८ लाख विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी कॉपी केल्याने आयुष्य घडवता येत नाही असा मंत्र दिला. कॉपी करून आपण एखादी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो मात्र जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे तर अपार मेहनतच करावी लागते. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही असा संदेशही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला मात्र विद्यार्थी पंतप्रधानांचा हा संदेश कितपत अमलात आणतील याबाबत शंकाच आहे कारण कॉपीची कुप्रथा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षेत तर कॉपीचा सुळसुळाट झालेला दिसून येतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी कॉपीच्या या कुप्रथेचे आवर्जून पालन करतात. काही ठिकाणी तर काही शाळा आणि संस्था देखील निकाल चांगला लागावा म्हणून या कुप्रथेला प्रोत्साहन देतात. काही पालकही आपल्या मुलांना कॉपी पुरवण्यासाठी जीवाचे रान करतात. शाळेच्या, परीक्षा हॉलच्या बाहेर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी उसळते. झेरॉक्स दुकानांवर देखील तेवढीच गर्दी असते अर्थात परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करतात हे मान्यच करावे लागेल. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे अभियान राबवले जाते.
भरारी पथक हे त्यापैकीच एक अभियान. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना काही अधिकारी बोर्डाकडून नेमले जातात. हे अधिकारी परीक्षा केंद्रावर अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रावर धाक बसवतात. कॉपी करताना कोणी विद्यार्थी आढळला तर त्याच्यावर कारवाई करतात. थेट निलंबित केले जाते. पण कॉपी बहाद्दरांना तुरुंगात टाकण्याची आपल्याकडील कायद्यात तरतुद नाही मात्र देशातील काही राज्यात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट तुरुंगात पाठवण्याचा कायदा आहे. आपल्याकडे देखील आता कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वचक बसावा आणि राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.
कॉपीमुक्त अभियानासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करीत आहेत ते स्वागतार्ह असले तरी केवळ कठोर कायदे करूनच कॉपीला आळा घालता येईल असे नाही तर कॉपी करू नये यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करायला हवे. कॉपी करणारा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो मात्र जीवनाच्या परीक्षेत तो उत्तीर्ण होऊ शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक पावलावर परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी कॉपी नव्हे कठोर मेहनतच घ्यावी लागते. कठोर मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कॉपी सारख्या कुप्रथेला मूठमाती द्यावीच लागेल.