स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लेख: पंडित नेहरू यांची ऐतिहासिक यवतमाळ भेट.
 पंडित नेहरू यांची ऐतिहासिक यवतमाळ भेट.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लेख: पंडित नेहरू यांची ऐतिहासिक यवतमाळ भेट.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लेख: पंडित नेहरू यांची ऐतिहासिक यवतमाळ भेट.
पंडित नेहरू यांची ऐतिहासिक यवतमाळ भेट.

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208266961

भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करतांना आज यवतमाळकरांना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या ऐतिहासिक यवतमाळ भेटीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 18 एप्रिल 1959 या दिवशी यवतमाळ जिल्ह्याने विश्वविक्रमी 1 लाख 37 हजार एकर जमीनीचे भूदान पंतप्रधान नेहरूंना दिले होते. अहिंसक मार्गाने समता निर्मितीच्या लढ्यात भूदान चळवळीतून इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या जमीनीचे दानपत्र पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याठिकाणी स्विकारले व आचार्य विनोबा भावे व येथील कार्यकर्त्यांचा सत्कार केला.

पं. नेहरू यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल श्री. श्रीप्रकाश हे होते. स्वागतपर भाषण कृषीमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी केले होते. तर भूदान कार्याचा आढावा श्री. चंदूसिंग नाईक यांनी सादर केला होता. राज्यपाल श्री. श्रीप्रकाश, बापूजी अणे, कृषीमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री. श्रीमन्नारायण इ. मान्यवर व्यासपीठावरउपस्थित होते. अमोलकचंद महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उद्घाटन देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच व्यासपीठावरून विद्युत बटन दाबून केले होते..

पंडित नेहरू यांच्या यवतमाळ येथील मार्गदर्शन भाषणातील काही महत्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. “

● मोठ्या मोठ्या देशात जमिनीच्या प्रश्नावर लढाया झाल्या आहेत, गृहयुद्ध-रक्तपात याशिवाय हा प्रश्न सोडविण्याची कला त्यांना अवगत नाही, पण आम्ही शांततेने जमिनीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडविला आहे.

●आज मी प्रसन्न आहे, हा सोहळा पाहून इतक्या उत्साहाने काम करणारे लोक ज्या जिल्ह्यात आहेत त्याठिकाणी मी यापूर्वी कसा आलो नाही, याचेच मला आश्चर्य वाटते.

● शेतकरी उन्नत झाला त्याचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना उन्नत करणाऱ्या सहकारावर लक्ष दिले पाहिजे.

● आचार्य विनोबा हे महान व्यक्तिमत्व होय, त्यांचे कार्य महान आहे.

●गावाच्या उन्नतीसाठी पंचायतींना अधिक अधिकार देऊन त्या बळकट करायला हव्या.

● निरर्थक बडबड करून देश पुढे जाणार नाही, देश परिश्रमाणे विकसित होतो, त्यासाठी आपल्याला प्ररिश्रमात रंगून प्रयत्न केले पाहिजे”

पंडित नेहरू यांच्या यवतमाळ आगमनाच्या निमित्ताने नेहरू संचालन समितीचे गठन कृषीमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्याध्यक्ष चंदुभाऊ नाईक, सचिव जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर व बाबासाहेब घारफळकर हे होते तर सदस्य म्हणून बापूजी अणे, गुणवंत देशमुख, नंदकुमार अग्रवाल, सुशिलाबाई पंडित, ताराचंद सुराणा, फुलचंद अग्रवाल, मंगलाताई श्रीखंडे, अलीहसन ममदानी, बाबुराव पाटील, ब.ना.एकबोटे, सदुभाऊ पांडे, आशाताई बर्वे, सखाराम मुडे, पहलाज राजभाई इ. चा समावेश होता.

यवतमाळकरांनी जशा पंडित नेहरूंच्या स्मृती जपल्या तसेच पंडित नेहरू देखील त्यांच्या कार्यक्रमानिमित्त यवतमाळसारख्या लहानशा गावात जमलेला असंख्य जनसामुदाय, त्यांची शिस्त, कार्यनिष्ठा याबाबत ते जेथे जात तेथे उल्लेख करत असत. पंडित नेहरू यवतमाळला येणार ही माहिती मिळताच त्यांच्या कार्यक्रमाचे वृत्त वेळीच देता याव्या यासाठी यवतमाळच्या काही साप्ताहिकांनी आपले वृत्तपत्राचे दैनिकात रूपांतर केले होते. पं. नेहरूंच्या भाषणासाठी मुंबईहून ‘चिकागो रेडिओ’ ही ध्वनिक्षेपण यंत्रणा मागविण्यात आली होती. पं. नेहरूंचे भाषण आकाशवाणीवरून प्रक्षेपित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी घेतली होती.

पंडित नेहरू यांच्या स्वागतासाठी रस्त्यारस्त्यावर जमलेली गर्दी पाहून ते कळंबपासूनच उघड्या गाडीत यवतमाळला आले होते. ते लोकात मिसळतही होते. पंडित नेहरूंनी व्यासपीठावर राष्ट्रसंतांना वाकून नमस्कार केला. नेहरूंना कृषीप्रधान भारत देशाचे प्रतिक म्हणून भारताच्या नकाशात उभा असणारा शेतकरी साकार करणारी काष्ठशिल्पाची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली.
या ऐतिहासिक घटनेचे महत्व कायम जतन व्हावे म्हणून नेहरूंनी ज्या व्यासपीठावरून यवतमाळकरांना मार्गदर्शन केले त्या मंचकाचे ‘नेहरू मंच’ नावाने स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. गोधनी रोडवर आकाशवाणी केंद्राला लागून हा नेहरू मंच आहे. सुमारे 10 फुट उंच मंच बांधण्यात आले होते. हा मंच म्हणजेच नेहरूंची स्मृती आणि यवतमाळ मधील विश्वविक्रमी भूदान चळवळीची स्मृती. आज 14 नोव्हेंबर पंडित नेहरूंचा जन्मदिवस, यानिमित्त भारताच्या या महान नेत्याला अभिवादन…

गजानन जाधव, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here