जर्मनी देशातील पुरामुळे उद्धवस्त झालेलं शहर

ग्लोबल वॉर्मिंगचे भयानक दुष्परिणाम

global warming effects around the world
जर्मनी देशातील पुरामुळे उद्धवस्त झालेलं शहर

मनोज कांबळे
मुंबई, दि. १८ जुलै २०२१: गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या विक्रमी पाऊसामुळे पश्चिम युरोप मधील नद्यांना पूर आला आहे. शुक्रवारी अहर नदीचं पाणी राईन भागातील नागरी वस्तीत शिरलं, तसेच वेस्टफिलिया भागातील रुर नदीवरील धरण फुटल्याने आलेल्या पुरामुळे बेल्जियम आणि जर्मनी या देशातील जवळपास १८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास १३०० हुन जास्त लोक बेपत्ता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुराच्या पाण्याचा वेग इतका तीव्र होता कि वाटेत येणाऱ्या शेकडो घर, गाड्या,रस्ते प्रवाहा सोबत वाहून गेले आहेत. अहरवेलीर जिल्ह्याला पुराचा सर्वात जास्त तडाखा बसला असून जिल्ह्यात ९० लोकांचा पुरात मृत्यू झाला आहे. या पुराचा फटका स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड्स देशांना सुद्धा बसला असून जवळपास १ लाख घरांचं पुरामुळे नुकसान झालं आहे. पुरामुळे पिण्याचं पाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे .

पश्चिम युरोप मधील तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्यांच्या आसपासच्या परिसरात आपातकालीन आणीबाणी जाहीर करण्यात आली असून १५००० हुन जास्त पोलीस, ईमरन्जन्सी कामगारांद्वारे मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. नेदरलँडमधील मेऊस नदी किनाऱ्यावरील शहरातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वासेंनबर्ग भागातील धरण फुटण्याआधीच शुक्रवारी आजूबाजूच्या परिसरातील ७०० लोकांना स्थलांतरित केल्याने मोठी जीवितहानी टळली होती.

पूर येण्यागोदरची दृश्य आणि महापुरा दरम्यानची दृश्य

हवामान विभागाने गेल्या आठवड्यातच ढगफुटीचा इशारा दिला होता. परंतु पाण्याच्या पातळी अपेक्षेपेक्षा जास्त आणि वेगात वाढल्याने असंख्य छोटी शहर आणि गाव उद्धवस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यातून वाहत आलेल्या मलब्यामध्ये शेकडो लोक अडकली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शनिवारी बचाव कार्याच्या लोकांनी ऑस्ट्रिया देशातील सॉल्ज़बर्ग शहरातील पुरात अडकलेल्या लोकांना कोणतीही जीवितहानी होण्याअगोदर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळवल होत. रविवार पर्यंत काही भागात पुराचा जोर ओसरला असला तरी धोका अजूनही तळलेला नसल्याचं बचाव कार्याचे लोक सांगत आहेत. हा युरोप मधील गेल्या ६० वर्षातील सर्वात मोठा अवकाळी पाऊस ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या वातावरण बदलामुळे झाला असल्याचं वेज्ञानिकांचं मत आहे. युरोप मध्ये औद्योगिकरण युग झाल्यापासून जागतिक तापमानाध्ये १.२ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. यामुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ, उष्णेतेच्या लाटा यासारख्या संकटाची तीव्रता भविष्यात वाढत जाणार असल्याचं वेज्ञानिक सांगत आहेत.

ह्याच उदाहरण म्हणजे युरोप मध्ये पूर येण्याअगोदर आठवड्यापूर्वी उत्तर अमेरिकेमध्ये तीव्र उष्णेतेची लाट आली होती. कॅनडा सारख्या बर्फाळ देशात तसेच अमेरीकेच्या वॉशिग्टन, ओरेगॉन आणि कॅलिफोर्निया मध्ये विक्रमी ५० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. या दरम्यान जवळपास ८०० हुन जास्त लोकांचे उष्माघातामुळे मृत्यू झाले होते. नद्या, तलाव मधील पाण्याच्या वरच्या थरात वावरणारे छोट्या माश्यांच्या प्रजाती, कीटक, खेकडे, शिंपले सारखे प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या उष्णेतेच्या लाटेमध्ये जवळ १०० करोडपेक्षा जास्त जलजीवांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज तंज्ञानी व्यक्त केला आहे. तसेच या कालावधीत वाढत्या तापमानामुळे कॅलिफोर्निया राज्यात मोठ्या प्रमाणावर वणवे लागले होते.

उष्णतेच्या लाटेमुळे मृत पावलेले शिंपले, मासे आणि अन्य जलप्राणी

युरोप मधील पूर आणि नॉर्थ अमेरिकेमधील उष्णतेच्या लाटा, वणवे यांसारख्या घटना रोखण्यासाठी जागतिक तापमानवाढ नियंत्रणात आणण्याची गरज आहे. त्यासाठी साऱ्या देशांनी एकत्र येऊन इंधनाचा वापर आणि कारखान्यातून होणार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगाने पाऊल उचलण्याचं आवाहन जगभरातल्या विविध तज्ञानी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here