आदिवासी व अती दुर्गम भागात मुलभूत सुविधांचा अभाव अत्यंत चिंताजनक बाब

रमेश लांजेवार

मो: 9921690779

राज्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे.ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.परंतु खरे वास्तव्य धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थुवानपाणी या अती दुर्गम भागातील आदिवासी गावात धड रस्ताही नसल्याने गर्भवती महिलेला दिनांक 15 जुलै रोज शनिवारला बांबूच्या झोळीतून 6 किलोमीटर पायपीट करीत रूग्णालयात दाखल करावे लागले.ही महाराष्ट्र सरकारची शोकांतिका म्हणावी लागेल.सरकार म्हणते की शासन आपल्या दारी खरोखरच शासन आपल्या दारापर्यंत पोहोचला आहे का याचाही गांभीर्याने सरकारने विचार करण्याची गरज आहे. सरकार अनेक योजना गावगाड्यापर्यंत पोहचविण्याचे दावा करीत आहे.याच माध्यमातून शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु शिरपूर तालुक्यातील थुवानपाणी या अतिदुर्गम भागातील गर्भवती महिलेला पाहून असे वाटते की महाराष्ट्र सरकार अजूनही गावगाड्यापर्यंत मुलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ असल्याचे दिसून येते.

ही समस्या आजची नसुन अनेक वर्षांपासूनची जशीच्या तशीच आहे .महाराष्ट्रात अनेक पक्षांची सरकारे आलीत आणि गेलीत परंतु गेल्या 76 वर्षांपासून गावगाडा हा गावगाडा रहाला हे थुवानपाणी गावावरून लक्षात येते.शहरातील रस्त्यांची सुविधा आवश्यक आहे यात दुमत नाही व त्याचा लाभ सर्वांनाच होत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.परंतु अती दुर्गम भागात गाडी,घोडे, सायकल,बंडी किंवा इतर वाहन चालण्यालायक कमीत कमी रोडची सुविधा असती तर गर्भवती महिलेला इतक्या असहय्य वेदना झेलाव्या लागल्या नसत्या. आदिवासी दुर्गम भागात प्रसुतीकळा असह्य झाल्याने गर्भवती महिलेसाठी तातडीची सुविधा म्हणजे बांबूची झोळी.कधी रात्री, कधी भरपावसात तर कधी कडाक्याच्या थंडीत तर कधी तळपत्या उन्हात हा जीवघेणा प्रवास आजही थांबलेला नाही.

भारत स्वतंत्र होवून 76 वर्ष झालीत परंतु आताही अती दुर्गम भागातील महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतात आदिवासींच्या समस्या जशाच्या तशाच असल्याचे या घटनेवरून दिसून येते याचे जीवंत उदाहरण सर्वांसमोर आहे.हा सर्व प्रकार मुलभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेला आहे. शिरपूर तालुक्यातील थुवानपाणी या गावात किमान मूलभूत सोयीसुविधाही नाहीत.शिरपूर तालुक्यातील गुह्राळपाणी गट ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या या गावात चालण्यायोग्य रस्ता नाही.त्यामुळे प्रसुतीकळा असह्य झालेल्या लालबाई मोतीराम पावरा या आदिवासी महिलेसाठी बांबूला फडके बांधून त्याची झोळी करावी लागली.या गावापासून 6 किलोमिटरवर असलेल्या गुह्राळपाणी आरोग्य केंद्रात त्यांना आणण्यात आले. तेथून रूग्णवाहिकेतून 20 किलोमीटरवरील वकवाड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.या जीवघेण्या प्रवासानंतर महिलेची प्रसूती सुरक्षित झाली.यावरून स्पष्ट होते की आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किंवा अतिदुर्गम भागातील 20 टक्के लोकांपर्यंत मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते.

हीच परिस्थितीत भारतातील अनेक राज्यांमध्ये राहु शकते याला नाकारता येत नाही. आपण अत्याधुनिक युगाकडे वाटचाल करीत आहो.परंतु त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते गावखेडे किंवा अती दुर्गम भागात जातीने लक्ष घालून कमीत कमी मुलभूत सुविधा पुरविणे.परंतु ग्रामीण भागात किंवा अती दुर्गम भागात मुलभूत सुविधा पोहचविल्या जात नाही याचे जीवंत उदाहरण आपल्याला शिरपूर तालुक्यातील थुवानपाणी गावात दिसून आले.याकरीता सरकारला विनंती करतो की चालू अधिवेशनात यावर गांभीर्याने विचार करून गावखेडे भागात व अतिदुर्गम भागात मुलभूत सुविधांवर जास्त भर देवून ग्रामवासीयांना दिलासा द्यावा हीच अपेक्षा! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here