रमजानच्या पवित्र मासात स्वर्गाची द्वारे सताड उघडली जातात. तसेच या मासात श्रद्धेने उपवास पाळणारास गतजीवनात त्याने केलेल्या सर्व पापांना परमेश्वर क्षमा करतो. या महिन्यात उर्मट सैतानास जखडून ठेवले जाते. ‘रमजान’ या अरबी शब्दात समाविष्ट असलेल्या पाच वर्णाक्षरांवरून त्याचा महिमा असा स्पष्ट होतो- परमेश्वराची इच्छा, त्याचे प्रेम, त्याचे अभयदान, त्याचा स्नेह- करुणा व त्याचा दैवी प्रकाश या सर्व गोष्टींचा समावेश म्हणजे पवित्र रमजान मास होय

श्री कृष्णकुमार निकोडे
गडचिरोली
मो. नं. ९४२३७१४८८३

इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९वा महिना हा रमजानचा महिना असतो. तो मुस्लिम बांधवांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो. या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत बंदे सूर्योदय ते सूर्यास्त कडक रोजे- उपवास करतात. रमजान शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे तो रमज या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ आहे जाळणे. उन्हाळ्याच्या ऋतूमधील महिना अथवा या महिन्यातील उपासामुळे व्यक्तीची पापे जाळली जातात. म्हणून याचे नाव रमजान आहे. मुस्लिम बांधवांच्या धर्मातील ५ आधारस्तंभातील हा एक आधारस्तंभ आहे. या महिन्याचे महत्त्व महम्मद पैगंबरांनी विषद केले आहे- “या महिन्यात स्वर्गाचे दरवाजे सताड उघडे असतात व नरकाचे कडकडीत बंद!” [पवित्र कुराण: सुरा क्र.१७९-१८४] मुस्लिम अथवा हिजरी कालगणनेनुसार रमजान हा २९-३० दिवसांचा नववा चांद्रमास आहे. त्याचा ‘रमजान- रमदान’ हा शब्द कडक अथवा भाजून होरपळून टाकणारी उष्णता या अर्थी असलेल्या ‘रमीद’ अथवा ‘अर-रमद’ या अरबी धातूपासून तयार झाला आहे. तो रमजान किंवा रमदान या नावानेही रूढ आहे. इस्लाम धर्माच्या श्रद्धा- शहद, प्रार्थना किंवा नमाज- सलत, दानधर्म- जकात, उपवास- सवम आणि मक्केची यात्रा- हज या पाच मुख्य तत्त्वांपैकी या महिन्यातील रोजा- उपवास हे एक तत्त्व आहे.

मुस्लीम बांधवांच्या उपवासाच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच रमजानचा अर्थात बरकतीचा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना आहे. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना आहे. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना आहे. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच! रमजान महिन्यात इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाच्या अवतरणाचा प्रारंभ झाला, म्हणून या महिन्यात उपवास केले जातात. त्यांना ‘रोजे’ असे म्हणतात. रोजे- उपवासांची सुरुवात रमजान महिन्यात प्रथम चंद्रदर्शन झाल्यानंतर येणाऱ्या पहाटेपासून होते. या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सेवन न करता कडक रोजे केले जातात. सर्व मुस्लिम बंधुभगिनींना हे रोजे बंधनकारक आहेत. लहान मुले, वेडसर व्यक्ती यांना ते न करण्याची सवलत असते. तसेच गर्भवती वा तान्हे मूल असलेल्या व मासिक पाळीत असलेल्या भगिनी; आजारी व प्रवासी यांनाही या नियमांत थोडीफार सूट मिळू शकते. त्यांनी त्या काळात दानधर्म करावा आणि अन्य काळात रोजे करावेत, अशी अपेक्षा असते. या महिन्यातच हजरत महम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत महम्मद पैगंबरांनी तहान, भूक, मोहमाया या सार्‍या गोष्टींना तिलांजली देऊन ज्या परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वत:साठी मुळीच नव्हती. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भलबुर्‍याची, पाप-पुण्याची जाणीव करून देणार्‍या या महिन्यात उपवास करायचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार-विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत गरज भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत्या येऊ शकते.

रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे, एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वर्तुळात राहून करणे होय. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीची मौज काही औरच असते.

रमजानच्या काळात विशेष प्रार्थना म्हटल्या जातात. प्रतिदिन उपवास सोडल्यानंतर रात्री जी प्रार्थना केली जाते, तिला ‘तराविह’ अशी संज्ञा आहे. अनेक मुसलमान या महिनाभराच्या काळात काही विशिष्ट काळासाठी मशिदीमध्ये एकांतात बसून कुराणाचे पठन करतात. या एकांतवासामध्ये ते आवश्यक कारणाशिवाय आपले स्थानही सोडत नाहीत. संपूर्ण काळ ते अल्लाहच्या सान्निध्यात राहतात. तसेच या काळात गोरगरिबांना दानधर्मही केला जातो. रोजे करणाऱ्या व्यक्तीने प्रारंभी आणि रोजे सोडताना त्यांचा हेतू-नियत स्पष्ट केला पाहिजे, अशी ईश्वरी आज्ञा आहे. रमजानच्या उपवासात उद्देश महत्त्वाचा आहे. तुम्ही दिवसभर काही न खाता-पिता उपाशी राहिले, तर ती उपासमार आहे. ‘रोजा’ म्हणजे ईश्वराचे सानिध्य- उप-वास. ते मिळविण्याकरिता उपाशी राहणे आणि सत्कृत्ये करून अल्लाहला प्रसन्न करणे होय. उपवास करण्याचा मुख्य हेतू चित्तशुद्धी व्हावी, मनावरील संयम वाढावा आणि वाईट गोष्टींना दूर ठेवण्याची क्षमता प्राप्त व्हावी, हा असतो. म्हणून या महिन्यात वाईट अथवा खोटे बोलणे, धूम्रपान-मद्यपान करणे, दुसऱ्याला त्रास देणे, प्रणय करणे निषिद्ध मानले आहे. महम्मद पैगंबरांनी सांगितले आहे की, माणसाने उपवासाच्या काळात वाईट मनोवृत्तीपासून अलिप्त राहिले पाहिजे, इतकेच नव्हे तर संतापून जाता कामा नये. खोटे बोलणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे यांपासून दूर न जाणाऱ्यांचा उपवास अल्लाहच्या दृष्टीने व्यर्थ आहे. अर्थात, या काळात अधिकाधिक सद्वर्तन अपेक्षित आहे. मनाचे मागणे पूर्ण करणार्‍या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची पहाट फुलते. घरादारात, मोहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडतो. “चाँद दिख, चाँद दिख” असा गलका आसमंतात चैतन्याचे कारंजे उडवू लागतो. मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व, द्वेष विसरून हस्तांदोलन करतात, आलिंगन देतात. त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जातो. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, पाच वेळेचा नियमित नमाज, कुराणपठण, अल्लाहचे स्मरण व चिंतन करायचे असते. या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते. म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना अत्यंत पवित्र आणि मंगलमय मानला आहे.

रमजानच्या काळात सूर्योदयापूर्वी जे भोजन केले जाते त्याला ‘सहरी’ असे म्हटले जाते, तर सूर्यास्तानंतर जे भोजन केले जाते त्याला ‘इफ्तार’ असे म्हटले जाते. या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसाच्या रात्रीला ‘लैल तुल कद्र’ अथवा ‘शब-इ-कद्र’ म्हटले जाते. ही रात्र पुण्यप्रद हजार महिन्यांपेक्षाही उत्तम असते, असे कुराणात सांगितले आहे. या वेळी ऊद-उदबत्त्या पेटविल्या जातात. प्रार्थना, कुराणाचे पठन होते. या रात्री जे लोक रात्रभर जागे राहतात, त्यांना स्वर्गातून देवदूत आशीर्वाद देतात. ही रात्र मंगलप्रद असून अभय व शांतीची रात्र आहे, असे समजले जाते.

 

हे आपण वाचलंत का?

 

रमजानचा पवित्र व शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच ‘शव्वाल’ या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी महिनाभराच्या उपवासाचे पारणे फेडताना ‘रमजान ईद’ किंवा ‘ईद उल्‌-फित्र’ साजरी केली जाते. शव्वालची चंद्रकोर एकीकडे ईद उल्‌-फित्रच्या आनंदाची ग्वाही देते, तर दुसरीकडे रमजानचे उपवास संपल्याचे सांगते. ईदचा अर्थ पूर्वपदावर येणे असा आहे. म्हणजे उपवास इ. विधी सोडून नेहमीचे जीवन जगणे. आनंदोत्सवात ईमानधारकांनी पैशाची उधळपट्टी करू नये, आपले वर्तन संयमी, विनयशील आणि कृतज्ञतेचे ठेवावे म्हणून ईदच्या दिवशी ईदगाहवर जाऊन दोन रकात नमाज अल्लाहचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पढली जाते. ईदगाहला येण्यापूर्वी उपवास धारकाच्या परिसरातील दुर्बल व्यक्तींना प्रत्येक उपवासधारकाच्या वतीने किमान दोन किलो गहू शक्य तितके लपवून दिले जातात. याचा हेतू हाच की, त्याने खाऊन-पिऊन ईदगाहला नमाजीकरिता यावे. या दोन किलो गव्हाच्या किंवा प्रचलित धान्याच्या हिश्याला ‘फित्रा’ असे म्हणतात. म्हणूनच या ईदला फित्रा वाटप करण्याची ईद म्हणून ‘ईद-उल्-फित्र’ असे म्हणतात.

इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक असल्याने कुराणात याविषयीची आज्ञा अशी- “हे ईमानवाल्यांनो, तुमच्याकरिता रोजे अनिवार्य ठरविले गेले. ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांच्या अनुयायांवर अनिवार्य केले गेले होते. अपेक्षा आहे की, यामुळे आपल्यात ईश्वराचे भय निर्माण होईल. रमजान तो महिना आहे, ज्यामध्ये कुराणाचे अवतरण झाले. जो मानवाकरिता पूर्ण मार्गदर्शक आहे व त्यात अशा स्पष्ट शिकवणी समाविष्ट आहेत. ज्यात सरळ मार्ग, सत्य व असत्य यांमधील फरक उघड करून दाखविणाऱ्या आहेत. म्हणून यापुढे ज्या व्यक्तीला हा महिना मिळेल त्याला हे आवश्यक आहे. त्याने या पूर्ण महिन्याचे रोजे- उपवास करावेत. “जो कोणी आजारी किंवा प्रवासात असेल, त्याने इतर दिवसांत सुटलेले रोजे पूर्ण करावेत. अल्लाह तुमच्याशी सौम्य व्यवहार करू इच्छितो, कठोर व्यवहार करू इच्छित नाही. म्हणून ही पद्धत तुम्हाला दाखविली जात आहे की, ज्यामुळे तुम्ही रोजांची संख्या पूर्ण करू शकाल आणि ज्या मार्गदर्शनाने अल्लाहने तुम्हाला गौरवान्वित केले आहे. त्याबद्दल अल्लाहच्या महानतेचा मनापासून स्वीकार करा, कृतज्ञ बना आणि अल्लाहच्या महानतेचे गुणगान करा.” (पवित्र कुराण: सूरह अल बक्र: आयती १८३ ते ८५). अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव महत्ता या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणा व मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे अशीही या महिन्याची विशेष शिकवण आहे. महिनाभराच्या त्यागाने व शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजेदारांनी ईदचा शिरखुर्मा सर्वधर्मियांसोबत आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच असतो, जो एकमेकांच्या शुभेच्छांनी आणि सदिच्छांनी साजरा करावयाचा असतो, हे विशेष!
!! समस्त बंधुभगिनींना पवित्र रमजानच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here