नागपंचमीचा महिमा अपरंपार…
श्रावण महिना आला की आगळे वेगळे वातावरण निर्माण होते व सणांना सुरूवात होते.श्रावण महिन्यात नागपंचमीला अत्यंत महत्व दिल्या जाते.नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजाअर्चना केली जाते.नागपंचमीचा उल्लेख आपल्याला अनेक पुराणांमध्ये सुध्दा पहायला मिळतो.नागपंचमीचे महत्व भगवान श्रीकृष्णांशी सुध्दा निगडित आहे.याबाबतची कालियामर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
या आख्यायिकेनुसार बालपणातील श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस कालिया नावाच्या नागाला पाठवितो. परंतु श्रीकृष्ण कालियाचा पराभव करतो व यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण सुरक्षीत वर येतात तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी.पराभवानंतर कालिया नाग श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तेथुन निघुन जातो. त्यामुळे कालिया नागावरील कृष्णाच्या विजयाला सुध्दा नागपंचमीच्या स्वरूपात साजरी केली जाते.दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.
अशीही आख्यायिका आहे की एक शेतकरी शेत नांगरणी करीत असतांना नागिणीच्या तीन पिल्लांचा मृत्यू झाला व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी समजूत प्रचलित आहे.त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगर, कोणतेही खोदकाम करीत नाही.त्याचप्रमाणे घरकामात वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही अवजारांचा वापर केला जात नाही.भाज्या चिरायच्या नाही,तव्याचा वापर नाही,कांडन नाही असे काही नियम आजही पाळले जातात.नागपंचमीच्या दिवशी श्रद्धाळू नागदेवतेच्या फोटोंची किंवा मुर्तीची पुजाअर्चना करून दूध-लाह्यांचा व शिऱ्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवतात आणि शेतीचे व आपले संरक्षण करण्यासाठी सर्वच प्रार्थना करतात.
श्रावण माहिन्यात प्रत्येक सोमवार अनेक मंदिरांमध्ये शेज(सजावट)केल्या जाते.त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांच्या ठराविक दिवशी नीटनेटकी सजावट करून संपूर्ण श्रावण महिना पाळला जातो.श्रावण महिन्या सोमवार हा उपवास बहुतेक सर्वच जण करतात व मोठ्या भक्तिभावाने शंकराची, शंकराच्या पिंडेची व नागाची पुजाअर्चना करतात. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण आहे.श्रावण मासात विविध सण येतात त्यापैकी नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा इत्यादी सण येतात.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला शिराळा तालुका नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध आहे.सांगली जिल्ह्यातील हा एकमेव प्रदेश निसर्ग समृद्ध आहे.पूर्वी नागपंचमी उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा.तेव्हा नागपंचमीच्या एक महिना आधी येथील “नाग मंडळे” नाग पकडायच्या मोहिमेला निघत.यानंतर पकडलेल्या नागांची (सापांची) नागपंचमी संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जात असे. नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जायची.परंतु वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार 2002 पासून सापांना पकडण्यावर बंदी आली.त्यामुळे काही वर्षांपासून शिराळ्यात फक्त नागाच्या प्रतीकात्मक मुर्तीची मिरवणूक काढली जाते.सध्या शिराळामध्ये 65 नागराज मंडळे आहेत ही प्रतिकात्मक नाग पूजा करतात व प्रतिकात्मक नागमूर्तीची मिरवणूक काढतात.आज वन्य जीव संरक्षण कायद्यामुळे अनेक प्राण्यांना जीवनदान मिळाले आहे.त्यामुळे संपूर्ण प्राणीमात्रांची जोपासना करण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आहे.
आजही भारतातील महाराष्ट्र,राजस्थान, गुजरात,केरळ, तामिळनाडू या प्रांतात नाग पूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतावर भारतातील तीर्थस्थान नागव्दार प्रसिद्ध आहे.याठीकाणी नागाचा वास मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे याठीकाणी संपूर्ण श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. त्याचप्रमाणे याच परिसरात जटाशंकर नागाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.येथील अशी आख्यायिका आहे की भगवान शंकरजींचे तांडव सुरू असतांना आपल्या केसांच्या जटा याच ठिकाणी आपटल्या होत्या त्यामुळे या तिर्थक्षेत्राला जटाशंकर म्हणून संबोधले जाते.श्रावण महिन्यांत बेलपत्तीला जास्त महत्त्व आहे.त्यामुळे शंकराची व नागाची पूजाअर्चा करतांना बेलफुल वापरण्यात येते.भारतातील प्रत्येक प्राणी, वनस्पती, फुल एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जाते.त्यामुळे नागपंचमीच्या निमित्ताने संपूर्ण प्राणीमात्रांना वाचविण्याचासाठी निसर्ग प्रफुल्लित ठेवणें अत्यंत गरजेचे आहे.
याकरीता श्रावण महिन्याचे व नागपंचमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे.यामुळे निसर्ग प्रफुल्लित राहील व जंगलातील प्राण्यांना जंगलात रहाण्याचा आनंद मिळेल.नागव्दार स्वामी की जय!जय नाग देवता!
रमेश कृष्णराव लांजेवार
माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर
मो.नं.9921690779, नागपूर