Bihar Day : बिहार आणि बौद्ध धम्माचे अतूट नाते

71

बिहार दिवसाच्या निमित्ताने बिहार प्रशासन आणि भारतीयांना ज्ञानाची केंद्रे असलेल्या बौद्ध वास्तूंचे  महत्त्व लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे

बिहार दिवस: बिहार आणि बौद्ध धम्माचे अतूट नाते

मनोज कांबळे
२२ मार्च, मुंबई: जवळपास अडीच हजार वर्षांपूर्वी लुम्बिनीमध्ये जन्मलेल्या एका राजकुमाराने मानवांच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी आपल्या ऐशोआरामी जीवनाचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात बिहारमधील बोधगयेमध्ये येऊन पोहचला. इथल्या निरांजन नदीकाठच्या परिसरातील वृक्षाखाली चिंतन केल्यानंतर त्या राजकुमाराला ज्ञानप्राप्ती झाली आणि कपिलवस्तू मधील तो राजकुमार भगवान बुद्ध बनला. भगवान बुद्धांनी याच ठिकाणी बुद्ध धर्माची स्थापना केली आणि त्याचा प्रचार-प्रसार केला. त्यासाठी तत्कालीन बिहारमधील पायवाटांवरून असंख्य खडतर प्रवास करून बिहारच्या कानाकोपऱ्यात बुद्ध धम्माला रुजवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्यानुसार भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. हा संघर्ष बिहार राज्याने मोठ्या प्रमाणावर पहिला. आजही बिहारमधील महाबोधी बुद्धविहार आणि नालंदा, तक्षशिला विद्यापीठांचे अवशेष बुद्ध धम्माच्या सुवर्णकाळाची साक्ष देत उभे आहेत.

तत्कालीन कर्मकांडाने ग्रासलेल्या समाजाला विज्ञानवादी आणि मानवी क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या बौद्ध धर्माचे तत्वज्ञान बुद्धांनी दिले. त्याचा प्रत्यय बिहारमधील बुद्धिस्ट वास्तूना भेट द्यायला येणाऱ्या असंख्य अनुयायांना येतो. इथल्या विहारांमधील कोरीव काम आणि दगडातून मुर्त्या घडवताना केलेली अप्रतिम शिल्पकला तत्कालीन कलाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

आजच्या काळात ज्यावेळी भारतीय विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी परदेशी जात असतात, प्राचीन काळी नालंदा, विक्रमशिला विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. या विद्यापीठामध्ये फक्त बौद्ध तत्वज्ञानच नाही तर व्यक्तीचा सर्वागीण विकास होण्यासाठी लागणाऱ्या कलाकुसर, आरोग्य, गणित, व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवले जात असे.

आज बिहार दिवसाच्या निमित्ताने बिहार प्रशासन आणि भारतीयांना ह्या वास्तूचे महत्त्व लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. बिहार मधील ह्या वास्तूंच्या संरक्षण आणि संवर्धन संबंधित योजनांचा फेरविचार करून केवळ पर्यटनदृष्टीने नव्हे तर प्राचीन काळी ज्ञानाची केंद्रे असलेल्या या वास्तूंचे गतवैभव परत मिळवण्यासाठी बिहार मधील बुद्धिस्ट वास्तूंच्या विकासाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हे आपण वाचलंत का?