पाऊस कधी येणार? काय आहेत नवीन अंदाज…?

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५

यावर्षी सरासरीपेक्षा कमी आणि उशिरा पाऊस येईल असे भाकीत भारतीय हवामान खात्याने तसेच स्कायमेटने वर्तवले होते. आज ते भाकीत खरे ठरताना दिसत आहे कारण दरवर्षी ७ जूनला येणारा मान्सून अजूनही आलेला नाही. बीपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला असल्याचे कारण या क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहे. आता २३ जूनला मान्सूनचे आगमन होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे हा अंदाज खरा ठरावा आणि वरून राजाने कृपा करावी यासाठी बळीराजाने देव पाण्यात बुडवले आहेत. कारण आपल्या देशातील बहुतांशी शेती ही पावसावर आहे. सुमारे ६० टक्क्यांहून अधिक शेती पावसावर अवलंबून असल्याने बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले आहेत. पाऊस लांबल्याने पेरणी लांबली आहे. पेरणी लांबल्याने शेतीचे वेळापत्रकच कोलमडून पडले आहे गेल्या काही वर्षात हे चित्र सातत्याने पाहायला मिळत होते यावर्षी तेच होणार असे एकंदरीत दिसत आहे.

यावर्षी जून महिन्याच्या सरासरी १० टक्के इतकाही पाऊस झालेला नाही. राज्यातील खरीप पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ०.७७ टक्केच म्हणजेच केवळ १ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून ऊस पिकासह हे सरासरी क्षेत्र १५२. ९७ लाख हेक्टर आहे. पाऊस लांबल्याने आता क्षेत्रात पेरणी देखील रखडली आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली आणि पावसाने ओढ दिली तर त्याचा परिणाम केवळ खरीप हंगमावरच नाही तर रब्बी हंगामांवर देखील होऊ शकतो. पाऊस लांबल्याने कृषी उत्पादनाची टक्केवारी अर्थातच कमी होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाला की महागाई वाढते हे समीकरणच आहे. महागाई वाढली की त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.

यावर्षी पाऊस लांबल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो? देशातील बावीस कोटी जनावरांचा चारा पावसावरच अवलंबून आहे. जर वेळेत आणि पुरेसा पाऊस झाला नाही तर या जनावरांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिह निर्माण होऊ शकते. पोटच्या लेकरांप्रमाणे वढवलेले पशुधन टिकवायचे कसे या विवंचनेत बळीराजा आहे. जर पाऊस वेळेत झाला नाही जनावरांना चारा मिळाला नाही तर देश देशातील दूध उत्पादन घटू शकते परिणामी त्याचा फटका दुग्धजन्य पदार्थांना बसू शकतो. एकूणच पाऊस वेळेत आणि पुरेसा आला नाही तर त्याचा फटका शेतीलाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. देशाची अर्थव्यवस्था आता कुठे रुळावर येऊ लागली असताना हे संकट उभे राहिले असल्याने या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने आतापासूनच तयारी करायला हवी. मागील काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलले आहे. पावसाचे प्रमाण आणि महिनेही बदलले आहेत. जेंव्हा नको तेंव्हा पाऊस पडतो आणि जेंव्हा गरज असते तेंव्हा दडी मारतो. दोन दोन महिने न येणारा पाऊस दोन दिवसात दोन महिन्याची सरासरी पूर्ण करतो मात्र त्याचा आपल्या शेतीला काही उपयोग होत नाही उलट नुकसानच होते. देशातील कृषी क्षेत्र नेऋत्य पावसावर अवलंबून असल्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो.

पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन जून महिन्यात अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील पाण्याचा साठा संपत आल्याने अनेक ठिकाणी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत आहे. जर ऐन पावसाळ्यात ही अवस्था असेल पुढील उन्हाळ्यात काय अवस्था असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. अल निनोमुळे निसर्गचक्र बिघडले असे म्हटले जात असले तरी याला केवळ अल निनोच जबाबदार आहे असे नाही. याला आपण म्हणजे मानव देखील तितकेच जबाबदार आहे हे मान्य करावे लागेल कारण मानवाने कारण नसताना निसर्गावर अतिक्रमण केले. बेसुमार वृक्षतोड करून सिमेंटची जंगले उभारली. जितके वृक्ष तोडले तितके वृक्ष लावले नाहीत या सर्व बाबी निसर्गाच्या लहरिपणास जबाबदार आहेत. आता तरी आपण सुधारायला हवे. वृक्षतोड थांबवायला हवी. निसर्गात मानवाचा होणारा हस्तक्षेप रोखायला हवा. सरकारनेही पाण्याचे योग्य नोयोजन करायला हवे. शेतकऱ्यांनीही मान्सूनच्या बदलत्या आलेखानुसारच शेतीचे नियोजन करायला हवे. 

https://mediavartanews.com/2023/06/10/eye-donation-information/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here