स्पॉटलाईट: विषारीचे वास्तव

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू पिऊन ५५ हुन अधिक लोक मरण पावले. विषारी दारूने लोकांचा बळी जाण्याची ही बिहारमधील पहिली घटना नाही याआधी बिहारमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. केवळ बिहारमध्येच नाही तर देशातील अनेक राज्यात अशा घटना घडल्या आहेत. कोलकात्यात २०११ साली विषारी दारू पिऊन एकाच वेळी १३० नागरिक मरण पावले होते. काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश मध्येही अशीच विषारी दारू पिऊन १०० हुन अधिक लोक दगावले होते. लांब कशाला आपल्या मुंबईमध्येही काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती.

अर्थात बिहारमध्ये या घटना सातत्याने घडतात याचे एक महत्वाचे कारण म्हणजे बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी आहे. त्यामुळे दारू पिणारे लोक जी दारू मिळेल ती पितात. बऱ्याचदा ती खराबच असते. हीच खराब दारू पिणाऱ्यांचा जीव घेऊन जाते. बिहारमध्ये दारू बंदी असल्याने लपून छपून गावठी दारू विकली जाते अर्थात ही दारू देखील पोलिसांच्या संगनमतानेच विकली जाते हे उघड गुपित आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे हात ओले करून अवैध दारू विक्रेते ही दारू विकतात.

गावठी दारूला देशी दारू असेही म्हणतात. ऊसाची मळी आणि काळ्या गुळाच्या मिश्रणापासून ही दारू बनवली जाते. त्यात युरिया आणि बेलाची पाने टाकली जातात. दारूची झिंग वाढावी आणि अधिक नशा व्हावी यासाठी त्यात ऑक्सिटॉक्सिन टाकले जाते. शिवाय काही रसायने देखील मिसळली जातात. जर त्याचे प्रमाण अधिक झाले तर ते मृत्यूला निमंत्रण देणारे ठरते. देशी दारू पिणाऱ्यांचा लवकर मृत्यू होतो यामागचे हे ही एक महत्वाचे कारण आहे. अर्थात दारू ही दारूच असते मग ती देशी असो की विदेशी. दारू आरोग्यास घातकच असते त्यामुळे दारू पासून चार हात लांब राहिलेलेच बरे.

दारूमुळे हजारो कुटुंबे उध्वस्त होतात. महिला आणि मुलांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. संसाराची राख रांगोळी होते म्हणून दारू बंदी केली जाते मात्र दारू बंदी केल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या कमी होते, पिणाऱ्यांचे व्यसन सुटते असे काही नाही उलट दारूचे व्यसन असणारे वेगवेगळ्या मार्गाने दारू मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी ते अधिकचे पैसे मोजतात त्यातूनच काळा बाजार वाढतो. शिवाय सरकारचा महसुलही वाढतो. सरकारला मिळणारा महसूल दारू विक्रेत्यांना मिळतो त्यामुळे दारूची अवैध विक्री करणारे गब्बर होतात.सरकारची तिजोरी मात्र रिकामीच राहते.

आता हेच पहा ना बिहारमध्ये दारूबंदी असल्याने बिहारचा वर्षाला तीस हजार कोटींचा महसूल बुडत आहे. अधिच मागास असलेले बिहार राज्य यामुळे आणखी मागास बनत चालले आहे शिवाय ज्या उद्देशाने दारू बंदी केली तो उद्देशही साध्य होताना दिसत नाही. उलट बंदीमुळे बेकायदा धंदे वाढतात, भ्रष्टाचार वाढतो, गुंडगिरी वाढते. त्याचबरोबर मूळ प्रश्नही सुटत नाही. लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्यासाठी केवळ कायदे करून किंवा दारुबंदी सारखे सवंग निर्णय घेऊन उपयोग नाही. लोकांचे दारूचे व्यसन सुटावे आणि लोक दारू पासून चार हात लांब राहावे यासाठी यासाठी सरकारने लोकशिक्षण आणि प्रबोधनावर भर द्यावा. सरकारने लोकशिक्षण आणि प्रबोधनावर भर दिल्यास लोकच दारू पासून चार हात लांब राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here