येशु ख्रिस्त आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेतील मानवता

ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा 

मो:9823966282

नागपूर: माझ मराठी पहिल्या वर्गाच शिक्षण ‘मिशनरीबोर्ड प्रार्थमीक शाळा धरमपेठ’ या शाळेत झाले. आता त्या शाळेचे नाव बदलेले आहे. शनिवारच्या सकाळच्या शाळेत सामुदायीकरीत्या बायबलच्या कथा सांगण्याचा एक कार्यक्रम असायचा. मुख्याध्यापकाची शुद्धमराठी मणावर सुसंस्कार करून जायची. घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेली सामुदायीक प्रार्थना सायंकाळी म्हटल्या जायची. ज्या माझ्या श्रीगुरूदेव किराणा भंडारचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यां हस्ते १९६४ माझ्या बालपनी झाले. त्या दुकानात भगवान येशुख्रिस्त आणी भगवान गौतमबुद्धाच्या प्रतीमा दर्शनीस्थळी त्याचवेळसपासण विराजमाण माझ्या बालमनावर संस्कार करत्या झाल्या. राष्ट्रसंत लुकडोजी महाराजांनी लिहीलेले आणि त्यांचेच आवाजात गायलेले भजन-

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा ।

मतभेद को भुला है , मंदिर यह हमारा ।

आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी ।

देशी विदेशीयों को, मंदिर य़ह हमारा ॥

या भजनाचे विचार बालमनावर खोलवर संस्कार करून गेले. 

 

येशु ख्रिस्ताचा जन्म :

मी येशु ख्रिस्तांच्या जन्माविषयी जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येते, एका गाईच्या गोठ्यात भगवान येशुचा जन्म झाला. यावरूनच त्यांच्या आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव होते. जसा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संकेत निसर्गाने म्हणजेच निर्माणकर्त्याने आधीच दिला होता. असे त्यांच्या जिवन चरित्रात सांगीतल्या जाते. योसेफ आणि मरिया हे निमित्त होते. योसेफ सुतारकाम करून आपल्या परिवाराचे पालणपोषण करायचे. गरिबीचे चटके आणि श्रमाची किंमत येशूच्या बालमणावर कोरली जात होती. त्याचवेळेस येशूचा जन्म ज्या बेथलहेमात झाला, तेथे हेरोद राजा राज्य करीत होता. रोम सरकारने त्याला सत्ता दिली होती हे खरे; पण कायदा-सुव्यवस्था राखून कर वसूल करीपर्यंतच ! आपली सत्ता कोणी बळकावेल, याची त्याला सर्वात जास्त धास्ती वाटत होती. हेरोदने आपले राज्य टिकावे म्हणून क्रौर्याचा हैदोस घातला होता. लोकांवर अन्याय-अत्याचाराची सीमा गाठली होती. त्यालाही अन्यायाविरूध्द वाचा फोडणारा आणि देवाचे राज्य निर्माण करणाऱ्याच्या जन्माचे संकेत मिळाले होते. २५ डीसेंबर भगवान येशु ख्रिस्तांचा जन्म दिवस सर्व जगभर साजरा केला जातो.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म :

३० एप्रिल, १९०९ ला अमरावती जिल्ह्यातील यावली या आडवडणाच्या गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. ते ‘मेरी जीवनयात्रा’ मध्ये लिहितात-

पैदा हुआ इस देह में, सारा उडा घरबार है I

आयी हवा उस वक्त ही, बंधन से बेडापार है ॥

माँ-बाप कहते थे हंमे ‘तेरे कदम नहि स्थिर हैं ।

पैदाहि होनेसे लगी तेरे पिछे फिर-फिर है’ ॥

खेला नहीं मैं खेल बचपन से बिना प्रभु-नामके ।

चंचल हुआ नहिं मन मेरा कुछ भोग भोग हरामके ॥

मुझसे हुआ नहिं दर्द किसको, औरने चाहे दिया ।

हँसता हि था मैं संकटों में, शक्ति यह गुरू कि ही दया ॥

मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मनाव माणिक होते. जन्मताच त्यांच्या जीवनाची घरघर सुरू झाली होती. जणू विश्वबंधूत्वाच्या सेवेसाठीच त्यांचा जन्म झाला होता. माणिकची आई मंजुळामाय सासरी जातांना वरखेड माहेरी आडकोजी बाबा या अवलियाच्या दर्शनाला गेली. त्यांनी तिला त्यांच्या पुढ्यात असलेला पीकलेला आंबा खायला दिला आणि म्हणाले, ‘महा आंबा घे तुहा आंबा देजो, जो जगाले शिकवण’, असा संकेत दिला होता. याची कबुली राष्ट्रसंतांनी ‘माझी आत्मकथा ‘ मध्ये दिली आहे. ते लिहतात-

माझी जन्म -यात्रा ऐकताना कोणी ।

हसतील मणी नवलावाणे ॥

हीण मी जातीचा, भाटगा कुळीचा 

घरीचा मुळीचा भिकारी मी ॥

घरी पिता करी काम शिंपियाचे ।

त्यावरी आमुचे पोट चाले ॥

तुकड्यादास म्हणे शिकलोसे जरा ।

मराठी तिसरा-चौथा वर्ग ॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःच लिहतात की, “माझा जन्म भारतीय जातिव्यवस्थेने ठरवलेल्या हीन जातीत म्हणजेच भाटगा कुळात झाला. ” मूळचे भिकारपण जन्मताच मिळाले होते. मराठी तिसरा वर्ग पूर्ण चवथ्या वर्गात काही काळ त्यांच शिक्षण झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या गुरू आडकोजी बाबांविषयी लिहतात-

गुरूदेव सद्गुरू आडकोजीने कृपासिंचन किया 

तुम भी भजन लिखते रहो. आशीष यह मुझको दिया ।

तबसे भजन लेखन बढा, इस हाथसे सम्हले नही ।

गंगाप्रवाहित वाक्य रचना सहजही होती गयी ॥

 

गुरूकृपेचा आदर करतांना कुठल्याही अंधश्रध्देचा भाव तुकडोजी महाराजांमध्ये नाही. आंधळा शिष्य म्हणून त्यांची गुरूभक्ती नाही, तर अहंकाराची नशा चढू नये म्हणून समर्पणाच्या भावनेतून ते गुरूला समर्पीत झाले आहेत. ते गुरू कशाला म्हणतात, हे सांगताना लिहितात-

गुरू हाडामासांचा नोहे । गुरू नव्हे जाती संप्रदाय ।

गुरू शुध्द ज्ञानतत्वचि आहे । अनुभवियाचे ॥३५॥ ग्रा.अ.२७

 राष्ट्रसंत तुकडोजींच्या जन्माचा काळ इंग्रजी गुलामशाहीचा होता. भारतीय स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष एकीकडे सुरू असतानाच इंग्रजी राजवटीचे उन्माद, अत्याचार वाढले होते. महात्मा गांधीच्या प्रभावात शांतीने क्रांती, असहकार आंदोलन, मोर्चे, धरणे अशा धोरणातून सुरू होते. दुसरीकडे भगतसींगासारखे क्रांतीकारी बंदुकीच्या गोळीने आझादी मीळवू अशा क्रांतीकारी विचारांची प्रेरणा घेत तरूण वयात फासावर लटकवल्या गेले.भगतसींगाचा ‘इनक्लाबचा नारा’ अनेक क्रांतिकारक निर्माण करून गेला. 

1942 च्या ‘भारत छोडो’ ‘ चले जाव’आंदोलनात विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी क्रांती केली. 

अब काहे को धूम मचाते हो, दुखवाकर भारत सारे , 

आते है नाथ हमारे ।

झाडझडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना ।

पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे ॥

‘लहरकी बरखा’ मध्ये राष्ट्रसंत लिहतात-

अंग्रेज राजा के बखत । अफसर कई थे अड गये ।

भगवान की बेहद कृपा से । सबही नीचे पड गये ॥

ब्यालिस साल में मुझे भी । जेल सहनाही पडा ।

क्रांती हुई बडी जोर की । आवाज मुझ से ही बढा ॥

भगवान येशुख्रिस्त आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्यात अनेक बाबतीत साम्य दिसते. या दोन्ही महापुरूषांचा संघर्ष तत्कालीन समाजव्यवस्था आणि शासनकरत्या जुलमी व्यवस्थेवीरूद्ध मानवता हक्कासाठी लढतांना दिसतात. 

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वराज्याच सूराज्य कस होईल ? जाती,धर्म,पंथ, संप्रदाय राष्ट्रभक्तिने कसे एकत्र येऊन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देतीलत, यावीषयी प्रबोधना सोबतच गाव स्वयंपूर्ण, स्वालंबी, आदर्श व्हाव म्हणून प्रयत्न केले. ते एका भजनातून सांगतात-

‘सुराज्य’ येण्यासाठी उभे पण-मार्ग मधातूनी रूकलाना ॥

धनीक लोभी पैसा सोडी ना, मजूर न कामा नेट धरी I

शेती-शक्ती वाढेल कशी? गोवंश वधाने दूखलाना ॥

दोन्ही महापुरूषांनी मानवमुक्तिचा लढा उभारत लोकांना सामुदायीकतेची जाणीव प्रार्थनेच्या माध्यमातून करून दिली. 

येशुख्रिसत्ताची प्रार्थना :

येशु ख्रिस्त हे महान सामाजिक शिक्षक होते. ते प्रार्थना कशी करायची, या विषयी सांगतात- (मत्तय ६:५-१५ )

“तुमच्या प्रार्थनेचा देखावा करू नका. देखावा करणारे भक्त मंदिरात आणि रसत्यांच्या कोपऱ्यावर सर्वांना दिसेल, अशा जागी उभे राहून प्रार्थना करतात. कारण सर्वांनी आपल्याला पाहावे, अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हाला सांगतो, त्यांना तेवढेच बक्षीस मिळेल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला कोणी पाहू नये याची काळजी घ्या. तुम्ही काय करता ते तुमचा पिता, जो देव, तो तुम्हाला प्रतिफळ देईल. ” “व्यर्थ शब्द वापरून प्रार्थना करू नका. जे देवाला ओळखत नाहीत, ते तसे करतात. त्यांना वाटते, त्यांची दैवते त्यांच्या लांब लांब प्रार्थना ऐकतील. तुमची काय गरज आहे, ते तुम्ही मागण्यापूर्वीच तुमच्या पित्याला माहीत असते. तेव्हा अशी प्रार्थना करा :

हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ्या पवित्र नावाचा सर्व लोक सन्मान करोत.

तुझ्या मार्गाचा सर्वजण स्वीकार करोत.

स्वर्गात तुझ्या आज्ञा पाळतात, तशाच त्या त्यांनी येथेही पाळाव्यात असे होऊ दे.

आज आम्हाला आमच्या गरजेनुसार अन्न दे.

आम्ही केलेल्या चुकांची आम्हाला क्षमा कर.

दुसऱ्यांनी आमच्याविरूद्ध केलेल्या अपराधांची आम्हीही क्षमा करतो.

तू चुकीच्या मार्गाने आम्हाला जाऊ देऊ नकोस आणि त्या दुष्टापासून आम्हाला सुरक्षित ठेव.

“तुमचा अपराध केलेल्यांना तुम्ही क्षमा कराल, तर देव तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करील. तुम्ही त्यांची क्षमा केली नाही, तर तुमचा देवपिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. “

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायीक प्रार्थना :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या युगप्रवर्तक ग्रंथात ‘सामुदायीक प्रार्थना’ हा सत्तावीसावा अध्याय लिहिला. त्या अध्यायाच्या मुखपृष्ठावर ‘प्रेममूर्ती प्रभू येशू ख्रिस्त’ असे लिहलेले चित्र नागपूरातील सुप्रसिद्ध चित्रकार डी. के. मनोहर यांच्याकडून काढून घेतले. त्या चित्रात राष्ट्रसंतांनी सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्या सवंगड्यांना प्रबोधन करताना दिसतात. त्या चित्राखाली त्यांनी ग्रामगीतेतीलच ओवी लिहिली आहे, ती अशी आहे-

येशु ख्रिस्ताने प्रार्थना केली । सर्वांसाठी शांति मागितली ।

सहनशक्तिची देवता पावली । तयालागी ॥८९॥ ग्रा.अ. २७

नाना पंथ असती गावी । भिन्न देव-पूजक, वैष्णव, गोसावी ।

नाना जाती-जमाती एकत्वी । कैशापरी वागतील ? ॥१२॥ ग्रा.अ.२७

त्यासीहि सामुदायिक प्रार्थना । हाचि उपाय असे जाणा ।

जेथे धर्म-पंथ-संत- देव नाना I एकासनी विराजती ॥१३॥ ग्रा.अ.२७

भारत हा विवीध जाती, संप्रदाय, धर्मांनी नटलेला देश आहे. या देशातील सर्व मानवी मनाला ‘सामुदायीक प्रार्थना’ या माध्यमातून एकत्र आणता येऊ शकते, याची जाणीव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना होती. त्यांनी सामुदायीक प्रार्थनेची एक प्रणाली निर्माण केली. जी प्रार्थना सृष्टीच्या निर्माणकर्त्या प्रभूदेवाला हाक देते. त्यांनी एक पांढरे शुभ्र आसन, त्यावर एक पांढराच गोल तकीया याला अधिष्ठान म्हणून स्वीकारले. मूर्तिपूजा, प्रतिमापूजा नाकारली. आपल्या भावनेतला देव तेथे विराजमान आहे त्याची आराधना करां. ही एकात्मता स्वीकारली. तर येशु ख्रिस्ताला सूळावर चढवीले तो क्रॉस प्रतीक म्हणून ख्रिस्तभक्त स्वीकारतात.

मैदान पट बिछाया, डाला है एक आसन । 

सब देवता समाता, मंदिर यह हमारा ॥

सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा ।

मतभेद को भूला है, मंदिर यह हमारा ।

आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी ।

देशी विदेशियोंको, मंदिर यह हमारा ॥

या विशालतेच्या मंदिरात जात नाही, धर्म नाही, पंथ, पक्षही नाही, तर चार भिंतीही नाहीत. चार भिंतींतील बंदिस्त मंदिरही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नाकारले. येशू ख्रिस्तानेसुध्दा चर्चला मंदिर कधीच म्हटले नाही. सामुदायीक उपासनेसाठी त्याची गरज असेलही; पण विशालतेसाठी चार भिंतीची गरज नाही. प्रभू परमेश्वर हा सर्वांसाठी आहे. तो सर्वांचा पालनकर्ता आहे. म्हणूनच महात्मा जोतिबा फुलेंनी येशू ख्रिस्तांबदल लिहले,

ख्रिस्त सर्व ग्रंथ मैदानी आणती

वाचून दावीती स्त्री-पुरूषा 

भटासह -मांगा पोटासी धरती

व्यवहार करती रोटी-बेटी ॥

त्यास ठावे सत्य तेच सीद्ध करी 

नीववी अंतरी सर्व जनां 

सर्व खंडी दावे नाते भावडांचे

पुत्र निर्मिकांचे ज्योती म्हणे 

समग्र वागमय पा.नं. ३५६-३५७

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायीक प्रार्थनेच्या पाठात म्हणतात-

है प्रार्थना गुरूदेवसे, यह स्वर्गसम संसार हो ।

अती उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ॥

ना हम रहे अपने लिये, हमको सभीसे गर्ज है ।

गुरूदेव ! यह आशीष दे, जो सोचनेका फर्ज हेै ॥

महापुरूषांचे जीवनकार्य हे मानवीकल्याना करता असते. आम्ही माणस स्वार्थापोटी त्यांना जात-धर्म-पंथ-संप्रदायात अडकवीण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या मानवी जीवनाच्या आनंदापासून दूर राहतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपला परिचय देतांना लिहतात-

मानवताही पंथ मेरा । इन्सानियत ही पक्ष मेरा ॥

सबकी भलाई धर्म मेरा I दुवीधा को हटाना वर्म मेरा ॥

एक जात बनाना कर्म मेरा । सब साथ चलाना मर्म मेरा ॥

नीच-उँच हटाना गर्व मेरा । गिरते को उठाना स्वर्ग मेरा ॥

प्रेममूर्ति येशुख्रिस्तांच्या बायबालचा विचारही हाच संदेश जगाला सांगत दुःखमुक्तिचा मार्ग सांगतो. येशुमित्रांकडून हाच विचार मला शिकता आला.

 

मीडियावार्तावर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, भाष्य, टीका याच्याशी संपादकिय मंडळ व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

मीडियावार्तच्या बातम्या, लेख, व्हिडिओ आणि रोजगार अपडेट्स व्हॉट्सॲप वर मिळवण्यासाठी क्लिक करा ⬇️ 

https://linktr.ee/mediavarta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here