भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात; अंगाचा थरकाप उडवणारे दृश्य. आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली.
हिरामण गोरेगावकर
24 डिसेंबर: सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार थेट 30 फूट खड्ड्यात कोसळली.
फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाल्याची माहिती आहे.
सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जयकुमार गोरे या अपघातातून थोडक्यात बचावले.गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.आमदार जयकुमार गोरे यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोरे हे पुण्याहून आपली गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला आहे.जेव्हा ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जयकुमार गोरे यांची गाडी खड्ड्याबाहेर काढण्याचे काम सुरू आहे .पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे.