हा प्रलय मानवनिर्मित कि निसर्गनिमित्त…?

मनोज कांबळे: हिमाचल, उत्तराखंड च्या अनेक भागात ढगफुटी, पूर, दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी, नदी किनाऱ्यावर धोका झुगारून बांधलेली घरे, हॉटेल पत्त्यासारखी कोसळत आहेत. यासाठी निसर्गाला कधीपर्यंत दोष देणार?

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड निसर्गसौदर्याने समृद्ध राज्ये पर्यटनानासाठी प्रसिद्ध आहेत. वर्षभरात लाखो लोक या राज्यांत येतात, आणि मग सुरु होते एक जीवघेणी स्पर्धा. रूममधून हिमालयाच्या शिखरांचा नजारा देणारी, डोंगरकड्यांवर, नदीकिनारी अनधिकृत हॉटेल,बंगले बांधले जातात. मग काय होते?

 

निसर्गनियमांकडे दुर्लक्ष करून रस्ते बनवले जातात. त्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली जाते. बांधकामासाठी लागणाऱ्या मालासाठी अनधिकृत खाणकाम वाढते. मग चकचकीत रस्त्यांवरून सोशल मीडियावर “Live” असलेल्या पर्यटकांच्या लोंढ्यानी हॉटेल फुल्ल होतात आणि विध्वसांचा दुसरा टप्पा सुरु होतो.

या भागात नियमांप्रमाणे भरपूर पाऊस पडतो. नद्या, नाले आपल्या हक्काच्या मार्गाने वाहू लागतात. मार्गात असलेल्या हॉटेल, इमारती, रस्त्यांच्या अडथळ्यांना उध्वस्त करतात. दरड कोसळून घर गाडली जातात. नदीकाठच्या इमारती पुरात विलीन होतात. प्रचंड प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी होते.

 

अखेर दोष निसर्गाला दिला जातो. पण अनधिकृत बांधकाम, वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी, राजकारणी मात्र निर्दोष राहतात. फोटो-व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत हॉटेलमध्ये राहणारे पर्यटक मात्र निर्दोष राहतात. हिमाचलमध्ये २४ जूनपासून २३८ लोकांचा मृत्यू, ४० जण बेपत्ता आहेत.

अशावेळी हा प्रलय मानवनिर्मित कि निसर्गनिमित्त? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. पाऊस, निसर्ग त्यांच्या ठिकाणी आहे, आपण अतिक्रमण करतोय, हे कधी कळणार. अन्यथा हिमालयातील अतिसंवेदशील भागातील अनियंत्रित पर्यटन, प्रकल्पांचे गंभीर परिणाम असेच भोगावे लागणार आहेत.

सध्या मनाली आणि शिमलामध्ये तब्बल दहा हजार अनधिकृत हॉटेल्स रूम्स आहेत. सतलज, यमुना,रावी, बियास नदीपात्रांतील खाणकाम दिवसेंदिवस वाढंतंच आहे. याविरोधात पर्यटकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. परंतु केवळ सोशल मीडियासाठी प्रवास करणारे बहुसंख्य पर्यटक याबाबद्दल जागरूक आहेत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here