अलिशान फार्म हाऊसवर बनावट सिगरेट चा काळा धंदा उघडकीस,
कर्जत मधीलइतर फार्महाऊसही संशयाच्या फेऱ्यात
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: फार्म हाऊसचा तालुका अशी ओळख असलेल्या कर्जतमधील एका अलिशान फार्म हाऊसमध्ये काळा धंदा उघड उघडकीस आला आहे. या फार्म हाऊसमध्ये चक्क बनावट सिगरेट कारखाना चालवला जात होता. याची कुणकुण लागताच खात्री पटवून घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी थेट कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 15 आरोपींना अटक केली असून 4 कोटी 94 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील हजारो फार्म हाऊस संशयाच्या फेऱ्यात आले आहेत.
कर्जतपासून काही अंतरावर सांगवी गावात अब्बास यांचा फार्म हाऊस आहे. या फॉर्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लॅग नावाने बनावट सिगरेट बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिली. त्यानंतर अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे यांनी एक पथक बनवले आणि कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, राजेश पाटील, हवालदार यशवंत झेमसे, सुधीर मोरे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, रवींद्र मुंढे यांनी कर्जत गाठून मिळालेल्या माहितीप्रमाणे शोध घेतला. सांगवीत नदीकिनारी असणाऱ्या अलिशान फार्म हाउसला भक्कम तटबंदी आहे आणि उंच कंपाऊंड आहेत. या कंपाऊंडला मोठे दरवाजे असून ते आतून बंद होते. दरवाजे ठोठावूनही कुणीही प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांनी पाठीमागील बाजूकडून कंपाउंडवरून आतमध्ये प्रवेश केला. पोलीसांना पाहून आतील एक कामगाराने दरवाजा उघडला, त्यानंतर पोलिसांना एका मोठ्या गाळ्यात गोल्ड प्लॅग कंपनीच्या नावाचे सिगारेट निर्मितीच्या मशीन आढळल्या आणि तेथे 15 कामगार दिसले.
सिगारेट बनवण्याकरीता लागणारा कागद, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स आणि इतर सर्व साहित्य शिवाय सिगरेट तयार करणाऱ्या तीन मोठ्या मशीन हे सर्व पाहून पोलीस अवाक् झाले. तसेच सिगरेट बॉक्सचे पॅक केलेले कॅरेटही आढळून आले. पोलिसांनी कामगारांकडे सिगारेट निर्मितीबाबत परवान्याची मागणी केली तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर या बनावट सिगरेट कंपनीवर पोलिसांनी कारवाई केली.
कर्जतमधील फार्म हाऊस संशयाच्या फेऱ्यात?
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला कर्जत तालुक्याची फार्म हाऊसचा तालुका ही नवी ओळख आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे येथे अनेक फार्म हाऊस आणि रिसॉर्ट उदयास आले आहेत. त्यामुळे शनिवार-रविवार तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. फार्म हाऊसमध्ये पर्यटक शांतता मिळवण्यासाठी येत असल्याने परिसरातील लोकदेखील सहसा अशा ठिकाणी फिरकत नाहीत. अशावेळी बेकायदा धंदे फार्म हाऊसमध्ये सुरू असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील निर्जन स्थळी असलेले फार्म हाऊसवरवरही संशयाचे धुके निर्माण झालेआहे.
हा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी एकूण 4 कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 2 कोटी 31 लाखाच्या तयार सिगरेट, 15 लाख 86 हजारांचे सिगारेट करण्याचे साहित्य आणि 2 कोटी 47 लाखांच्या सिगरेटच्या मशीन यांचा समावेश आहे.
या आरोपींना अटक
कुमार विश्वकर्मा (मध्य प्रदेश)
कम्मारी राजेश्वर (तेलंगाणा)
लेक राम सोनी (छत्तीसगड)
महमद बशीर (तेलंगाणा)
नारायण सर्यनारायण (तेलंगाणा)
सिध्दार्थ कोल्हटकर (महाराष्ट्र)
मनोहर खांडेकर (महाराष्ट्र)
दुर्गाप्रसाद अनुसुरी (आंध्र प्रदेश)
रवी पिथानी (आंध्र प्रदेश)
युसुब शेख (महाराष्ट्र)
कैलास कोल्हटकर (महाराष्ट्र)
मनीकंटा लावीटी (आंध्र प्रदेश)
हरिप्रसाद चाकली (तेलंगाणा)
सोहेल सिंग (उत्तर प्रदेश)
हरिश मोर्या (उत्तर प्रदेश)