Home latest News नवतपापासून सावध : नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी – जिल्हा आरोग्य...

नवतपापासून सावध : नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे आवाहन

19

नवतपापासून सावध : नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे आवाहन

गोंदिया, दि.26 : जिल्ह्यात सध्या वाढत्या तापमानासोबत “नवतपा” कालावधी सुरू झाला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदिया यांच्या वतीने उष्माघात प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

डॉ.अभिजीत गोल्हार म्हणाले, “नवतपा” हा उन्हाळ्यातील अत्यंत उष्ण असा सलग नऊ दिवसांचा कालावधी मानला जातो. या काळात सूर्याची तीव्रता वाढल्याने वातावरणातील तापमान अत्यंत जास्त होते. त्यामुळे उष्माघात, निर्जलीकरण, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी प्यावे. लिंबूपाणी, ताक, ओआरएस, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे. हलक्या रंगाचे, सैल आणि सूती कपडे वापरावेत. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा.

दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास सावलीत थांबत प्रवास करावा. उन्हात उभ्या असलेल्या वाहनात लहान मुले किंवा वृद्धांना एकटे सोडू नये. जड व्यायाम किंवा श्रमाची कामे टाळावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.गोल्हार पुढे म्हणाले, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित व्यक्तीला थंड व सावलीच्या ठिकाणी न्यावे, पाणी द्यावे आणि शरीर थंड करण्याचा प्रयत्न करावा. व्यक्ती बेशुद्ध झाल्यास किंवा प्रकृती गंभीर वाटल्यास तात्काळ 108 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले असून आवश्यक औषधे, ओआरएस, पिण्याचे पाणी आणि उपचार सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे.

नवतपाच्या काळात प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. सावधगिरी बाळगल्यास उष्माघातासारख्या गंभीर समस्यांपासून संरक्षण मिळू शकते,” असा संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी नागरिकांना दिला.