निर्दयी बापाला जन्मठेप?

 

      निर्दयी बापाला जन्मठेप? शिर्षक वाचून कोणालाही संशय निर्माण होवू शकतो. तशी ही एका प्रसिद्ध वर्तमानपत्राची बातमी आणि हा नागपूर उच्च न्यायालयाचा निकाल. निकालाचं स्वागतच. कारण जसं बातमीचं शिर्षक वाचून संशय वाटतो. तशी ती बातमी संशयाचीच आहे. 

           मी बातमीचं आधी शिर्षक वाचलं. तसा मतितार्थ वा मथळा वाचला नाही व न वाचताच विचार केला की असं कसं उच्च न्यायालयानं असा बापाच्या कृत्याचा न्याय दिला. त्याचं कारणही तसंच होतं. मला वाटलं की मुले त्याची म्हातारपणात सेवा करीत नसतील. म्हणून त्या मुलांना मारले असेल. त्यात काय गैर झाले? मुलाला जन्म द्या. लहानपणी खावू पिवू घाला. त्याला उन्हातून सावलीत न्या. शिक्षण शिकवा व पालनपोषण करुन त्या मुलांना आपल्या पायावर उभे करा. मग ती मुलं मोठी झाली आणि मायबापाच्या हातात काठ्या आल्या की मायबापाची सेवा जर करीत नसतील तर अशा मुलांचा राग आल्यानं त्या मुलांना मारलं तर काय झालं? असा माझा विचार. मग मी बातमी वाचली. बातमी होती संशयाची. 

          एक पिता. त्यानं आपल्या मुलांना जन्माला घातलं. त्याला दोन मुलं होती. एक पाच वर्षाचा आणि दुसरा तीन वर्षाचा. तसं पाहता पत्नी व पतीचं भांडण. ते भांडण एवढं विकोपाला जाईल असं वाटलं नव्हतं. त्याच भांडणातून तिच्या चारित्र्यावर संशय. एवढा संशय की तो नेहमी म्हणायचा. ‘ही माझी मुलं नाहीत’ यातच एक दिवस त्यानं त्या दोन्ही मुलांवर विषप्रयोग केला. तो प्रकार त्या मुलांच्या आईच्या लक्षात येताच तो प्रकार फसला. तसा तो त्या मुलांना आपली मुलं समजतच नव्हता व त्यांना मारण्याची संधी शोधत होता. तशी एक दिवस नामी संधी चालून आली व एक दिवस त्यानं अतिशय निर्दयीपणानं मुलांची हत्या केली. त्या मुलांना विहिरीत ढकलून ठार केले. 

         अलिकडे असंच चालंलय. ब-याच घरी पती पत्नींचं भांडण होत असतं. त्यांना मुलंही असतात. परंतु ते सुधारत नाहीत. भांडण एवढे विकोपाला जातात की ते आपलं सुख शोधत असतात. अशावेळेस कधी तो आपले म्हणणे ऐकून घेणारी मैत्रीण शोधत असतो तर कधी ती आपले बोलणे ऐकून घेणारा एखादा मित्र शोधत असते. हा मित्र वा मैत्रीण त्या दोघांना बोलतांना मनातून आधार देते. परंतु यात धोका हा असतो तो संवयाचा. तो संशय बळावत असतो. तसाच असा मित्र वा मैत्रीण वेळ पडल्यास आपल्याला प्रसंगी मदत करीत नाही. केवळ मतलबासाठी आपल्याशी लगट करतो. संधीचा फायदा घेतो व मदतीची वेळ आल्यास आपल्यापासून कोसो दूर निघून जातो. 

           कशाला हवेत असे आपल्या जीवनात लग्नानंतरचे असे मित्र की ज्याच्यामुळं आपलाच संसार तुटावा? तसे मित्र आपण सोडून द्यायला हवेत की नाही. परंतु कोणीच त्यावर विचार करीत नाही व कोणीच त्यावर अंमल करीत नाही. कोणीच असे मित्र सोडायला तयारही होत नाहीत की ज्याच्यामुळं आपल्या संसारात द्विधा निर्माण होते. परंतु त्यामुळंच संसार तुटतो. मुलाबाळांचंही नुकसान होतं व आपलंही. याचा विचार प्रत्येकांनी करण्याची गरज आहे. तसा विचार प्रत्येकांनी करावा. 

           अलिकडे असे प्रकार बरेच वाढले आहेत. व्हाट्सअपनं व स्टेट्सनं जग जवळ आले आहे. लोकं स्टेट्सवर काहीही ठेवतात. विचार करीत नाहीत की काय ठेवावं व काय नको. तसं एका तरुणानं धार्मिक भावना दुखविणारी पोष्ट ठेवल्यानं त्याचाही निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. चांगला दंड ठोठावला. पती पत्नीच्या भांडणात असा मित्र वा मैत्रीण मधातच येते. तसं पाहता शहाणी मंडळी म्हणतात की पती पत्नीच्या भांडणात कोणीच पडू नये. परंतु तरीही अशा मित्र मैत्रीणीचा त्यांच्या जीवनातील प्रवेश म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं काम. यात कधी ती आपली पोळी शेकून जाते तर कधी तो. त्यावेळेस ते दोघंही जण आपल्याला मुलं आहेत. आपण मुलं जन्मास घातलेली आहेत. त्यांचं अतोनात नुकसान होणार आहे याचं भान विसरतात व गैरपावलं टाकत असतात. ते आपला संसार तुटेल याचाही विचार करीत नाहीत व असला जीवघेणा खेळ खेळत असतात. 

          कालपर्यंत ठीक होतं की स्री चार भिंतीमध्ये बंदीस्त होती. तिला बाहेर पडायचा रस्ता नव्हता. तिचा घरातल्या घरात दम घुटत होता. तिला शिक्षण घेता येत नव्हतं. ती गुलाम होती. मी आणि माझी मुलं व माझा परीवार एवढाच तिचा संसार होता. ती चूल आणि मूल यामध्येच अडकलेली होती. तिचं ते नुकसान होतं. परंतु एक फायदाही होता. तो म्हणजे या काळात स्री फक्त चूल व मुल यातच गुरफटलेली असायची. तिला कोणत्याही पुरुषांसोबत मैत्री करता येत नव्हती. तो पुरुषांना फायदाच होता. कारण अशी स्री कोणत्याही पुरुषाबरोबर मैत्री करुच शकत नसल्यावर त्या पुरुषांना तिच्या चारित्र्यावर संशय घेता येत नव्हता. तसा पुरुष स्वतंत्र्य असल्यानं तो मात्र कित्येक मैत्रीणी ठेवत असे. अशा कितीतरी पुरुषांनी कितीतरी पत्नी केलेल्या आहेत. हा गतकाळातील इतिहास. काल स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्य नसल्यानं तिला दुर्भाग्याचं जगणं व पुरुषांची कळसुत्री बाहूली म्हणून जगावं लागलं. कारण तिला उत्तुंग भरारी मारता येत नव्हती. तद्नंतर पाश्चात्यांचा प्रवेश झाला. सामाजीक क्रांती झाली. संविधानानं संरक्षण दिलं. मुली शिकायला लागल्या. नोकरी करायला लागल्या. कामासाठी मित्र पकडावे लागले. त्यांच्यासोबत फिरावे लागले. याचा अर्थ असा नाही की त्या स्रिया व्याभीचारी बनल्या? तरीही आज त्यांच्या चारित्र्यावर संशय आणि त्यातच भांडणं व ती भांडणं एवढी विकोपास जाणं की मुलेही अप्रिय व्हायला लागलीत. स्वतः जन्मास घातलेली मुलं. हं, ती मुलं कुकर्मी असली तर ठीक आहे. परंतु कुकर्मी मुलांचीही कोणी हत्या करीत नाही. कारण ती मुलं स्वतःची मुलं असतात. त्यांच्याबाबतीत मायेचा ओलावा असतो. 

          पर्यायानं सांगायचं झाल्यास कालपर्यंत ज्या पुरुषांनी दोन दोन पत्न्या केल्या. त्या पत्न्या कालच्या स्रियांनी नाईलाजानं सहन केल्या. खरंच त्यांना त्या सवती सहन होत असतील काय? ती पुरुषांची चूक नव्हती काय? अन् आज त्याच स्रिया जर असे मित्र ठेवत असतील, तर त्यात गैर काय? आज स्रिया शिकल्या. सुशिक्षीत झाल्या. नोकरी करुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राहिल्या. कामासाठी मित्रांची मदत घेवू लागल्या नव्हे तर घ्यावीच लागते तर त्यात त्याची एलर्जी पुरुषांना का असावी? याचाच अर्थ आम्ही काहीही केलं तरी चालेल, तुम्ही काहीच करायला नको? याचाच अर्थ असा की वरवरच समानता? अन् आतून…… आतून पोखरलेली मानसिकता? याला समानता वा स्रियांचं स्वातंत्र्य तरी म्हणता येईल काय? खरंच आम्ही पुरुष मंडळींनी स्रियांना स्वतंत्र्यता प्रदान केली तरी आहे का? की आमच्या वरवरच बाता आहेत? यामुळंच आज घटस्फोटापर्यंत मजल गाठत आहेत स्रिया. कारण त्यांना पुरुष चार भिंतीत बंदीस्त करु पाहात आहे आणि त्या बंदीस्त व्हायला नकार देत आहेत. म्हणूनच आज घराघरात भांडणं आहेत. भांडणं एवढी विकोपाला जात आहेत की त्या भांडणाचा श्रीगणेशा घटस्फोटात होत आहे. कधी मुलांचे तर कधी पत्नींचे खून होत आहेत. चारित्र्यावरचे संशय बळावले आहेत.

           महत्वाचं सांगायचं झाल्यास तुम्ही जसे पुर्ण पती आहात. तशी तुमची पत्नी ही पुर्ण पत्नी आहे. त्यानंतर झालेली तुमची मुलंही तुम्ही माना अगर नको माना, पुर्ण मुलं असतात. त्यांची जबाबदारी वाहाणं. त्यांना सांभाळून घेणं. रुसवे फुगवे जोपासणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. असा संशय नकोच मनामध्ये. संशयावरुन घर तुटतं व त्याच संशयावरुन बाप निर्दयी होतो व तो पलीकडे जावून आपल्याच स्वमुलांची हत्या करतो. कधी आईही संशयी होवू पाहते व तिही आपल्या बाळाची हत्या करु पाहते. 

          महत्वपुर्ण गोष्ट ही की मुलं जन्मास घालण्यापुर्वी दहा वेळा विचार करायला हवा की आपण काहीही होवो. भांडण एवढं विकोपाला जावू देणार नाही. असा विचार करुनच मुलं जन्मास घालावी. अन्यथा मुलं जन्मास घालून वा असा संशय घेवून मुलांना मारु नये म्हणजे झालं. पत्नीनही तसंच वागावं. तिनंही आपल्या पतीला संशय होणार नाही. याची काळजी घ्यावी. कारण लग्नानंतरचे मित्र मैत्रीणी हे फक्त मतलबापुरते असतात. जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते, तेव्हा कोणी कोणाला कधीच मदत करीत नसतात. हे वाटल्यास आजमावून पाहा. आपला संसार पाहा. मित्र नको. परीवारात अशा गोष्टीनं संशय बळावत असेल तर मित्र मैत्रीणी सोडून द्या. एखाद्या वाईट व्यसनासारखं. परंतु आपला सुखाचा संसार तोडू नका. घटस्फोटापर्यंत जावूच देवू नका. मुलांना व्यथा भोगायला लावू नका. मुलांचा विचार करा. त्यांना जन्मास घातलं ना. मग जबाबदारी ओळखा. त्यांना लहानाचं मोठं करा. खुप शिकवा. त्यांना पायावर उभं करा. भांडणं नक्कीच करा. पती पत्नी आहात. भांडणं होणारच. परंतु ती भांडणं एवढी विकोपाला जावू देवू नका की आपण आपलीच मुलं मारुन टाकू. तसंच एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या आईबापांनाही आपल्या पुत्रागत सांभाळा. सासुसास-यांनाही लेकरागत सांभाळा. कारण त्या चार जिवांमुळंच तुमचा संसार जुळतो. फुलतो आणि वाढतोही. हे काळजीनं लक्षात ठेवा. त्यांनाही अंतर देवू नका. यातच तुमचं भलं आहे हेही तेवढंच लक्षात ठेवा. 

अंकुश शिंगाडे

नागपूर, मो:९३७३३५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here