शेतकऱ्यांच्या सामुहीक आत्मदहनाच्या ठाम निर्णयामुळे नमले पेण प्रशासन…
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
पेण :-रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात खार बंदिस्तीवर जेएसडब्लू कंपनीच्या आक्रमणामुळे खारमाचेला येथील शेतकरी सामुहीक आत्मदहन करण्याच्या तयारीत होते. शेतकऱ्यांच्या सामुहीक आत्मदहनाच्या ठाम निर्णयामुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
बंदिस्ती समोर बांधण्यात आलेला बंधारा मोकळा करण्यात आला असून पंधरा दिवसात चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेली उघाडी तोडण्यात येऊन नवीन बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला. जेएसडब्लू कंपनीने पोलीस बळाचा वापर करून दबावतंत्र अवलंबून खारमाचेला येथे खारलॅन्ड विभागाची परवानगी न घेता पूर्वापार चालत असलेली उघाडी तोडली होती.याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही खारलॅंड विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत होते. खारलँड विभागाचे आदेश झुगारून जे.एस.डब्ल्यु. कंपनीने बेकायदेशीरपणे व पुर्ण चुकीच्या पध्दतीने खारमाचेला उघाडीमध्ये व सर्व्हे नं. ९४ मधील नैसर्गिक नाल्यात बेकायदेशीरपणे टाकलेले पाईप व भराव तात्काळ काढून टाकणे, खारलँड विभागाचे निरिक्षणाखाली आमची पुर्वी होती तशी परंपरागत उघाडी तात्काळ बांधून मिळावी या व इतर मागण्यांची पूर्ततेसाठी आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पेण प्रांत कार्यालयात आत्मदहन करण्यात येणार होते.
शेतकऱ्यांनी आत्मदहन करू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या घरीच ताब्यात घेण्याची हालचाल देखील पोलिसांनी केली होती.परंतु शेतकरी घरी न सापडल्याने शेतकऱ्यांना नोटीसी बजावण्यात आल्याची माहिती आहे. शेतकरी आज आत्मदहन करणार असल्याने प्रांत कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही यावेळी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला होता.यावेळी खारलॅण्डचे अधिकारी सु. ह. सावंत यांनी सदर उघाडी समोरील बांधण्यात आलेल्या बंधारा जेसीबीच्या साहाय्याने मोकळा केला. तसेच पंधरा दिवसांत चुकीच्या पध्दतीने बांधलेली उघाडी मोडून नव्याने बांधणार असल्याचे सांगितले.
जेएसडब्ल्यूचे अधिकारी नारायण बोलबुड्डा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “‘ खारलँड विभागाने आमच्याकडे सदर बंदिस्ती दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार सीएसआर फंडातून हे काम खारलॅण्ड विभागाच्या सहकार्याने ही बंदिस्ती आम्ही बांधली असल्याचे “‘ सांगितले.