नेपाळमध्ये चीन धार्जिणे सरकार, भारतासाठी धोकादायक?

श्याम ठाणेदार 

दौंड जिल्हा पुणे       

मो: ९९२२५४६२९५

नेपाळ हा भारताचा सख्खा शेजारी देश असून भारताच्या मित्र देशांपैकी एक देश आहे. भारत आणि नेपाळची संस्कृतीही जवळपास सारखीच आहे. जगातील एकमेव हिंदू देश अशी नेपाळची ओळख आहे. स्वातंत्र्यापासून नेपाळशी आपले सौहार्दाचे संबंध आहेत. साडेचार कोटी लोकसंख्या असलेल्या आणि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या निसर्गसंपन्न देशाची भारताची मैत्री जगजाहीर होती. भारत आणि नेपाळ मैत्रीचे संबंध इतके जवळचे होते की नेपाळची सीमा देखील आपण मुक्त केली आहे म्हणजे नेपाळमधील कोणताही नागरिक व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करू शकतो तसेच भारतात व्यवसायही करू शकतो.

नेपाळचे लाखो नागरिक आज भारतात वास्तव करून आहेत. दोन्ही देशात रोटी बेटीचा व्यवहार देखील होतात. असे असले तरी गेल्या काही वर्षात नेपाळ आणि भारतात कटुता निर्माण झाली आहे. ही कटुता भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण नेपाळमध्ये सत्तेत आलेले नवे सरकार हे भारत विरोधी असून चीन धार्जिनी असलेली व्यक्ती नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली आहे. 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे ( सिपीएन ) प्रमुख आणि माजी पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड हे पुन्हा नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. नेपाळमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली मात्र या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने प्रचंड व माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी युती करून सरकार स्थापनेचा दावा केला. प्रचंड व ओली शर्मा या दोन्ही नेत्यांत झालेल्या करारानुसार प्रचंड पहिले अडीच वर्ष नेपाळचे पंतप्रधान असतील तर के पी ओली शर्मा हे नंतरचे अडीच वर्ष पंतप्रधान राहतील. याचाच अर्थ पुढील पाच वर्ष हेच दोन नेते नेपाळचे पंतप्रधान राहतील आणि त्याचमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे कारण हे दोन्ही नेते भारत विरोधी असून चीन धार्जिणे आहेत. 

याआधी जेंव्हा जेंव्हा हे दोघे पंतप्रधानपदी विराजमान झाले त्या त्या वेळी त्यांनी कायम भारताच्या कुरापती काढून भारताला त्रास देण्याचेच काम केले. अर्थात हे सर्व त्यांनी चीनच्याच सांगण्यावरून केले हे उघड आहे. भारताच्या शेजारी असलेल्या देशांना साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करून भारताविरुद्ध फितवायचे आणि स्वतःकडे वळवायचे असे चीनचे धोरण आहे. या धोरणाला बळी पडून प्रचंड आणि ओली या दोघांनी भारताला आव्हान दिले होते. त्यामुळे दोन्ही देशात कटुता निर्माण झाली होती. 

ओली शर्मा पंतप्रधान असताना त्यांनी अनेकदा भारत विरोधी वक्तव्य केली होती. प्रचंड हे ही भारतावर अनेकदा टीका करतात आणि नक्षलवादाचे समर्थन करतात. मागे ते पंतप्रधान असताना त्यांनी भारताचा काही भाग नेपाळच्या नकाशात दाखवला होता त्यामुळे दोन्ही देशात मोठा तणाव निर्माण झाला होता आता ही ते तीच भूमिका घेऊ शकतात. चीन त्यांना असे करण्यास बाध्य करू शकतो. 

मागील काही वर्षात चीनने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीन नेपाळच्या सीमेवर रस्ते आणि लोहमार्ग बांधत आहे. इतकेच नाही तर भारताच्या सीमेवर असलेल्या गावांत चीनने बांधकाम केले आहे. नेपाळ लष्कराने काठमांडू – ताराई – मधेश दृदगती मार्ग बांधण्यासाठी चीनच्याच कंपनीला काम दिले आहे. आता प्रचंड पंतप्रधान बनल्यानंतर चीन नेपाळमध्ये आणखी बस्तान बसवणार त्यामुळे भारताची चिंता वाढणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here