पाणी न पिता वाऱ्याच्या वेगाने धावून वानरांची शिकार करणारे हडझा लोक

हडझा लोक आपल्या आधुनिक जीवन शैलीपासून दूर असले तरी आधुनिक मानवाच्या प्रगतीचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत 

पाणी न पिता वाऱ्याच्या वेगाने धावून वानरांची शिकार करणारे हडझा लोक

मनोज कांबळे
३१ मार्च, मुंबई: खरतर मानवजातीची सुरुवात जंगलातूनच झाली. पुढे आपल्या बुद्दीमत्तेच्या जोरावर प्रगती करत आज मानव झगमगत्या शहरांपर्यंत येऊन पोहचला आहे. या दरम्यान मानवाने अनेक चांगल्या गोष्टी मिळवल्या, पण त्याचबरोबर अनेक नैसर्गिक देणगी असलेल्या गोष्टींना मानवाने गमावले आहे. आधुनिक जीवनशैली, त्यासोबत येणारी खाद्यसंस्कृती, औषधे यामुळे सध्याच्या मानवामध्ये अनेक जनुकीय आणि शारीरिक बदल झाले आहेत.

हे बदल आणि जीवनशैलीतील फरक नक्की काय आहेत हेच पाहण्यासाठी डॉ. ऍंथोनी गुस्टीन यांनी आधुनिक मानवाच्या चालीरीतींपासून दूर असलेल्या अजूनही आदी मानवाच्या जीवनशैलीशी मिळती जुळती जीवनशैली जगणाऱ्या टांझानियातील हडझा आदिवासी जमातीच्या लोकांचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांच्यासोबत ते राहिले, शिकार केली, अन्नपान केले.

याददरम्यान मानवी आरोग्याच्या संबधी आश्चर्यकारक बाबी त्यांच्या लक्षात आल्या.काय आहेत या बाबी  चला वाचू.

शाकाहारी पेक्षा मांसाहारच श्रेष्ठ
हडझा शाकाहारापेक्षा मांसाहारालाच प्राधान्य देतात. त्यांच्या आहारामध्ये जंगली कंदमुळे, बेरिझ, यांचा क्वचित समावेश असतो. परंतु त्यांचे मुख्य अन्न हे शिकार केलेल्या जंगली प्राण्यांचे मांस हेच असते.

 

जॉगिंग नाहीच
शहरी भागात राहणाऱ्या लोकांच्या आयुषयात जॉगिंगचे महत्त्व फार असते. त्यांच्या दिवसाची सुरुवातच जॉगिंगने होते. पण हडझा आदिवासी जमातीच्या लोकांमध्ये याला अजिबात स्थान नाही. एकतर ते शेकडो किलोमीटर अंतर चालतात, किंवा वाऱ्याच्या वेगाने धावतात.

पाण्याची गरज नाही
हडझा लोकांचे पाण्याचे सेवन करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. जिथे डॉ. ऍंथोनी गुस्टीन आणि त्यांची टीम दर अर्ध्या तासानंतर पाण्याच्या बाटल्या रिकाम्या करत होते, तर दुसरीकडे हडझा लोक तासनतास बिना पाण्याचे राहू शकत होते. तितक्याच ताकदीने शिकारीसाठी धावत होते. आणि तहान लागलीच तर कुठल्याही छोट्याश्या डबक्यातील चिखल मिश्रित पाण्याचे दोन घोट त्याच्यासाठी पुरेशे होते. या पाण्याचा त्यांच्या प्रकृतीवर कोणताही वाईट परिणाम झालेला डॉ. ऍंथोनी गुस्टीन याना आढळला नाही.

मांसाहारापेक्षा मध जास्त प्रिय
हडझा लोक शिकार झाल्यानंतर मांस शिजवून खाण्यासाठी वाट पाहू शकतात. परंतु मधाचे पोळ दिसल्यास मात्र त्यांना धीर राहत नाही. हडझा लोकांना जंगली मध फार प्रिय असतो, त्यासाठी मग ते झाड किती उंच आहे, मधमाश्या हल्ला करत आहेत, यासारख्या गोष्टींची पर्वा करत नाहीत.

कोणत्याही वातावरणात जगण्याचे कौशल्य
हडझा जमातीचे लोक एक मिनिटाच्या आत कोरड्या लाकडांपासून आग पेटवू शकतात. झाडाच्या फांद्यांपासून हत्यारे बनवू शकतात. शिकारीच्या वेळी झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी कोणत्या झाडांच्या पानाचा वापर करता येईल हेही त्यांना माहित असते.

 

अन्नाचा आदर
जेव्हा भूक भागवण्यासाठी जेंव्हा तुम्हाला स्वतः शिकार करावी लागते, त्यावेळी शिकार करण्यासाठी दीर्घ वाटसुद्धा पाहावी लागते. त्यामुळे मेहनत करून मिळवलेल्या अन्नाचा हडझा लोक फार आदर करतात. शिकार केलेल्या प्राण्याला आगीमध्ये भाजून पहिल्यांदा त्यांच्या यकृताचे (लिव्हर) सेवन केले जाते. मग काळीज, मेंदू आणि इतर भागांचे सेवन केले जाते. जेवण करताना घाई न करता, वेळ घेऊन संथपणे मासांचा आस्वाद घेतला जातो. डॉ. ऍंथोनी गुस्टीन यांच्या मते हे हडझा लोकांच्या सुदृढ पचनसंस्थेचे एक मुख्य कारण असावे.

 

 

वानरांची शिकार
मांसाहारासाठी हडझा लोक वानरांची मोठ्या प्रमाणावर शिकार करतात. पण त्यानंतर वानरांच्या शरीराचा कोणताही अवयव टाकाऊ समजला जात नाही. मांस, मेंदू लोक अन्न म्हणून शिजवून खातात. हाडे आणि आतड्या जंगली शिकारी कुत्र्यांसाठी असतात. आणि कातडीपासून कपडे तयार केले जातात. निसर्गातून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर करण्याची वृत्ती हडझा लोकांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते.

 

डॉ. ऍंथोनी गुस्टीन यांच्या आपल्या अनुभवाच्या आधारे सांगतात कि हडझा लोकांसारखेच चिखलमिश्रित पाणी पिणे, आधुनिक जीवनशैलीपासून दूर असणे म्हणजेच योग्य जीवन आहे असे नव्हे. परंतु आधुनिक मानवाला हडझा लोकांच्या जीवनशैलीपासून काही गोष्टी नक्कीच घेण्यासारख्या आहेत. निसर्गाचा सन्मान करणे, आपली शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी कृत्रिम औषधांचा कमी वापर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिळालेल्या अन्नाचा आदर करणे.

 

हे आपण वाचलंत का?

 

हडझा लोक आपल्या आधुनिक जीवन शैलीपासून दूर असले तरी आधुनिक मानवाच्या प्रगतीचे दुष्परिणाम त्यांच्यावर होत असल्याचे डॉ. ऍंथोनी गुस्टीन यांना दिसले. टान्झानिया मध्ये होणारी अवैध आणि अनियंत्रित वृक्षतोड, खाणकाम, व्यावसायिक शेती यामुळे जंगले नष्ट होत आहेत. यांमुळे कधीकाळी आपल्या रहिवासापासून १ किलोमीटर अंतरावर हडझा लोकांना शिकार मिळत असे, आजच्या घडीला त्यांना शिकार मिळण्यासाठी ३० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here