दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या अडचणी कधी दूर होणार…?

     आपला भारत देश स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले पण, एकीकडे झपाट्याने विकास होताना दिसत आहे तर दुसरीकडे अर्धाही विकास झालेला दिसून येत नाही. शहरात होणारा विकास दिवसेंदिवस वाढतच आहे पण,दुर्गम भागाकडे बघितले तर मात्र तेथे राहणारे लोक कसे जीवन जगतात हे जाणून घ्यायला कदाचित फारसं कोणाकडे वेळ नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. दुर्गम भाग कोठपर्यंत दुर्गमच रहावा तिथे राहणारे लोक कोठपर्यंत अडी, अडचणींचा सामना करावे हेच सध्याच्या परिस्थितीत कळत नाही.एकदा पावसाळा सुरू झाला की, दुर्गम भागातील लोकांच्या विषयी दरवर्षी ह्या पावसाच्या पुरामुळे अनेक अडी, अडचणींचा सामना करतांना च्या बातम्या वृतपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळत असतात. मग ते गर्भवती स्त्रीयांच्या बाबतीत असो किंवा रुग्णाविषयी,तसेच काही नाल्यांवर आजही पुल बांधले दिसत नाही काही ठिकाणी बांधले दिसतात पण, उंच नसल्यामुळे त्यावर पाणी राहते,काही रस्ते अजिबात पक्के दिसत नाही, एकाच पावसाने त्या रस्त्यावर चिखलाचे सामाज्य दिसून येतात, काही रस्त्यावर मोठे,मोठे खड्डे पडलेले आहेत तर काही रस्त्याने तर माणूस पायी चालू शकत नाही तर सायकल कशी जाणार…? काही नाल्यावर पुल नसल्यामुळे विद्यार्थाचे नुकसान तर होतेच पण,गर्भवती महिलेला प्रसुती करीता नेण्यासाठी जीव मुठीत धरून डोंग्याच्या साह्याने न्यावे लागते.

           या प्रकारच्या अनेक अडचणी शासनाला का म्हणून दिसत नाही…? एकीकडे मोठे,मोठे झाडे तोडून पक्के शानदार रस्ते बनविले जाते पण,त्या तोडलेल्या झाडांमुळे फायदा नाही तर नुकसान दिसून येत आहे तापमानाचे प्रमाण वाढतांना दिसत आहेत हे सर्व कळते पण वळत नाही. आज दुर्गम भागातील लोकांच्या अडी , अडचणी, समस्या, आपत्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. त्यांना प्रत्येक संकटाला समोरे जावे लागत आहे काही गावात आजपर्यंत लालपरी सुद्धा पोहोचली नाही तिच्या प्रतिक्षेत बरेच लोक वाट बघत आहेत.ते कशाप्रकारे दिवस काढतात त्यांचे त्यांनाच माहीत. म्हणुन तर “थोर संत सांगून गेले पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” संताचे वचन अगदी खरे ठरले आहेत जोपर्यंत माणूस त्या परिस्थितीत राहून जगत नाही तोपर्यंत खऱ्या अडचणी कशा असतात मुळात कळत नाही. 

       म्हणूनच दुर्गम भागाकडे, ग्रामीण भागाकडे पूर्ण लक्ष दिल्या जात नाही.जेथे सोय, सुविधा उपलब्ध आहे तिकडेच त्यांचाच विकास केला जातो.दुर्गम भागातील लोक असेही जगले, मेले, वाचले,शिकले किंवा नाही शिकले पुलाविना बुडून मेले तरीही त्यांच्याकडे लक्ष दिल्या जात नाही. जर सुविधा द्यायचेच असेल तर सर्वांना दिले पाहिजे, विकास करायचा असेल तर सर्वाचाच करायला पाहिजेत भेदभाव करू नये. कारण, दुर्गम भागातही माणसेच राहतात त्यांना हि इतरांनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना हि पक्या रस्त्याची आवश्यकता आहे. त्याच प्रमाणे पावसाळा सुरु झाला की, काही गावांमध्ये वीज अगदी बेपत्ता होऊन जाते तर…नेटवर्कचा पत्ता कुठे राहील. ..? काही ठिकाणी टॉवर उभारले दिसतात पण,नेटवर्क मिळत नसल्यामुळे ते उभारलेले टॉवर शोभेची वस्तू बणलेले आहेत. 

      त्यामुळे असे कित्येक काम त्यांचे अडून पडत असतात. उदा.एखाद्या वेळेस जर कोणी आजारी असेल आणि बाहेरगावी त्याला दवाखान्यात न्यायचे असेल तर रात्री, बेरात्री मोबाईल वरून संपर्क तरी कसे साधावे..? शहरात सर्वच सोयी उपलब्ध असतात चोवीस तास सुविधा असते पण,दुर्गम भागात मात्र माणसांचे जगणे एकाद्या नरकाच्या कमी नसते.म्हणून आजही शासनाच्या दुर्लक्षतेमुळे दुर्गम भागातील लोकांचा विकास पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. म्हणून शासनाने एकदातरी दुर्गम भागाकडे,ग्रामीण भागात राहणाऱ्या गोर, गरीब, आदिवासी यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे व त्यांचा इतरांनाप्रमाणेच विकास झाला पाहिजे अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तेव्हाच त्यांचा संघर्ष संपेल कारण तेही भारतीय नागरिक आहेत त्यांचा विसर पडायला नको. 

– सौ.संगीता संतोष ठलाल 

  मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

  मो:७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here