मुंबई-महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकासाठी अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कामाच्या गती व आवश्यकतेनुसार जादा निधी पुरवणी मागण्यांद्वारे देण्यात येणार आहे. मुंबईत चैत्यभूमीनजीक इंदू मिलच्या जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. गेल्या निवडणुकीतील दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी महापुरुषांच्या स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे अर्थमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदू मिलच्या जागेचा ताबा राज्य सरकारला मिळाला आहे. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारक उभारणीसाठी ९ फेब्रुवारी रोजी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला सांगितले.
पुण्यामध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या स्मरणार्थ स्मारक निर्माण करण्याचे प्रस्तावित असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन येथील वसतिगृह, सभागृहाची दुरूस्ती व विस्तारीकरणाच्या कामासाठी दोन कोटी रुपये निधी दिला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी महाराष्ट्राला सामाजिक विकासाचा वारसा दिला. त्यांच्या स्मरणार्थ राज्यात ठिकठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ३० कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
महानुभव पंथाचे आद्यप्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारण्यात येणार आहे. व्यवसायाचा भाग म्हणून माती तुडवत असतानाही भक्तीमार्गाची पताका आपल्या खांद्यावर मिरविणारे वारकरी संप्रदायाचे थोर संत गोरोबा काकांनी आपल्या अध्यात्मिक विकास साधला. त्यांच्या नावाने संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र माती कला मंडळाची वर्धा येथे स्थापना करण्यात येईल. या प्रयोजनासाठी १० कोटींचा निधी राखून ठेवण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी संरक्षणासाठी बांधलेले जलदुर्ग आजही कोकणात बुलंदपणे उभे आहेत. मालवण येथील सिंधुदुर्ग किल्याच्या संवधर्नासाठी १० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या विदर्भातील रामटेक तीर्थक्षेत्राला मोठे धार्मिक महत्व आहे. त्या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा १५० कोटींचा असून, पुढील वर्षात २५ कोटी रु. निधी देण्यात येईल असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here