सांगलीत वाळू तस्करांची महिला तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न.

वाळू उपसा रोखण्यासाठी आणि वाळूमाफियांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सांगलीतील तासगाव येथील कूपर ओढ्याच्या परिसरात ही घटना घडली.
 प्रतिनिधी

सांगली:- अवैध वाळू उपसा आणि वाहतूक थांबवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर पिकअप वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी दुपारी एकच्या सुमारास तासगावमधील कपूर ओढ्यात घडला.

तहसीलदार कल्पना दत्तात्रय ढवळे वय 44, रा. तासगाव यांनी मंगळवारी रात्री उशिरा  तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनिकेत अनिल पाटील रा. पुणदी रोड, तासगाव याच्यासह आणखी एका अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तासगाव शहरापासून जवळच असलेल्या कपूर ओढ्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करून त्या शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कर्मचाऱ्यांसह कपूर ओढ्यावर पोहोचल्या. यावेळी एका पिकअप वाहनात अवैधरित्या वाळू भरण्याचे काम सुरू होते. तहसीलदार ढवळे यांनी उपस्थितांना काम थांबवण्याची सूचना केली. वाहन जप्तीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेत पाटील आणि त्याच्या सहकाऱ्याने तहसीलदारांच्या कारवाईला विरोध केला.

सरकारी कामामध्ये अडथळा आणून त्यांनी वाळूने भरलेले पिकअप वाहन बेदरकारपणे चालवत तहसीलदारांच्या दिशेने आणले. अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच बाजूला झाल्याने तहसीलदार बचावल्या. स्वतःचा बचाव करताना जमिनीवर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. याबाबत तहसीलदार ढवळे यांनी मंगळवारी रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत पाटील याच्यासह त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. दोघांचाही शोध सुरू असून, गुन्ह्यातील वाहन जप्त करण्याची कारवाई लवकरच केली जाईल, अशी माहिती तासगाव पोलिसांनी दिली. दरम्यान, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ परिसरात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले असून, त्यांना रोखण्याचे आव्हान पोलीस आणि महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here