मराठी रंगभूमी दिन सप्ताह विशेष, रंगभूमीवर सादर पहिले नाटक कोणते?

श्री कृष्णकुमार निकोडे

मो. न: ७७७५०४१०८६

८ नोव्हेंबर, गडचिरोली: मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष- पार्श्वपृष्ठ हा कीर्तन, भारुड, दंडार, दशावतार, पोवाडा, लळीत, नक्कल, भागवतमेळे, नटवे, बहुरूपी लोकनाट्य, तमाशा, सोंग, गोंधळ आदी लोकपरंपरा स्रोतातून झालेला आहे. लोकरंगभूमी हीच खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. क्रमाने विकसित झालेल्या रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्यामागे लोकरंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करत असताना महाराष्ट्राला फार आदिम अशी लोककलावंतांची परंपरा आहे. त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झाली. 

     दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिवस किंवा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी सन १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. सन १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णुदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला.

      मराठी रंगभूमीदिनी सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती १९६० सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदक देऊन त्यांचा सन्मान करते. गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. आत्तापर्यंत हा पुरस्कार अमोल पालेकर, केशवराव दाते, ग.दि.माडगूळकर, छोटा गंधर्व, डॉ.जब्बार पटेल, जयंत सावरकर, ज्योत्स्ना भोळे, दाजी भाटवडेकर, दिलीप प्रभावळकर, दुर्गा खोटे, नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर, पु.श्री.काळे, फैयाज, बापूराव माने, बालगंधर्व, भालचंद्र पेंढारकर, महेश एलकुंचवार, माधव मनोहर, मामा पेंडसे, मास्टर कृष्णराव, रत्नाकर मतकरी, रामदास कामत, वसंत कानेटकर, विश्राम बेडेकर, शरद तळवलकर, शं.ना.नवरे, हिराबाई बडोदेकर, मोहन जोशी, मोहन आगाशे इत्यादींना मिळाला आहे. मराठीचा गौरव करणारा रंगभूमी दिन दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सांगली आणि महाराष्ट्रातही अन्य ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. आज मराठी रंगभूमी १७९ वर्षाची म्हणजे पावणेदोनशे वर्षाची झालेली आहे. मात्र, मराठी नाट्य परिषद अथवा मराठी रंगभूमीसाठी कार्यरत असणारे लोक यांच्यात व्यावसायिकता इतकी वाढली आहे, की ग्रामीण भागापासून रुजलेली ही रंगभूमीची सेवा सद्या फक्त मुंबई उपनगर आणि पुण्यापुरती मर्यादित राहिली. खरे तर मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष- पार्श्वपृष्ठ हा कीर्तन, भारुड, दंडार, दशावतार, पोवाडा, लळीत, नक्कल, भागवतमेळे, नटवे, बहुरूपी लोकनाट्य, तमाशा, सोंग, गोंधळ आदी लोकपरंपरा स्रोतातून झालेला आहे. लोकरंगभूमी हीच खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. क्रमाने विकसित झालेल्या रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्यामागे लोकरंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करत असताना महाराष्ट्राला फार आदिम अशी लोककलावंतांची परंपरा आहे. त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झाली.

    रंगभूमीच्या नावाखाली नाटके चालत आहेत. हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. याच दिवसाच्या आसपास साधारण दिवाळीनंतर राज्यनाट्य स्पर्धा सुरू होतात. या राज्यनाट्य स्पर्धाचीही अवस्था सध्या फारच वाईट आहे. ही राज्यनाट्य स्पर्धेची अधोगती गेल्या पंचवीस वर्षात खूपच होताना दिसत आहे. यापूर्वी ही स्पर्धा नागरी आणि अनागरी अशा दोन गटांत व्हायची. त्यानंतर नागरी-अनागरी असा भेदभाव न करता एकच स्पर्धा ६ विविध विभागांतून होऊ लागल्या. आता त्या विभागातूनही पुरेशा प्रवेशिका येत नसल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली. ही अधोगती मराठी रंगभूमीला अत्यंत मारक आहे. याचे कारण या स्पर्धांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामार्फत केले जाते. समाज कल्याणचे उपक्रम हे फक्त पाट्या टाकण्याचे उपक्रम असतात. त्या अधिकाऱ्यांना नाटकाबाबत काही माहिती असते, ना कोणतीही पुरेशी माहिती नसते. त्यामुळे या स्पर्धासाठी परीक्षक म्हणून कोणालाही धरून बांधून आणले जाते. ज्यांचा नाटकांशी काही संबंध नाही, असेही लोक परीक्षक म्हणून बसवले जातात. परीक्षक हा सक्षम असला पाहिजे. तो दिग्दर्शक, रंगकर्मी, अभिनेता असला पाहिजे. त्याला लेखनाची माहिती असली पाहिजे. किमान नाटक पाहिलेली व्यक्ती तरी आणली पाहिजे. तसे न होता कोणीतरी बळेच आणून त्याला परीक्षक बनवून मानधन दिले जाते. अनेक केंद्रांवर १२ नाटके असतील, तर त्यांसाठी तीन परीक्षक असले पाहिजेत; परंतु प्रत्येक नाटकाला वेगळा परीक्षक देण्याचा प्रकार झालेला आहे. सगळी नाटके न बघता परीक्षण करणारेही परीक्षक असतात. फक्त मानधन घेऊन डोळे मिटून बसणारे आणि आधीच निकाल तयार करणारे परीक्षक या समाजकल्याणने दिले. त्याचा परिणाम रंगभूमीची दुरवस्था झाली. शासनाचा चांगला उद्देश प्रशासन आणि चुकीच्या लोकांच्या हाती संयोजन गेल्यामुळे वाट लागली. या स्पर्धा खरे तर नाट्य परिषदेकडून घेण्याची गरज आहे. पण, नाट्य परिषदेचे सदस्य इतके बिझी आणि पैशाच्या मागे लागले आहेत, की त्यांना याकडे लक्ष देण्याची इच्छा नाही. रंगभूमीला सिनेमाची पायरी केली जाते आहे. मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये जाण्यासाठी पायरी पाहिजे म्हणून नाटक करायचे, हा दृष्टिकोन बळावला जात आहे.

      त्यामुळे नंतर मालिकांमधून वेळ मिळाला, चित्रिकरणातून वेळ मिळाला, तरच नाटक करायचे. फक्त शनिवार, रविवार आणि मुंबई आणि उपनगरापर्यंतच नाटकाचे प्रयोग करायचे हा पायंडा पडला. कल्याण आणि पनवेलच्या पलीकडे महाराष्ट्र आहे याची जाणीव मराठी व्यावसायिक रंगकर्मीना राहिलेली नाही. त्यामुळे पूर्वी जसे नाटकांचे दौरे असायचे, तसे दौरे आता बंद झाले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भातले दौरे बंद झाले. सातारा सांगली ही तर नाट्यपंढरी; परंतु तिथेही जाण्यात आता कलाकारांना स्वारस्य राहिलेले नाही. मराठी रंगभूमीच्या १७९व्या वर्षात ही दयनीय अवस्था आज दिसून येते आहे. त्यामुळे नाट्य परिषदेचे अध्यक्ष, सदस्य, विविध पदाधिकारी यांनी याबाबत काही निर्णय घेतले पाहिजेत. मराठी नाटक ग्रामीण भागातून जिवंत राहिले आहे. मराठी जत्रा, साखर कारखाने यांनी रंगभूमीच्या पडत्या काळात आणि विविध वाहिन्या नव्हत्या तेव्हा या कलाकारांना जगवले आहे. असे असताना त्यांच्याशीच होणारी प्रतारणा ही योग्य नाही. रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटय़ परिषद आणि सरकारने काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्य नाटय़ स्पर्धाचे योग्य नियोजन व्हावे आणि मराठी नाटकांचे सर्वत्र दौरे झाले पाहिजेत. मराठी संस्कृती टिकवण्यासाठी त्याची अत्यंत गरज आहे.    

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे मराठी रंगभूमी दिवसाच्या सर्व रंगकर्मीं व लोककला प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here