अचंता शरथ कमलची कमाल

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

अचंता शरथ कमल हे नाव भारतातील किती क्रीडा प्रेमींना माहीत असेल हा प्रश्नच आहे कारण आपल्याकडे जितकी लोकप्रियता क्रिकेटपटूंना मिळते तितकी लोकप्रियता इतर कोणत्याही खेळातील खेळाडूंना मिळत नाही. आल्याकडे क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना कोणीही गांभीर्याने घेत नाही मग ते मीडिया असो की सरकार कदाचित त्यामुळेच क्रीडाप्रेमींनाही क्रिकेट शिवाय इतर कोणत्या खेळाविषयी आत्मीयता नाही त्यामुळे क्रिकेटपटूंना जितकी लोकप्रियता मिळते तितकी लोकप्रियता इतर खेळातील खेळाडूंना मिळत नाही त्यामुळेच अचंता शरथ कमल हे नाव खूप कमी क्रीडाप्रेमींना माहीत असेल.

अचंता शरथ कमल हा भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू असून त्याला नुकताच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून जो खेळाडू वर्षभर चांगली कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करतो अशा खेळाडूंनाच हा पुरस्कार दिला जातो. आजवर हाताच्या बोटावर मोजणाऱ्या खेळाडूंनाच हा पुरस्कार मिळाला आहे यावरुन या पुरस्काराचे महत्व अधोरेखित होते. विशेष म्हणजे यावर्षी केवळ अचंता शरथ कमल याच्याच नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाने भारत सरकारकडे केली होती. येत्या ३० नोव्हेंबरला देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते अचंता शरथ कमलला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. हाच पुरस्कार जर एखाद्या क्रिकेटपटूला मिळाला असता तर मीडियाने त्याला डोक्यावर घेतले असते. क्रीडा पत्रकारांनी त्या खेळाडूचे कौतुक करण्यासाठी आपली लेखणी खर्च केली असती, न्यूज चॅनलने प्राईम टाईमवर त्याचा शो केला असता पण अचंता शरथ कमलला हा पुरस्कार जाहीर झाल्यावर वर्तमानपत्रात शेवटच्या पानावर छापून आलेल्या बातमी शिवाय काहीही पाहायला मिळाली नाही. न्यूज चॅनलवर तर फक्त एक ओळीची बातमी अँकरने वाचून दाखवली यामुळे अचंता शरथ कमलने देशासाठी केलेली कामगिरी झोकाळून गेली त्याच्या कामगिरीची वाचकांना माहिती व्हावी यासाठीच हा लेख लिहीत आहे.

अचंता शरथ कमल हा भारताचा आघाडीचा टेनिसपटू असून त्याने २०१२ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अचंता शरथ कमलने भारतासाठी आजवर जी कामगिरी केली आहे तशी कामगिरी खूपच कमी खेळाडूंना करता आली आहे. अचंता शरथ कमलने भारतासाठी आजवर चार राष्ट्रकुल सुवर्णपदके, दोन आशियाई सुवर्णपदके, दोन आयटीएफ प्रो टूर विजेतेपद मिळवली असून त्याने तीन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अचंता शरथ कमल हा भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम टेबल टेनिसपटू आहे. टेबल टेनिस या खेळात त्याने भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकवत ठेवला आहे. आज वयाच्या ४० व्या वर्षीही तो त्याच जिद्दीने देशासाठी खेळत आहे. अचंता शरथ कमल याचा जन्म १२ जुलै १९८२ रोजी तामिळनाडूतील चेन्नई येथे झाला. शरथ कमलचे वडील श्रीनिवास राव व काका मुरलीधर राव हे देखील त्यांच्या सुरवातीच्या काळात टेबल टेनिस खेळले होते त्यामुळे शरथ कमलला टेबल टेनिसचे बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळाले. शरथ कमलच्या वडिलांनी आणि काकांनीच त्याला टेबल टेनिसचे प्राथमिक धडे दिले. वयाच्या चौथ्या वर्षीच टेबल टेनिस खेळण्यास सुरवात केलेल्या शरथ कमल याने वयाच्या पंधराव्या वर्षी व्यावसायिक टेबल टेनिसपटू म्हणून कारकीर्द सुरू केली.

शालेय आणि महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्याची भारताच्या टेबल टेनिस संघात निवड झाली. भारताच्या संघात निवड झाल्यावर त्याने चमकदार कामगिरी करत भारताला अनेक स्पर्धेत पदके मिळवून दिली. राष्ट्रकुल, आशिआई, एटीपी टूर अशा सर्वच महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवून त्याने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत ठेवला आहे त्याचेच फळ त्याला आज मिळाले आहे. याबाबत भारत सरकारचेही कौतुक करायला हवे कारण त्यांनी योग्य खेळाडूला हा पुरस्कार देऊन त्याचा योग्य असा गौरव केला आहे. अचंता शरथ कमलचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here