संत दासगणू महाराज जयंती उत्सव: श्री साईनाथ स्तवनमंजिरी स्तोत्र निर्माते!

श्री कृष्णकुमार निकोडे

मो:७७७५०४१०८६

७ जानेवारी, गडचिरोली: महत कल्याणकारी व जगाला वरदायी झालेल्या दासगणू महाराजांचे जीवन आपल्या सामान्य लोकांसाठी अमृत आहे. श्री साईबाबांचे कथामृत एकही कथा त्यांचे चरित्र सांगितल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. साईबाबांचे जीवनचरीत्र देशविदेशात पोहचविण्यासाठी त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे ग्रंथकार्य साई चरित्र, श्री गजाननविजय व इतर विस्तृत वाङ्मय पाहता दासगणू महाराजांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, हे प्रत्येक साईभक्ताचे कर्तव्यच ठरते. 

     दासगणू महाराज हे श्री साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. गणू म्हणे ही त्यांची नाममुद्रा होती. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या प्रमुख रचना व ग्रंथसंपदा अशा आहेत- १) श्री आऊबाई चरित्र २) ईशावास्य भावार्थ बोधिनी ३) श्री गजानन विजय: या ग्रंथामधे श्री.गजानन महाराजांचे चरित्र त्यांनी लिहून ठेवले आहे. हे ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. ४) भक्त लीलामृत ५) भक्तिसारामृत ६) भाव दीपिका ७) शंकराचार्य चरित्र ८) संत कथामृत ९) श्री साईनाथ स्तवनमंजिरी १०) शिर्डी माझे पंढरपुर- साईबाबांची आरती. इतर १०० स्फुटपदे, उपदेश प्रकरणात शिष्यबोध व छात्रबोध हे दोन ग्रंथ आहेत. याव्यतिरीक्त अमृतानुभव, शांडिल्य सुत्र, नारद भक्तीसुत्र, भक्ती रसायन, चांगदेव पासष्टी, ईशावास्य, विष्णु सहस्रनाम बोधिनी, गौडपाद कारिका विवरण, विचारसागर प्रदिप यासारखे टिकाग्रंथ व १२५ बोधकथाही लिहील्या आहेत.

     गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज हे मराठी संत, कवी, ग्रंथकार व कीर्तनकार होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे महीपती म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म पौष शु.११ शके १७८९ म्हणजेच दि.६ जानेवारी १८६८ रोजी अकोळनेर, ता.जि.अहमदनगर या गावी झाला. त्यांचा विवाह जामखेड तालुक्यात बोरले आष्टी येथील जहांगिरदार नारायण रानडे यांची कन्या सरस्वती यांच्याशी सन १८९२मध्ये झाला. सन १८९३मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि सन १९०४पर्यंत ती नोकरी केली. ते पोलीसखात्यात नोकरीला असले तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. या दरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले. पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की ईश्वरानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन ईश्वरचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांचे पहिले कीर्तन इ.स.१८९७ साली जामखेडच्या श्रीविठ्ठल मंदिरात झाले. त्यांनी ‘श्री साईनाथ स्तवनमंजिरी’ या स्तोत्राची निर्मिती दि.९ सप्टेंबर १९१८ रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री साईबाबांचे महानिर्वाणाअगोदर ३७ दिवसांपूर्वी केली. साईबाबा संस्थानची स्थापना सन १९२२साली झाली आणि पहिले अध्यक्ष म्हणून दासगणू महारांजाची निवड केली गेली. तेथून पुढे सन १९४५पर्यंत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषद भाषांतराचे कार्य सुरु केले आणि ते अडले या पहिल्याच श्लोकापाशी-

    “ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत।

    तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विद्वनम।।”

   अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहे, म्हटल्याने दिसते, भासते, जाणवते ते सारे ईश्वराने व्यापलेले आहे. त्या सर्वाचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये. महाराज त्यागपूर्वक भोग घ्यावा, या शब्दांपाशी अडले. त्यागाने भोग तरी कसे शक्य आहे? असे त्यांना वाटले. भल्या भल्या विद्वानांशी चर्चा करूनही अर्थ उकलेना. शेवटी त्यांनी शिर्डी गाठली आणि श्री साईबाबांनाच प्रार्थना करून त्या श्लोकाचा अर्थ विचारला. त्यावर बाबा हसून म्हणाले, “अरे हा अर्थ तर तुला काका दीक्षितच्या घरची मोलकरीण सांगेल!” श्री दासगणूनाच नव्हे तर हे उत्तर ऐकणाऱ्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्या बिचारीचे शिक्षण ते किती? बुद्धी ती काय? ती उपनिषदांची अर्थ-व्युत्पत्ती कशी काय करणार?

    मग दासगणू महाराज काकासाहेबांच्या घरी गेले. रात्री श्री साईबाबांविषयी गप्पा झाल्या. त्या स्मरण रंजणातच ते झोपी गेले. ते दिवाळीचे दिवस होते. पहाटेच त्यांना जाग आली ती कुणाच्या तरी मधुर गुणगुणण्याने! आधीच दिवाळीची प्रसन्न पहाट त्यात हा सुश्राव्य स्वर!! दासगणू महाराज जाऊन बघतात, तो काय? भांडी घासण्यात दंग असलेली काकांची मोलकरीण गाणे गुणगुणत होती. ती पोर अंगावर फाटके लुगडे नेसली होती आणि गात होती, नारिंगी रंगाच्या साडीची महती सांगणारे ते गाणे! त्या साडीची भरजरी नक्षी, तिचे काठ, तीचा पदर यांचे भरभरून वर्णन त्यात होते. दिवाळीच्या आनंदात माखलेल्या काकांच्या घरातल्या पोरीबाळी नव्या कपड्यात नटल्या होत्या. त्यांना पाहून फाटक्या कपड्यातली ती पोर उदासपणे नारिंगी साडीचे गोडवे गाणारे ते गाणे गुणगुणत होती. महाराजांचे मन या दृष्याने हेलावले. ते काकांना म्हणाले,” अहो काका, या पोरीला सुद्धा एखादी नवी साडी घेऊन द्या. काकासुद्धा मुळात उदार हृदयाचे त्यात महाराजांची विनंती! तेव्हा आनंदाने ते घरांत गेले. दिवाळीच्या खरेदी निमित्त कपाटात आणखीही काही नव्या साड्या होत्या. त्यातली एक सुंदरशी साडी त्यांनी या पोरीला भेट म्हणून दिली. नवी साडी नेसून संध्याकाळी मैत्रिणींसोबत ती पोर फिरली आणि बागडली देखील. दुसऱ्या दिवशी ती आली मात्र जुनी साडी नेसूनच. नवी साडी घरी ठेवून. पण चेहऱ्यावर कालची उदासीनता नावालाही नव्हती. उलट आनंद विलसत होता. काल अंगावर जुनी साडी आणि चेहऱ्यावर उदासीनता होती. आजही अंगावर जुनीच साडी, मात्र चेहऱ्यावर आनंद! तिचं हे रूप पाहताच दासगणू महाराजांच्या हृदयांतरी श्लोक निनादला-

    “ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत।

    तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विद्वनम।।”

    या मोलकरणीच्या निमित्ताने महाराजांना त्यागपूर्वक भोगचा अर्थ उमगला. आज ती नवी साडी नेसली नव्हती तरी कालचे दैन्य ओसरले होते. ते केवळ भावना बदलल्याने! आज मनाने ती खिन्न नव्हती कारण साडीची उणीव नव्हती. प्रथम नवे लुगडे घ्यायला असमर्थ होती, म्हणून नाईलाजाने जुनेच लुगडे नेसून उदास होती. मग नवे लुगडे मिळाले, ते नेसण्यास समर्थ होती. तरीही जुनेच नेसायचे तिने मनाशी ठरवले, त्यामुळे ती मनाने उदास नव्हती. समर्थ असूनही दैन्य मिरवीत होती. केवळ नाही नाही, आणि अाहे नाही, या भावनांच्या गुणांनेच माणूस सुख आणि दु:ख भोगतो. प्रत्यक्षात सुख आणि दु:खाचे मोजमाप बाह्यांगावरून करता येत नाही. सर्व जर काही एकाच ईश्वराने व्यापले आहे, तर त्यात सुख आणि दु:ख आले कोठून? नवी साडी नसल्याची अपूर्णता दुःखाचे कारण होती. साडी लाभल्याची पूर्णता हे सुखाचे कारण बनले. फरक बाह्यात पडला नाही, आंतरिक होता. थोडक्यात सुख आणि दु:ख हे आंतरिक आहे. प्रत्यक्षात सारे काही पूर्णच आहे. फाटकी साडी नेसलेली ती पोर ईश्वराचेच अंश होते. दाता म्हणजे काका आणि त्यांनी दिलेले दानही ईश्वरी अंशच. मग सारे काही अशेषच!

     ईश्वरावाचून वेगळे काहीच नाही. केवळ मी पणाने आंतरिक सुख-दुःख आहे. मीपणामुळे मी देणारा, मी घेणारा, मी अभावग्रस्त असा भाव आहे. प्रत्यक्षात दाता, देय, दान सारे काही ईश्वरी सत्तेतच सामावलेले आहे. अशा राज्य महीपती दासगणू महाराजांचे महानिर्वाण श्रीज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीला- कार्तिक वद्य १३ शके १८८३ म्हणजेच दि.२६ नोव्हेंबर १९६२ रोजी पंढरपुरात झाले. 

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे दासगणू महाराजांच्या जयंती सप्ताह निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here