अवघ्या १९ वर्षी देशासाठी बलिदान करणारे शहीद हेमू कलानी 

कृष्णकुमार निकोडे

मो: ९४२३७१४८८३

अवघ्या १९व्या वर्षी निधड्या छातीने फाशीला सामोरे जाणारे एक भारतीय क्रांतिकारक हेमू कलानी होते. एवढ्याशा वयाच्या मुलांचा विचार केला, तर त्यांना नुकतेच पंख फुटलेले असतात. तारुण्याच्या मस्तीमध्ये अगदी मनाला वाटेल तसे स्वच्छंद बागडण्याचे हे वय असते. पण हेमूने अल्पशेही जीवन देशासाठी सत्कारणी लावले. 

हेमू कलानी हे इंग्रज सरकार विरुद्ध गनिमी काव्याने लढणारे एक क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले होते. तेवढ्यात देशात १९४२चे भारत छोडो आंदोलन सुरु झाले. हेमू कलानी यांनी आपल्या साथीदारांसोबत या आंदोलनात उडी घेतली. गांधीजींना अटक झाल्यावर या आंदोलनाची आग अजून जास्त वाढली. हेमूंनी ऑक्टोबर १९४२ मध्ये इंग्रजांची हत्यारे घेऊन जाणारी एक रेल्वे लुटायचे ठरवले. यासाठी ते रेल्वेमार्ग खोदू लागले, मात्र तेवढ्यात त्यांना इंग्रजांनी घेरले. त्यांनी तिथून आपल्या सगळ्या साथीदारांना पळून जाण्याची संधी दिली व एकटेच इंग्रजांशी लढत राहिले. त्यांच्या या कल्पकतेमुळे त्यांच्या साथीदारांचे प्राण वाचले. वयाच्या फक्त एकोणिसाव्या वर्षी ज्यांना ब्रिटीश सरकारने अमानुषपणे फासावर लटकावले होते. अशा सिंध प्रांताचे भगत सिंग म्हणून ओळखले जाणारे हेमू कलानी यांच्या जीवनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

हेमू कलानी यांचा जन्म दि.२३ मार्च १९२३ साली सिंध प्रांतातील सक्खर या गावी झाला. क्रांतिवीर भगतसिंगांना आठ वर्षांनी ज्या तारखेला फाशी देण्यात येणार होती, नेमक्या त्याच तारखेला म्हणजे २३ मार्चला हेमूंचा जन्म होणे हा सुद्धा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल. त्यांच्या वडिलांचे नाव पेसुमल कलानी तर आईचे नाव जेठीबाई होते. त्यांचे कुटुंब एक अत्यंत प्रतिष्ठीत कुटुंब म्हणून इंग्रज अधिकारी सुद्धा आदर करत. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय विटांची भट्टी चालविणे हा होता. घरातच देशभक्तीचे वातावरण ठासून भरले होते. त्यामुळे साहजिकच त्यांचे बालपण स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी ऐकण्यात गेले आणि यामुळेच अगदी लहान वयात त्यांच्यात देशाबद्दल प्रेम निर्माण झाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी मराठी म्हण आहे, ती हेमूंना तंतोतंत लागू पडते. बापणापासूनच हेमू अत्यंत हुशार होते. वयाच्या अवघ्या पाचव्याच वर्षी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा झाला होता. परंतु त्यांच्या गावच्या शाळेत फक्त चौथीपर्यंतच वर्ग असल्याने पुढच्या शिक्षणासाठी त्यांना सक्खरच्या तिलक हायस्कूलमध्ये जावे लागले. अभ्यासाबरोबरच त्यांना कुस्तीची देखील आवड होती. ते कुस्तीमध्ये इतके पारंगत होते की बऱ्याच वेळा त्यांनी इंग्रजी पैलवानांना सुद्धा कुस्तीत हरवले होते. या व्यतिरिक्त त्यांना कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि फुटबॉलची देखील आवड होती.

     या सगळ्यापेक्षाही अचंबित करून सोडणारी गोष्ट म्हणजे ते केवळ सात वर्षांचे असतानाच त्यांनी आपल्या काही मित्रांना घेऊन एक क्रांतिकारी दल सुरु केला होता. हेमू व त्यांचे मित्र त्यांच्या गावी गल्यांमधून तिरंगा घेऊन फिरत व देशाबद्दल प्रेम व्यक्त करणारी गाणी गात गात नारेबाजी करत. कोणाची पर्वा न करता त्यांनी वडिलांच्या प्रेमापोटी बंदूक हातात घेतली. त्यांच्या गावात बऱ्याचदा इंग्रज आपल्या सैन्याला घेऊन येत असत. त्यावेळी गावातील लोक घाबरून आपल्या घराच्या खिडक्या, दारे व आपली दुकाने बंद करत असत. परंतु हेमूंनी कोणाचीच भीती बाळगली नाही. इंग्रजांसमोरही ते गावात निडरपणे फिरत असत. याच वयात बरेचजण आपल्या पहिल्या प्रेमाच्या मागे असतात किंवा आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपली कर्तव्य विसरून फक्त कामासाठी मागे धावत असतात. मात्र आज आपण एका अशा तरुणाची कथा जाणून घेणार आहोत, ज्याने अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या प्रिय मातृभूमीसाठी आपले प्राणार्पण केले. त्या तरुण क्रांतिकारकाचे नाव आहे हेमू कलानी. ते जेव्हा लहान होते, तेव्हा ते आपल्या हातात तिरंगा घेऊन गावभर धावत असत. कधी कधी तर ते फाशीचा दोर आपल्या गळ्यात अडकवून क्रांतीवीराची आठवण काढत. आजूबाजूचे लोक एवढ्या कमी वयात त्यांचे ते विचित्र वागणे बघून त्यांना असे वागण्याचे कारण विचारत. त्यावर ते उत्तर देत, “मला भगतसिंगासारखे माझ्या देशासाठी हसत हसत फासावर जायचे आहे.”

एकदा हेमू बाहेरून घरी आले. तेव्हा त्यांची आई रडत बसलेली त्यांना दिसली. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर त्यांना कळले, की त्यांच्या वडिलांना इंग्रज शिपायांनी पकडून नेले. त्याचक्षणी त्यांनी वडिलांना सुखरूप सोडवून आणायची शपथ घेतली आणि आपल्या एका मित्राला सोबत घेऊन बंदुकीसह वडिलांना सोडवायला निघाले. त्यावेळेला त्यांना त्यांच्या एका शिक्षिकेने सांगितले, की असे एकट्याने जाणे बरोबर नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जोवर आपण समूहाने जाणार नाही, तोवर काहीच करू शकणार नाही. त्यांना आपल्या शिक्षिकेच म्हणणे पटले व ते त्याचवेळी ‘स्वराज्य सेना मंडळ’ दलाला जोडले गेले. ते आपल्या मित्रांना घेऊन विदेशी कपड्यांची होळी करण्याचे काम करत असत. अशा या निडर तरुणाचे केवळ एकच स्वप्न होते, की शहीद भगतसिंगांसारखे देशासाठी फाशीवर जायचे!

     एकदा हेमू यांच्या काही मित्रांना अटक झाली आणि त्यांनी खूप संख्येने लोकांना एकत्र जमा केले व निर्दोष लोकांची सुटका करण्यासाठी नारेबाजी सुरु केली. प्रचंड गर्दी पाहून इंग्रजांना दरदरून घाम फुटला आणि शेवटी त्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून लोकांना घाबरवणे सुरु केले. यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. या सगळ्या गदारोळातून हेमूंची कशीतरी सुटका झाली. मात्र घटनेबद्दल त्यांच्या मनात कायमचा द्वेष निर्माण झाला होता. या घटनेनंतर काही दिवसांनीच हेमूंनी तुरुंगावर बाँब फोडून आपल्या मित्रांना बाहेर काढले व ते इंग्रजांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी अशा एका चकमकीत अंदाजे चाळीस सैनिकांना यमलोकी धाडले. मात्र यात त्यांचे बरेच सहकारी शहीद झाले होते. हेमू कलानी यांनी केलेल्या सगळ्या कारवाया इंग्रजांना माहित होत्या. त्यामुळे त्या सर्व आरोपान्वये त्यांच्यावर खटला चालवला गेला व त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. एका एकोणीस वर्षाच्या तरुणाला फाशी होणार म्हणून ऐकणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पाणी होते. हेमूंच्या डोळ्यात मात्र आनंद होता. याचे कारण त्यांना आपल्या देशासाठी फासावर जाण्याची संधी मिळाली होती. शेवटी दि.२१ जानेवारी १९४३ रोजी अवघ्या १९ वर्षांच्या क्रांतिवीर हेमू कलानी यांना फाशी देण्यात आली. 

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे त्यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here