वंदे मातरम : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र…

आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या स्वातंत्र्याला आज ७६ पूर्ण झाली आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी मोठा लढा लढावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याचा बीज मंत्र वंदे मातरम हे गीत होते. स्वातंत्र्य लढ्यात हजरो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. या हजारो हुतात्म्यांचा फासावर लटकताना किंवा इंग्रजांच्या गोळ्या झेलताना शेवटचा शब्द होता तो म्हणजे वंदे मातरम. वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ब्रीदवाक्य होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

१८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला भारतीय जनता कंटाळली होती. इंग्रजांची ही जुलमी राजवट उलथवून लावण्यासाठी नागरिक एकत्र येत होते.अनेक छोटे मोठे समूह इंग्रजांविरुद्ध आवाज उठवत होते त्यामुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली होती. अशा वातावरणात वंदे मातरम या गीताचा जन्म झाला. बंकीमचंद्र चॅटर्जी यांनी कोलकाता विश्व विद्यालयातून बी ए ची पदवी पूर्ण केली होती. इंग्रज सरकारने त्यांची कोलकात्याच्या डिस्ट्रिक मॅजिस्ट्रेटपदी निवड केली. नंतर ते कोलकात्याचे डिस्ट्रिक कलेक्टर बनले.

बंकीम चंद्र चॅटर्जी हे जरी इंग्रजांच्या सेवेत होते तरी ते प्रखर देशभक्त होते. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याचे त्यांना खूप आकर्षण होते. १८५७ साली इंग्रजांनी त्यांचे गॉड सेव्ह द क्वीन हे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भरताचेच राष्ट्रगीत आहे असे भासवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे बंकीम चंद्र चॅटर्जी खूप अस्वस्थ झाले. इंग्रज आपले राष्ट्रगीत भारतावर कसे थोपवू शकतात असा प्रश्न त्यांना पडला. भारतीय लोकही इंग्रजांच्या राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. त्यांनी यावर गहन अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की हजारो वर्षांच्या गुलामगीरीमुळे भारत हा कधीच अखंड देश नव्हता त्यामुळे भारताला स्वतःचे राष्ट्रगीत नव्हते. म्हणून ७ नोव्हेंबर १८७६ रोजी त्यांनी भारत भूमीला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम सहा कडव्यांचे एक देशभक्तीपर गीत लिहिले. त्यांनी हे गीत आपल्या मित्रांना म्हणून दाखवले. तेंव्हा मित्र त्यांना म्हणाले हे गीत भारताचे राष्ट्रगीत बनले पाहिजे.

१८८२ साली बंकीम चंद्र चॅटर्जी यांनी आनंद मठ नावाची एक कादंबरी लिहिली. या कादंबरीत त्यांनी वंदे मातरम हे गीत समाविष्ठ केले. आनंद मठ या कादंबरीला लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. अल्पावधीतच ही कादंबरी लोकप्रिय झाली. त्याकाळात लोकांनी त्या कादंबरीचे पारायण केले. त्यामुळे वंदे मातरम हे गीत देखील लोकप्रिय झाले. १८९६ साली काँग्रेसच्या कोलकता येथील अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम हे गीत गायले. या गीताने संपूर्ण अधिवेशन देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. १९०१ साली कोलकाता मध्येच झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सामूहिक रित्या हे गीत गाण्यात आले. सर्व भारतीयांना हे गीत तोंडपाठ झाले. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत आहे असे मानुनच लोक हे गीत गाऊ लागले त्यामुळे १९०५ साली इंग्रजांनी या गीतावर बंदी घातली. तरीसुद्धा बनारस विश्व विद्यालयात रवींद्र नाथ टागोर यांची पुतणी सरला देवी यांनी हे गीत गायले.

१९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. या फाळणीच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात हे गीत जागृतीचा शंखनाद बनले. हिंदू मुस्लिम सर्वांनी या गीताचे मुक्तकंठाने गायन केले. या फाळणी विरोधात लोक रस्त्यांवर उतरले अखेर इंग्रजांनी शरणागती पत्करून बंगालची फाळणी रद्द केली. इंग्रजांविरुद्ध लोकांना एकजूट करण्यात वंदे मातरम या गीताचा मोठा वाटा होता. वंदे मातरम हा शब्द क्रांतीचा समानार्थी शब्द बनला. जो तो आपल्या भारत भूमीला वंदन करुन म्हणजे वंदे मातरम गीत म्हणून स्वातंत्र्य लढयात सहभागी होऊ लागला. १९०४ साली भगिनी निवेदिता यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाची रूपरेषा तयार केली यात या ध्वजात वर हिरवा मध्ये पिवळा व तळाशी केशरी रंग होता. वरच्या हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले होती. खालच्या केशरी रंगावर चंद्राच्या आणि सूर्याच्या आकृत्या होत्या तर मधल्या पिवळ्या रंगावर वंदे मातरम असे लिहिले होते. १९०७ साली बर्लिन येथे वंदे मातरम लिहिलेला भारताचा हा ध्वज फडकवण्यात आला होता.

लाला लजपतराय हे लाहोरहून एक पाक्षिक चालवत. या पाक्षीकाचे नावही वंदे मातरम हेच होते. देश स्वातंत्र्य झाल्यावर वंदे मातरम या गीताच्या पहिल्या कडव्याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र बनलेल्या वंदे मातरम चे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. वंदे मातरम!

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here