मुक्ता साळवे स्त्रीमुक्तीची सत्यशोधकी

याच मुक्ता साळवेनी डायरेक्ट परमेश्वरालाच प्रश्न विचारला आहे की, “हे परमेश्वरा, ब्राम्हणांचा व आमचा धर्म एक नाही, तेव्हा आम्ही कोणता धर्म पाळावा अथवा स्वीकारावा?” याचाच अर्थ या चिमुरडीने सन 1855  मध्ये शोषणवादी व विषमतावादी हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा आपल्या निबंधातून केल्याचे स्पष्ट होते


मुक्ता साळवे
 या लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी ह्या मांग समाजातली मुलगी इ.स. 1848 साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्‍नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती. सावित्रीबाई फुले या तिच्या पहिल्या शिक्षिका. मुक्ताचा ज्ञानोदय या मासिकामध्ये 1 मार्च 1855 ला “मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध” प्रकाशित झाला होता.

मुक्ता साळवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे. ब्राम्हणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना ती म्हणते, ‘ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग!’

शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञातिबांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे. ती म्हणते, ‘अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा.

दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते. तिने मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दलही लिहिले आहे. मांग-महार स्त्रिंयाच्या वाटयाला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना मुक्ता साळवे लिहिते, ‘ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते. म्हणून ऊन पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार?’ म्हणजे मुक्ता स्पष्टपणे नोंदवते की आमच्या स्त्रिया म्हणजे दलित-कष्टकरी स्त्रिया आणि उच्चजातीय स्त्रिया असा भेद स्त्रियांमध्ये आहे. दलित स्त्रियांना कोणत्याच प्रकारची साधी सुरक्षितता ही जातिव्यवस्था देत नाही या सत्याकडे ती लक्ष वेधते.

जसे ख्रिस्ती धर्मियांसाठी बायबल, इस्लाम मानणाऱयांसाठी कुराण हे धर्म पुस्तक आहे, तसे ब्राह्मणी धर्माबाबत दिसत नाही. ब्राह्मणी धर्मानुसार वेद ही एक संहिता आहे. परंतु वेद वाचण्याचा तर सोडाच ते पाहण्याचेही स्वातंत्र्य ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही नाही. मुक्ता साळवे निबंधात लिहिते, ‘वेद तर आमचीच (ब्राह्मणांची) मक्ता आहे. आम्हीच याचे अवलोकन करावे. तर यावरून उघड दिसते की, आम्हाला धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे?’ म्हणजे देव हे ब्राह्मणी ग्रंथ आहेत. त्यावर ब्राह्मणांची मक्तेदारी आहे. हे स्पष्ट करत सांस्कृतिक मक्तेदारीला ती यथाशक्ती विरोध करताना दिसते आणि पुढे जाऊन आम्ही ब्राह्मर्णी धर्मविरहित लोक आहोत अशी भूमिका घेऊन ब्राह्मणी धर्म विरुद्ध अब्राह्मणी धर्म असे द्वैत अधारेखित करते. धर्मातील नीति कल्पनांचा अनुभव एकाने घ्यावा व इतरांनी ‘खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे’ त्यापासून दूर रहावे या अमानवी, भेदयुक्त विभाजनाला तिने विरोध दर्शविला आहे. भेदाभेद करणाऱया ‘धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो’ अशी कामना केली आहे. तिने धर्म, संस्कृती, रूढी, परंपरांच्या नावाखाली घडवल्या जाणाऱया हिंसाचाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here