रेल्वे मंत्रालयानेच दिलेल्या माहितीनुसार २०२२ – २३ वर्षात रेल्वेचे ४८ अपघात
आंध्रप्रदेशात दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याने झालेल्या भीषण अपघातात १०० प्रवाशांना जीव गमावावा लागला तर ४० प्रवासी जबर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कारण रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातांची ही पहिली वेळ नाही अलीकडे तर स रेल्वेच्या भीषण अपघायांची मालिकाच सुरू झाली आहे या भीषण अपघातांच्या मालिकेत निष्पाप प्रवाशांना जीवास मुकावे लागत आहे. जून महिन्यातच बालासोर मध्ये तीन गाड्यांची टक्कर झाली त्यात २०० हून अधिक प्रवाशांना जीव गमावावा लागला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात उदयपूर – खजूराओ – द्रोणागिरी एक्स्प्रेसला आग लागली. त्याच महिन्यात २६ तारखेला मदुराई स्टेशनवर उभ्या असलेल्या पूनलू – मदुराई एक्स्प्रेसच्या खाजगी कोचमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दहा जणांचा जळून मृत्यु झाला. अपघातांची ही मालिका येथेच थांबत नाही रेल्वे मंत्रालयानेच दिलेल्या माहितीत २०२२ – २३ या आर्थिक वर्षात रेल्वेचे ४८ अपघात झाले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे जर एकाच वर्षात इतके अपघात होत असतील तर रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच.
वास्तविक रेल्वे ही सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असणारी प्रवासी वाहतूक व्यवस्था आहे. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. देशभर रेल्वेचे जाळे पसरले आहे. सर्वाधिक मनुष्यबळ देखील रेल्वेकडेच आहे. त्यामुळेच प्रवाशांचा रेल्वेवर कमालीचा विश्वास आहे आता मात्र हा विश्वास कमी होऊ लागला आहे. रेल्वेत बसताना हा आपला शेवटचा प्रवास तर नाही ना अशी शंका प्रवाशांना येते. दोन रेल्वेची सामोरा समोर टक्कर, रेल्वे डब्यांना आग लागणे, रेल्वे रुळांना तडे जाणे, चालकाने सिग्नल तोडणे, गाड्यांचा अती वेग आदी कारणांनी रेल्वे अपघात होतात असे खुद्द रेल्वे खात्यानेच मान्य केले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर या अपघातांची कारणे रेल्वे खात्याला माहीत आहे तर त्यावर उपाय का केला जात नाही. अपघात झाल्यानंतर रेल्वेकडून मृत प्रवाशांच्या वारसांना नुकसान भरपाई देणे आणि जखमी प्रवाशांवर मोफत उपचार करणे याशिवाय रेल्वे खाते अधिक काय करताना दिसत नाही. दरवेळी अपघात घडला की तीच कारणे दिली जातात. मात्र त्यावर उपाय केला जात नाही. गेल्या ७५ वर्षात रेल्वे प्रवाशांची संख्या कैक पटीने वाढली आहे मात्र त्या तुलनेत सेवेत सुधारणा झाली नाही आणि आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली नाही त्यामुळे त्याच यंत्रणेवर भिस्त ठेवून रेल्वेचा कारभार चालू आहे. अपुरी सुविधव्यवस्था, जुनीच कालबाह्य ठरलेली यंत्रणा, पुरेशा कर्मचाऱ्यांचा वानवा, आहे त्या कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण, भ्रष्टाचार, सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष आदी बाबींवर रेल्वे खात्याने लक्ष द्यायला हवे. सरकारने रेल्वेला आवश्यक त्या पुरेशा सुविधा पुरवायला हव्यात.
गेल्या अनेक वर्षात रेल्वेची भरती झाली नाही. रेल्वे खात्याने रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करावी म्हणजे आहे त्या कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण कमी होईल. जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा रेल्वे खात्याने वापर करायला हवा. रेल्वे अपघात टाळण्यासाठी आरडीएचओ ने अँटी कोलिजन डिव्हाईस चा विकल्प दिला आहे. यात गाड्यांची टक्कर होत नाही. ही प्रणाली जिपिएस सिस्टीम आणि रेडिओ कम्यूनिकेशन सेन्सरवर आधारित आहे. ही प्रणाली ४०० किलोमिटर अंतरापर्यंतच्या गाड्यांचा पत्ता लावू शकते. त्यामुळे एकाच रुळावर दोन गाड्या असतील तर त्याची माहिती रेल्वे स्टेशनवरील यंत्रणेला मिळू शकेल. तशी माहिती मिळाल्यास दोन गाड्यांमध्ये होणारी टक्कर टळू शकेल. शिवाय गाडीचा वेग किती आहे हे देखील या प्रणालीद्वारे समजेल. अती वेगात गाडी असल्यास वेग कमी करण्याच्या सूचना चालकाला देता येतील. आरडीएचओ ने सुचवलेल्या या प्रणालीचा वापर रेल्वे खात्याने करायला हवा. ही किंवा यासारख्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर करूनच रेल्वेचे अपघात टाळता येईल. शून्य रेल्वे अपघात हे धोरण रेल्वेने राबवून त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे खात्याचीच आहे. त्यामुळे अपघात होऊन रेल्वे प्रवाशांचा जीव जाऊ नये यासाठी रेल्वेने सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५