मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ठाण्यात पिरियड रूम.

ठाणे:- महाराष्ट्रातील मुंबईच्या जवळ ठाण्यातील झोपडपट्टीतील महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी एक ‘पिरियड रूम’ तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालयात बनवलेली ही पिरियड रूम महिलांसाठी खूप मोलाची ठरणार.

मासिक पाळीच्या दरम्यान सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे म्हणचे कुचंबणा असल्याने महिलांच्या स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीच्या खोलीची संकल्पना उदयास आली आहे. म्युज फाऊंडेशन 2019 पासून ठाण्यामध्ये शाश्वत मासिक पाळीच्या चांगल्या सवयींसाठी व्यापक मोहीम राबवत असून त्यातूनच या संकल्पनेला मूर्त रूप देण्यात आले आहे. म्युज फाऊंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांनी एकत्रितपणे शहरातील स्वच्छतागृहांमध्ये भारतातील पहिल्या मासिक पाळीच्या खोलीचे अनावरण केले. ठाण्यात लोकमान्य नगर, पाडा क्र. 4 येथील सार्वजनिक शौचालायात ही खोली बांधण्यात आलेली आहे.

मासिक पाळीविषयीच्या सामाजिक गैरसमजांमधून अनेक वाईट रुढी, परंपरा वाढीस लागल्या आहेत. त्याचा त्रास महिलांना होत असून लज्जेमुळे याविषयी कोणीही स्पष्टपणे बोलत नाही. याविषयी महिलांनी मोकळेपणाने बोलून मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, या उद्देशाने ठाण्यातील ‘म्युज’ या तरुणांच्या गटाने 2015 पासून ‘पिरिअड ऑफ शेअरिंग’ हा उपक्रम सुरू केला. यातून जनजागृती करत असताना महिलांना हे दिवस शिक्षा वाटू नयेत, ते आनंददायी असावेत या उद्देशाने म्युज फाऊंडेशनने ‘मासिका महोत्सवा’ची 2017 मध्ये सुरुवात केली आहे. 2019 पासून म्यूज फाऊंडेशनने ठाण्यामध्ये शाश्वत मासिक पाळीच्या उपक्रमाअंतर्गत मासिक पाळीच्या सवयींबाबत शहरातील 15 विभागांमधील एक हजार महिलांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामधून अनेक धक्कादायक निरि‍क्षणे समोर आली. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिला पाळीच्या दिवसांमध्ये सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असतात. त्यात पाणीकपात, अस्वछ खोल्या आणि सॅनिटरी पॅडच्या कचरा व्यवस्थापनाचा अभाव अशा प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वेक्षणानंतर म्युज फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘मासिक पाळीची खोली’ संकल्पना उदयास आली आहे.

या खोलीचा आराखडा रिसायकल बिन नावाच्या संस्थेने बनविलेला असून सामान्य महिलेचा विचार करून सर्व सुखसोयीनीं उपयुक्त अशी बनविलेली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी आणि स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी अनावरण प्रसंगी उपस्थित होते. ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज’ यांनी या उपक्रमाला पाठबळ दिले आहे.

मासिक पाळीच्या खोलीमध्ये नळ, जेट स्प्रे, आरसा, सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरापेटी आहे. कचरा पेटीतील कचरा हाताचा वापर न करता काढण्यासाठी पेटीच्या खालच्या बाजूने झाकण आहे. तसेच साबणाची बाटली, कपडे अडकवण्याकरिता खिळे आणि बाथरूमची सोय सुद्धा आहे. या सुसज्ज खोलीची रचना रिसायकल बिन नावाच्या संस्थेने केलेली असून झोपडपट्टीतील महिलांच्या गरजा ओळखून बनवलेली आहे. केवळ खोली तयार करून हा प्रश्न सुटणार नसल्याने म्युज फाऊंडेशन, मासिक पाळीच्या खोलीबद्दल महिलांना ज्ञान देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहेत.

देशातील मासिक पाळीशी संबंधीत उपक्रम आणि प्रयत्नांची पाहणी केल्यानंतर अशा प्रकारे महिलांच्या मासिक पाळीच्या काळात उपयुक्त ठरेल, अशी स्वतंत्र खोलीची व्यवस्था उभारल्याचे दिसून आले नाही. स्वच्छतागृह, चेंजिंग रूम असले तरी मासिक पाळीसाठी स्वतंत्र खोलीची हा पहिलाच प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here