भटक्या कुत्र्यांनी कोंबड्या खाल्ल्या; नैराश्याने कुक्कुटपालक व्यावसायिकांची तलावात उडी घेऊन आत्महत्या.
नालासोपारा:- कोरोनाकाळात हातावर पोट असलेल्या अनेकांचे हाल झाले. या परिस्थितीतून उभारी घेत नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीने कुक्कुटपालनचा व्यवसाय सुरु केला. मात्र, त्यांच्या 15 कोंबड्या भटक्या कुत्र्यांनी खाल्ल्याने निराश झालेल्या कुक्कुटपालक व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. तलावात उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
थॉमस अतोन समाव वय 60 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या कुटुंबासोबत ते नालासोपाऱ्यातील गासगाव येथे राहत होते. त्यांनी रोजगारासाठी 20 कोंबड्या पाळल्या होत्या. शुक्रवारी रात्री काही भटक्या कुत्र्यांनी कोंबड्या असलेल्या खोलीत शिरत 15 कोंबड्याचा फडशा पाडला. थॉमस यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला. ते फार दु:खी झाले. रोजगार देणाऱ्या 20 कोंबड्यांपैकी 15 कोंबड्या कुत्र्यांनी खाल्ल्याने त्यांना धक्का बसला. मोठे नुकसान झाल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांना पडला. या तणावात नैराश्याच्या भरात त्यांनी तलावात उडी घेत आत्महत्या केली.
शनिवारी दुपारी गावाजवळील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी थॉमस तणावात असल्याने त्यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.