विमाशि संघाचे ३ व ४ फेब्रुवारीला प्रांतीय अधिवेशन, विविध विषयांवर होणार चर्चा, विदर्भातून शिक्षकांची उपस्थिती
मीडिया वार्ता वृत्तसेवा
मो: 8830857351
चंद्रपूर, १ फेब्रुवारी: महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना अशा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे ‘प्रांतीय अधिवेशन २०२४’ ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी शकुंतला फार्मस् (लिली) चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रांतीय अधिवेशनात शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिक्षक मेळावा, मान्यवरांचा सत्कार पार पडणार आहे. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, उद्घाटक माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, मार्गदर्शक म्हणून सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यीक आचार्य ना.गो. थुटे, म.रा.मा.शि. महामंडळ, मुंबईचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी यांची मंचावर उपस्थिती राहील. याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सक्रीय पाठिंबा देणाऱ्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर आमसभा संपन्न होईल.
४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा तथा स्मरणिका प्रकाशन समारंभ होईल. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, उद्घाटक आमदार ॲड. अभिजीत वंजारी, मार्गदर्शक म्हणून सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार धीरज लिंगाडे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, विमाशि संघ अध्यक्ष श्रावण बरडे, स्वागताध्यक्ष श्री जैन सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष राज पुगलिया यांची मंचावर उपस्थिती राहील. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनास विदर्भातून शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे.
दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांतीय, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.