मुंबई – प्रवासी वाहतूक क्षमतेत दुपटीने वाढ करण्यासह खर्चातही बचत करण्याच्या दुहेरी उद्देशाने एसटी महामंडळाने डबलडेकर बसवाहतूक सेवा सुरू करण्याबाबत नव्याने चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी महामंडळाने मुंबई ते पुणे एक्स्प्रेस-वेवर डबलडेकर बस चालविण्यासंदर्भात सर्वेक्षणही केले आहे. यापूर्वी महामंडळाने डबलडेकर बस सुरू करण्यासाठी आठ वर्षांमध्ये बऱ्याचदा विचारविनिमय केला होता. मात्र, त्याला मूर्त रूप आले नाही. त्यामुळे आता महामंडळाने नव्याने प्रयत्न चालवले आहेत. व्होल्वो कंपनीने या बस तयार करण्याची तयारी दाखवली आहे.
रेल्वेमार्गावर डबलडेकर एक्स्प्रेस संकल्पना यशस्वी होताना रस्ते मार्गावर डबलडेकर बस संकल्पना काही वर्षांपासून चर्चेत आली आहे. पण ही बस चालविताना वळणावळणाच्या रस्त्यांऐवजी रस्ते सरळ रेषेत असण्याची आवश्यकता भासते. सध्या मुंबई ते पुणे एक्स्प्रेस-वेवर यापद्धतीने रस्त्यांवर नागमोडी वळणे नसल्याने डबलडेकर बस चालविता येतील, असाही कयास आहे. त्यासाठी नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून त्याचा अंदाज घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या देशभरातील राज्य परिवहन सेवांचा समावेश असलेल्या एएसआरटीयू (असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) संघटनांची बैठक पार पडली. त्यात, या कंपनीने डबलडेकर बससंदर्भात सादरीकरण करून ही सेवा सुरू होण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. सध्या देशात अशाप्रकारे कोणत्याच राज्य परिवहन मंडळांमध्ये डबलडेकर बससेवा चालवली जात नाही. या परिस्थितीत एसटी महामंडळाने संबंधित कंपनीशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here