20 वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी.
विशाल सुरवाडे जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव:- शहरातील 20 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीशी जवळीक करून तिला लग्नाचे आमिष दिले व सातत्याने तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. अखेर त्या विद्यार्थिनीने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी आरोपीस दोषी धरुन 10 वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जयकुमार अशोक सोनवणे वय 32, रा. खोटेनगर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात स्वत: पीडित तरुणीचा जबाब महत्त्वाचा ठरला. तसेच पीडिता व जयकुमार यांची डीएनए चाचणी देखील उपयोगात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी तर त्यांना पैरवी अधिकारी ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.
घटना अशी की, जयकुमार याने सन 2011-12 मध्ये शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका तरुणीशी जवळीक साधली. यानंतर सन 2013-14 मध्ये प्रेमसंबंध प्रस्तापित करून या तरुणीशी शरीरसंबंध ठेवले. तिला घरी, लॉजवर घेऊन अत्याचार केले. ती गर्भवती राहिली. तिने जयकुमार याला लग्न करण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र, त्याने लग्न केले नाही. अखेर सन 2015 मध्ये या तरुणीने जयकुमारच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जयकुमार याला अटक केली. सुमारे दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला.
या पीडितीने सन 2016 मध्ये मुलास जन्म दिला. हा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. आरोपील जयकुमार याला ठोठावलेली तीन लाख रुपयांची दंडाची रक्कम पीडिता व तिच्या मुलास संगोपनासाठी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.