प्रोजेक्ट उडान अंतर्गत अतिदुर्गम भागातील ४२२ विद्यार्थ्यांना करण्यात आले पुस्तकांचे वाटप
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पोलीस दादालोरा खिडकी चे माध्यमातून, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या अंतर्गत शैक्षणीक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा एक भाग म्हणुन आज ०१ मार्च २०२५ रोजी गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा व पुस्तक वाटप कार्यक्रम पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.
सन २०२४-२५ या शैक्षणीक वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारा स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास केंद्रांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये बी.ए.च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणारे ४२२ विद्यार्थी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे हस्ते पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी घेण्यात असलेल्या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सायबर अपराधांबाबत माहिती देऊन सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी उपयुक्त अशा सुचना देण्यात आल्या. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना सायबर साक्षर होण्याविषयी शपथ देखील देण्यात आली.
गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील शिक्षण सोडलेल्या युवक युवतींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा गडचिरोली पोलीस दलाचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोली जिल्हयामधील दुर्गम भागातील शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी- सुविधा तसेच शिक्षण सोडलेल्या युवक- युवतींसाठी सन २०१८ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचेशी समन्वय साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत मुरुमगाव, एटापल्ली, ताडगाव, पेंढरी व जिमलगट्टा या ०५ ठिकाणी अभ्यास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली असून या ०५ अभ्यास केंद्रांच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत एकूण २५२९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील युवक- युवतींना शिक्षण पुर्ण करुन आजच्या प्रगत युगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश, हे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, युवक-युवतींनी मोठे स्वप्ने बघावीत व केवळ आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रीत करावे. गडचिरोली पोलीस दल युवक-युवतींच्या शैक्षणीक प्रगतीसाठी सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, सायबर पोलीस ठाणे येथील मपोउपनि नेहा हांडे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.