स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा प्रसंगी देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 सरोवर निर्माण करण्याच्या यांच्या संकल्पनेस नागपुरातून प्रारंभ
मीडिया वार्ता न्यूज
०१ मे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्याच्या ‘मन की बात’ मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा प्रसंगी देशातील लुप्तप्राय झालेल्या जलसोत्रांना पुनर्जीवित करून ‘अमृत सरोवर निर्माण’ करण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून मूर्तरूप देण्याचे काम नागपूर जिल्ह्यातल्या काटोल येथील मेंढेपठार येथे 4 अमृत सरोवरांच्या भूमीपूजनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे मेंढेपठार येथील चार सिंचन तळ्यांच्या जागी चार अमृत सरोवर निर्माण करण्यात येणार आहे . आज मेंढेंपठार येथे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या भागात खोलीकरण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होईल आणि शेतकऱ्यांना देखील याचा लाभ होईल असे मत सुनील केदार यांनी यावेळी व्यक्त केले.
मेंढेपठार सिंचन तलाव, सोनखांब तलाव आणि चंद्रभागा धरण येथील सिंचन तलाव याठिकाणी हे 4 अमृत सरोवर निर्माण होणार असून या सिंचन तळ्याच्या कायाकल्पातून या सर्व तळ्यांच्या सिंचन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 353 जे वरील नागपूर-काटोल रस्तेप्रकल्पाच्या चौपदरीकरणामध्ये या चारही सरोवराच्या कामासाठी व खोलीकरणासाठी काढलेल्या मातीचा उपयोग होणार आहे. अमृतसर सरोवराच्या माध्यमातुन भूजल पुनर्भरण होणार असून सिंचन क्षमतेत वाढ, मत्स्यसंवर्धन, कृषी तसेच वृक्षारोपणाला त्याचा फायदा होणार आहे.
या भूमीपुजनाच्या प्रसंगी उपस्थित विधानपरिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, अमृत सरोवराची संकल्पना ही पावसाच्या पाण्याचे संवर्धन करुन शेतकऱ्यांना कृषी समृद्ध करण्यासाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी राजेश अग्रवाल यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार प्रत्येक जिल्ह्यात 75 सरोवर निर्माण करण्याची संकल्पना असून या वर्षामध्ये संपूर्ण देशात 50 हजार तलाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. आज नागपूर जिल्ह्यातून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली याचा प्रारंभ करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.