सर्पदंशाने माजी सरपंचाचा मृत्यू
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
सावली : तालुक्यातील डोनाळा येथे शेतात काम करीत असताना सापाने चावा घेतल्याने माजी सरपंचाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (दि 30) रोजी दुपारच्या सुमारास घडली. बाळकृष्ण रावजी चलाख असे मृतकाचे नाव असून त्यांनी तब्बल पंधरा वर्ष सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. सध्या पेरणीच्या पूर्व हंगामाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील शेतकरी दिवसभर शेतात मशागतीची कामे करतात. नेहमीप्रमाणे बाळकृष्ण आपल्या शेतात मशागतीची कामे करण्याकरिता गेले असता काम करीत असताना अचानक त्यांना पायाला काहीतरी चावा घेतल्याचा भास झाला. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने त्यांना चक्कर आल्याने गावात आणण्यात आले. तब्येत अधिकच खालावल्याने उपचारादाखल लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान बाळकृष्ण रावजी चलाख यांचा मृत्यू झाला. माजी सरपंचाच्या मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.